प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
 
अनामचा इतिहास.- आतां फक्त पूर्वेकडील उपभारताच्या पश्चिमभागांतील टाँकिन व कोचिनचीन या राज्यांचा इतिहास सांगण्याचें राहिलें आहे. या दोन राज्यांतील लोक, भाषा लिपी, राज्यव्यवस्थी व चालीरीती, या दृष्टींनीं एकसारखे आहेत. हीं एकाच वंशांतलीं दोन निरनिराळीं राष्ट्रें असावींत अशी भावना होते; पण त्यांचा प्राचीन इतिहास पाहतां, त्या दोघांत सारखा द्वेषभाव होता असें दिसून येतें. दोघांनां सामान्य असें नांव म्हणजे अनाम हें होय. या दोन देशांच्या इतिहाससाधनांविषयीं पाहतां, चिनी इतिहासकारांपासून आपणांस चांगली खरी माहिती मिळूं शकते.  या बाबतींत टाँकिनी लोकांचे सांवत्सरिक-ग्रंथ (year-books) अत्यंत अविश्वसनीय होत. या ग्रंथांत एक काल चार हजार सातशें वर्षांचा व दुसरा दोन हजार वर्षांचा आहे. यांपैकीं पहिल्या भागांत पुराणकथा आहेत, व दुसर्‍यांतील बराचसा भाग संशयास्पद आहे. या सांवत्सरिक ग्रंथांशिवाय इ. स. ९४० ते १८२० पर्यंत झालेल्या राजांची यादी, प्रत्येकाच्या कारकीर्दीसह लिहिलेली सांपडते. प्रत्येकाची कारकीर्द सरासरी १३,१४ वर्षें निघते व वरील कालांत सात राजघराणीं होऊ गेलीं, यावरून या देशांत किती अव्यवस्था व अराजकता असेल याची सहज कल्पना येण्यासारखी आहे. या दोन राज्यांचा इतिहास सादर करितांना त्यांतील निवडक भाग घेऊन महत्त्वाच्या प्रश्नांवर जोर देणें बरें.