प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

सामाजिक स्थिति.— या बेटांत स्त्रियांच्या संख्येच्या अल्पत्वामुळें बहुभार्यत्वाचें नांवहि दिसत नाहीं. जातिभेदाचीं बंधनें शिथिल झाल्यामुळें आणि सामाजिक लोकमताचा दाब व्यक्तींच्या आचरणावर मुळींच नसल्यामुळें पोर्टब्लेअर येथील वसाहतींतील स्वतंत्र लोकांमध्यें वैवाहिक बाबतींत फारच घोंटाळा माजला आहे. परस्परांपासून फार भिन्न अशा जातींतील व्यक्तींचे विवाह होण्याच्या बाबतींत मुळींच आडकाठी नसल्यामुळें नीचोच्चजातिविवाह हा शब्दच तेथें निरर्थक ठरतो. त्याप्रमाणेंच तेथें सगोत्रविवाह, असगोत्रविवाह अथवा सापिण्ड्य इत्यादि शब्दांसहि वाव नाहीं. अशा तर्‍हेनें तेथें विवाहाच्या बाबतींत सामाजिक बंधनाचें मुळीं अस्तित्वच नसल्यानें आणि त्यांत आणखी स्त्रियांच्या संख्येच्या अल्पतेची भर पडल्यामुळें तेथील विधवा कोणत्याहि जातीच्या अथवा पंथाच्या असल्या तरी फारच थोडे दिवस वैधव्यांत राहतात यांत फारसें आश्चर्य नाहीं.

पोर्टब्लेअरमध्यें जरी हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या अनेक भाषा चालतात तरी सामान्यत : उर्दु हीच तेथील भाषा होय. तेथील कचेर्‍यांतून, शाळांतून वगैर हीच भाषा चालते; व बहुतेक सर्व कैद्यांस ही भाषा शिकावी लागते.

पोर्टब्लेअरमधील लोकांतील जातिबंधनें हळू हळू शिथिल होत चाललेलीं आहेत. परंतु यावरून हिंदुस्थानांतील जातिव्यवस्थेच्या भविष्यत् स्थितीबद्दल अनुमान काढणें बरेच धाडसाचें होईल. पोर्टब्लेअरमध्यें जातींमधील तुटकपणा नाहींसा करणारीं जीं कारणें आहेत तीं हिंदुस्थानामध्यें जातिव्यवस्थेमध्यें फरक घडवून आणून एक प्रकारानें तिची परिणति करणार्‍या कारणांपेक्षां इतकीं भिन्न आहेत कीं त्या दोहोंचा परिणाम एकच होईल अशी अपेक्षा करणें असमंजसपणाचें आहे.

पोर्टब्लेअरमधील शिस्तीचे नियम जरी जातिभेदाकडे लक्ष पुरवून केलेले आहेत व काळ्यापाण्यावर पाठविलेल्या मनुष्याची जात बिघडणार नाहीं असें जरी सामान्य धोरण ठेविलें जातें तरी एकंदरीनें जातींतील भेद व तुटकपणा हे कांही कालानें आपोआपच लयास जातील. जरी नियमांप्रमाणें ब्राह्मण वगैर उच्च जातींस स्वयंपाक व पाणी भरणें हींच कामें द्यावयाचीं व खालच्या दर्जाच्या जातींस इतर हलकीं कामें द्यावयाची असें ठरलेलें असलें तरी कांहीं काळ सर्वांनांच उमेदवारीदाखल काम करावयाचें असतें व या काळांत सर्व जातींच्या व पंथांच्या लोकांस एकाच ठिकाणीं कांहीं तरी श्रमाचें काम करावें लागतें.

हद्दपारीच्या कालांत हिंदु बहुत करून आपल्या जातीस चिकटून राहतो. परंतु तेथील शिस्तीच्या नियमांचें सामान्य धोरण असें आहे कीं एकाच प्रांतांतील व्यक्तींस होता होई तों एकमेकांपासून दूर ठेवावयाचें आणि हाच नियम थोड्याबहुत प्रमाणांत एकाच जातींतील लोकांसहि लावण्यांत येतो. जातिभेदास जरी नियमांची संमति असली तरी त्यांची बजावणी जातिभेदास पोषक अशी केव्हांहि नसते. जरी उच्च जातीचे बरेचसे लोक सामान्यतः तेथील स्वयंपाकगृहें व भंडारे यांमध्यें अथवा त्यांच्या आसपासच दृष्टीस पडतात तरी बाकीच्यांची इतकी फोड करून टाकलेली असते कीं, ज्या
लोकांशीं स्वदेशांत ते खुषीनें मुळींच संबंध ठेवणार नाहींत अशा लोकांशीं त्यांना नाइलाजानें वागावें लागून त्यांचीच मैत्री करावी लागते.

त्या ठिकाणीं लोकमत असें कांहींच नसल्यामुळें, लोक हिंदु धर्मशास्त्रचें वारंवार उल्लंघन करितात; कारण अशा लोकांनां कोणीहि प्रतिबंध करीत नाहीं.

पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षां बेसुमार अधिक असल्यामुळें, स्त्रियांच्या ठिकाणीं अनेक प्रकारचे मोह उत्पन्न होतात; अशा प्रकारच्या या गुन्हेगार लोकांनीं संयमी असणें हें सोपें नाहीं.

या गोष्टीचा स्वाभाविकपणें असा परिणाम होतो कीं, बहुतेक खेड्यांतील बरेच लोक नीतिभ्रष्ट होतात, व गुन्हेगारांमध्यें उपदंशाचा विकार सर्वसाधरण असल्यामुळें खेडेगांवांत त्या रोगाचा साहजिकच प्रसार होतो.

