प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

जंत्रीचें प्रयोजन.- या अनेक भाषांची कंटाळवाणी जंत्री वाचकांच्या पुढें मांडण्याचें प्रयोजन एवढेंच कीं, भारतीय विद्यांचा प्रसार होत असतां निरनिराळीं राष्ट्रें व लोक उर्फ निरनिराळ्या भाषा बोलणारे लोकसमुच्चय हिंदु संस्कृतीच्या प्रसारानें कितपत संस्कृत झाले याची कल्पना यावी. नरमांसभक्षकांपासून कांहीं अंशीं सुधारलेल्या राष्ट्रांपर्यंत सर्व प्रकारचे लोक या पूर्वेकडील द्वीपकल्पांत आणि त्याच्या दक्षिणेच्या द्वीपसमूहांत होते. त्या निरनिराळ्या लोकांचें विविधत्व आणि त्यांच्या संस्कृतींचें स्वरूप हीं विशदपणें मांडावयास भाषाविशिष्ट लोकसमुच्चयांचा हिशोबच फार उपयुक्त असतो. असंस्कृत राष्ट्रांमध्यें राजपद विशेष अस्थिर असावयाचें आणि त्याच्या अधिकाराचें क्षेत्रहि फारच नियमित असावयाचें. यांचा इतिहास म्हणजे तात्पुरता कोण कोणाच्या उरावर बसला  याचा इतिहास होय. या प्रकारचा सर्व राजकीय इतिहास उपेक्षणीय होय. या लोकसमुच्चयांत जे जरा प्राधान्य पावलेले आणि राष्ट्रस्वरूपास पोंचलेले असतील त्यांविषयीं तेवढी आपणांस सविस्तर माहिती हवी आणि यासाठीं कांबोज, यवद्वीप, बलि, अनाम, टाँकिन आणि ब्रह्मदेश, यांविषयीं तेवढी सविस्तर माहिती देऊन बाकीच्यांविषयीं नुसत्या भाषाविशिष्ट लोकसमूहांच्या सामुच्चायिक आयुष्याची गोळाबेरीज आह्मीं दिली आहे.