प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

सुमात्रा.- सुमात्रा येथील संस्कृति ही मूळची हिंदूच आहे. दक्षिणेकडील द्वीपसमूहांत सुमात्रा द्वीपासच हिंदुसंस्कृतीचा प्रथम लाभ झाला. सुमात्रा बेटांत पदांग येथें कांहीं शिलालेख सांपडले, त्यांवरून तेथें ७ व्या शतकांत एक बलाढ्य हिंदु राज्य अस्तित्वांत होतें असें दिसून येतें. या बेटांत हिंदु संस्कृतीचे अवशेष अत्यंत विपुल आहेत. पण ते यवद्वीपाएवढे महत्त्वाचे नाहींत. या लेखांमध्यें सुमात्रा बेटास पहिलें यवद्वीप म्हटलें आहे. लुतान नांवाच्या गांवीं अनेक हिंदू देवळें आहेत आणि फंफन नदीच्या कांठीं मौलताकू येथें अनेक हिंदू अवशेष सांपडतात. पालन अर्जनी येथें अनेक संस्कृत शिलालेख आहेत व या द्वीपांत वापरल्या जाणार्‍या अनेक भाषांमध्यें संस्कृत शब्द आहेत. येथील लोक अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाची उपासना करितात. कालांतरानें येथें जावांतून अनेक हिंदू लोक आले, तथापि पुढें ज्या वेळेस मुसुलमानांच्या स्वार्‍या झाल्या त्या वेळेस सुमात्रा येथील लोक बौद्ध असल्यामुळें व जावांतून आलेले लोक शैव असल्यामुळें त्यांच्यानें मुसुलमानांच्या घाल्यास एकजुटीनें विरोध करतां आला नाहीं. कालांतरानें मुसुलमानी संप्रदाय सर्वमान्य झाला आणि या द्वीपांतील हिंदुत्व नष्टप्राय झालें.