प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
कांबोज.— येथील लोकांवर भारतीय संस्कृतीचा परिणाम बराच झालेला दिसतो. यांनां ख्मेर असें म्हणतात. ख्रिस्ती शकाच्या दहाव्या शतकांत या ख्मेर लोकांचें साम्राज्य फार विस्तीर्ण असून तें बंगालच्या उपसागरापासून पीतसमुद्रापर्यंत पसरलें होतें. त्या राज्याचे ६० प्रांत होते. या साम्राज्याची वाढ करतांना त्यांनां शाम, लाओतिन, सयामी इत्यादि लोकांशीं युद्धें करावीं लागलीं. त्यांचा चिनी बखरकारांनींहि गौरवयुक्त उल्लेख केलेला आढळतो. यांच्या राजधानीचें शहर अंकोरथोम (महा अंकोर) याची स्थापना ख्रिस्ती शकाच्या ९ व्या शतकांत झाली. या शहराची पूर्ण वाढ बाराव्या शतकांत 'अंकोरवात' या नांवाचें देवालय बांधलें त्या वेळीं झाली असावी. या शहराचे जे अवशेष आहेत त्यांमध्यें दिसून येणारें हस्तकौशल्य व कलानैपुण्य हीं लक्षात घेतां व तेथील ख्मेर लोकांच्या बौद्धिक अवनतीकडे पाहिलें असतां कांहीं विद्वानांचा जो तर्क आहे कीं, कांबोज देशास जें वैभव प्राप्त झालें होतें तें ८ व्या पासून १४ व्या शतकापर्यंत त्या देशांत असलेल्या एका हिंदु वसाहतीमुळेंच प्राप्त झालें होतें, तो खरा आहे असें वाटूं लागतें.
१३ व्या शतकामध्यें प्रथम सयामी व नंतर अनामी लोकांच्या स्वार्यांमुळें ख्मेरांच्या साम्रज्यास उतरती कळा लागली, व तेथील राजघराण्यामध्यें तंटें सुरू झाल्यामुळें यादवी माजली. यांमुळें त्या साम्रज्याचा लवकरच नाश झाला. अठराव्या शतकामध्यें या राज्यांत फारच थोडा प्रदेश असून तें सयाम आणि अनाम या दोहोंचेंहि मांडलिक बनलें होतें. इ. स. १८६२ मध्यें फ्रान्सच्या मध्यस्थीमुळें या राज्यास शांततेचा लाभ झाला आणि सयाम आणि अनामपासून कांहीं प्रांतहि परत मिळाले.