तथापि, एकंदरींत, खेड्यांतील जीवितक्रम बराच सुरळीत चालतो; निदान, तेथें फारसे प्रत्यक्ष गुन्हे होत नाहींत. गुन्हेगारांत मोठी एकी असते, याबद्दल प्रश्न नाहीं. त्या सर्वांचा एक संघ असतो. एखाद्या खटल्याची चौकशी चालू असतां वरील गोष्ट चांगली दृष्टोत्पत्तीस येते. ते लोक एकमेकांची माहिती कधींहि देत नाहींत. अशी माहिती देण्यापेक्षां ते स्वखुषीनें स्वतः शिक्षा भोगतात. अशीं कित्येक नियमबाह्य कृत्यें होत असतात कीं, पाटील त्यांची वर्दीहि देत नाहीं. तथापि अंदमानसारख्या ठिकाणीं फारसे भयंकर गुन्हे होत नाहींत ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. या गुन्हेगारांपैकीं निवडक निवडक लोकांचीहि नीतिमत्ता सामान्य लोकांपेक्षां कमी दर्जाची असल्यामुळें यांचें आचरण अगदीं शुद्ध होईल अशी आशा करितां येत नाहीं. व्यवस्थितपणें लग्न करून यांपैकीं कांहींजण जरी नीट वागूं लागले तरी इच्छित हेतु सफल झाला असेंच आपण म्हणूं व यास्तव ही समाधानाची गोष्ट आहे कीं, या गुन्हेगारांपैकीं बरेच लोक लग्न करून नीट वागतात, व ते हिंदुस्थानांत परत गेल्यावरहि चांगल्या सहवासांत आपली राहणी कायम ठेवितात. रीतसर विवाह केलेले स्त्रीपुरुष ज्या खेड्यामध्यें राहतात, अशा खेड्यांपैकीं बहुतेक खेडीं फार प्राचीनकाळीं वसलेलीं आहेत. कांहीं खेडीं हिंवतापानें दूषित झालेल्या जागीं असल्याचें पूर्वी आढळून आल्यामुळें, जवळच उंच जागीं तीं खेडीं वसविलीं गेलीं व त्याचा परिणामहि फार समाधानकारक झाला.

बहुतेक खेड्यांत फारसा हिंवताप नाहीं व असला तरी एकंदर वार्षिक मृत्युसंख्येवर त्याचा फारसा परिणाम होत नाहीं असें त्या विषयावरील सांप्रतच्या ग्रंथांवरुन कळतें. साथींच्या हिंवतापाची गोष्ट निराळी असते; परंतु वर सांगितल्याप्रमाणें वसाहतीच्या इतर भागांइतका या खेड्यांनां हिंवतापाचा त्रास होत नाहीं.

उपदंश झालेल्या स्त्रियांची मुलें बहुधा जन्मतः अगदीं निरोगी निपजतात, परंतु पुढें लवकरच पुरुळ वगैरे त्या रोगाचीं चिन्हें दिसूं लागतात. अशा मुलांची वाढ होत असतांनां जर त्यांचें निरिक्षण केलें तर रोगाचा उद्‍भव केव्हां होतो हें कळण्याचा संभव आहे; परंतु विवाहपद्धतीनें कांहीं दिवस राहून शिक्षेची मुदत संपल्यावर गुन्हेगार सुटका होतांच आपलें खेडें सोडून एकदम हिंदुस्थानांत जातो व आपली बायको व लहान मुलें यांनांहि तो घेऊन जातो; त्यामुळें मुलांच्या आनुवंशिक रोगाचीं आणखी लक्षणें पाहण्यास सवड सांपडत नाहीं.

सुटका झाल्यानंतर वसाहतींत फारच थोडीं कुटुंबें राहतात.

गुन्हेगारांचीं मुलें लहानपणींच आपल्या आईबापांबरोबर निघून गेल्यामुळें त्यांच्या बुद्धिविकासाचीहि विश्वसनीय माहिती मिळत नाहीं. कांहीं मुलें जन्मतःच वेडीं निपजतात; हिंदुस्थानांत आलेल्या या कुटुंबांची सर्व माहिती उपलब्ध झाली, तर मोठेपणीं या कुटुंबांतील मुलांच्या अंगीं नेभळटपणाचीं लक्षणें वसत असल्याचें दिसून येईल व हीं मुलें आणि इतर मुलें यांतील फरक स्पष्टपणें नजरेस येईल असें वाटतें. परंतु हा फक्त अंदाज आहे; अशीच गोष्ट कां घडावी याबद्दल सबळ कारण सांगतां येत नाहीं. एकंदरींत गुन्हेगारांपैकीं बर्‍याच लोकांनां वेड लागतें हें खरें आहे. परंतु अंदमानांत गेल्यावर १० वर्षांनीं पुरुष लग्न करितो; तेवढ्या मुदतींत वेडाचें लक्षण सामान्यतः दिसून येतें. स्त्रियाहि पांच वर्षांनंतर लग्न करितात. एवढी मुदत बहिष्करणास पुरेशी आहे; या मुदतींत त्यांचें मानसिक दौर्बल्य दिसून आलें म्हणजे त्यांनां प्रत्यक्ष वेडें जरी ठरविण्यांत आलें नाहीं तरी ते लग्न करण्यास अयोग्य असल्याबद्दलची नोंद व्हावी हें बरें. असें करणें कांहीं अशक्य नाहीं. असो.

काळ्यापाण्याच्या प्रदेशाची ओळख वरती झाली तेवढी पुरे आहे. आतां अफगाणिस्तानकडे वळूं.