प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

कांबोजांतील ब्राह्मण :— ब्राह्मणीधर्म कांबोजमध्यें बराच काळपर्यंत प्रचलित असल्यामुळें आजहि त्याचे अनेक अवशेष दृष्टीस पडतात. त्यांपैकीं मुख्य म्हटले म्हणजे 'अंकोरवात' 'अंकोरथोम' इत्यादि प्राचीन मोठमोठीं देवालयें, मूर्ती, लिंगे (हीं तर बौद्ध देवालयांत अद्यापिहि दृष्टीस पडतात), व बकु अथवा प्राम (ब्राह्मण) ही जात, इत्यादि होत. प्राम यांस बरोहेत (पुरोहित) असेंहि म्हणतात.

बकु या शब्दाची नीटशी व्युत्पत्ति लागत नाहीं; तथापि ते ब्राह्मणांचे वंशज आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे. त्याप्रमाणेंच बरोहेत हें त्यांनां लागणारें उपपद एका काळीं ते राजपुरोहित होते ही गोष्ट स्पष्टपणें सुचवित आहे. या जातींतील पुरुषांची संख्या सुमारें नऊ दहाशें आहे (१९१०). आपल्याच जातींत विवाहसंबंध केला पाहिजे असा यांच्यांत पूर्वीं कडक निर्बंध असे व आतां जरी इतर जातींशीं शरीरसंबंध करण्याची त्यांनां मोकळीक मिळाली आहे तरी सामान्यतः कोणीहि अद्यापि खुषीनें जातीबाहेर विवाह करीत नाहीं. सध्यां हे जरी इतरांप्रमाणेंच बौद्धसंप्रदायी झाले आहेत तरी त्यांच्यांत कांहीं विशेष निर्बंध असून त्यांनां त्यांच्या पूर्वींच्या श्रेष्ठत्वापैकीं कांहीं विशिष्ट हक्क अद्यापीहि आहेत. ते अद्यापीहि शिव व विष्णु यांची उपासना करतात आणि अहिंसेचा नियम जरी ते इतका कडक रीतीनें पाळीत नाहींत, तरी त्यांचा आचार फार सोंवळेपणाचा आहे. हे लांब शेंडी ठेवतात. ५० वर्षांपूर्वीं सर्व बकु जातीस कर माफ असत. परंतु अलीकडे तेथील राजे हे हक्क कमीकमी करीत आहेत. एखाद्या बकूनें गुन्हा केल्यास त्याची चौकशी त्याच जातीच्या लोकांपुढें होते. त्याला केव्हांहि फांशीची शिक्षा होत नाहीं व कैदेची शिक्षा मिळाली तरी एखाद्या बकु जातीच्या मनुष्याकडेच त्याला ठेवण्यांत येतें; व ही शिक्षा त्याला जातीच्या मुख्याकडून मिळते.

जुळीं मुलें झाल्यास तीं राजाचीं गुलाम व्हावयाचीं व बेवारस इसमाची मालमत्ता सरकारजमा करावयाची हे दोन कायदे बकु जातीस लागू नाहींत. त्या जातींतील बेवारस इसमाची मालमत्ता जातीस मिळते. त्यांनां राजकन्यांशीं लग्न करावयाची मोकळीक असते. त्यांच्या मुख्यांपैकीं एकजण माख (माघ) महिन्यांत एक उत्सव होतो त्या वेळीं तीन दिवस माघ राजा होतो व त्या वेळीं त्याला राज्याचा वसूल जमा करण्याचाहि हक्क असतो. सध्यांच्या मागील राजा नारोदाम (नरोत्तम) यानें हे सर्व हक्क कमी केले, परंतु त्यांच्यापैकीं ७।८ मुख्य इसमांस अद्यापीहि एका प्रांतांतून वार्षिक देणग्या घेण्याचा हक्क आहे. राजवंशांतील मुख्य शाखेची नकल झाल्यास दूरच्या नातेवाईकांपेक्षां बकु जातीच्या राज्यावर जास्त हक्क आहे अशी सर्व लोकांची, जरी असा कोठें नियम लिहिलेला नाहीं, तरी दृढ समजूत आहे. बकू लोकांचें असें म्हणणें आहे कीं त्यांनां पूर्वीं असलेल्या हक्कांच्या मानानें सध्यांचे हक्क कांहींच नाहींत. राजवाड्यांतील मूर्ती व एक विशिष्ट पवित्र तरवार हीं बकूंच्या ताब्यांत असतात. वास्तविकपणें हे वरील पौरोहित्याचे अधिकार सर्व बकु जातीच्या लोकांस असतात, पण त्यांच्यापैकीं बरेचसें शेतकी वगैरे धंदे करितात त्यामुळें त्यांच्यापैकीं मुख्य सात आठ असामीच कायते पौरोहित्य करितात.

राजास राज्याभिषेक करणें, वार्षिक समारंभामध्यें राजास शंखोदक देणें, राजपुत्राच्या जन्माच्या प्रसंगीं त्यावर शंखोदक प्रोक्षण करणें, राजपुत्रांचे चौलविधी करणें, इत्यादि सर्व कामें या पुरोहितांकडेच असतात. युद्धप्रसंगीं ते इन्द्रानें दिलेली पवित्र तरवार, देवांच्या मूर्ती वगैर सैन्याबरोबर नेतात व राजास जय मिळण्याकरितां अभिषेक करून कांहीं पाण्यानें सैन्याचें प्रोक्षण करितात. सर्व शुद्धीचे विधी करावयाचा यांचाच अधिकार असल्यामुळें जंगलांतून नवीन पांढरा हत्ती धरून आणला म्हणजे नगरप्रवेशाचे वेळीं त्यावर हे उदकप्रोक्षण करितात. राणी गर्भवती झाली म्हणजे गर्भाचें रक्षण करण्याकरितां हे तिच्या गळ्यांत एक सोन्याची सांखळी घालतात.

बकूनंतर दुसरी महत्त्वाची जात म्हटली म्हणजे आचार (आचार्य) ही होय. हा गृहस्थांचा वर्ग असून केव्हां केव्हां बंकूच्या ऐवजीं चौल वगैरे विधी करितो. हे वेदांत वगैरे बाबतींत व प्राचीन कथांमध्यें निष्णात असून आचारानें फार शुद्ध असल्यामुळें यांनां इतर जनतेकडून चांगला मान मिळतो.

ब्राह्मणानुयायी हिंदू सयामकडे किती गेले, कोणत्या कारणांमुळें गेले, हें समजण्यासाठीं आपणांस थोडासा तर्क केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. अशी कल्पना होते कीं, ते दक्षिणेकडील जलमार्गानें तसेच आसामकडून भूमार्गानेंहि गेले असावेत. दक्षिणेकडून जलमार्गानें जातांना त्यांनीं मध्यंतरी जावा येथें थोडेंसें प्रस्थान ठेवलें असावें. त्यांचा समुदाय किती मोठा असावा हें निश्चयानें सांगतां येत नाहीं; तथापि सयाममधील दैवतें, पारमार्थिक विचार, भाषा, कला आणि शासनसंस्था यांवर ज्या अर्थीं भारतीय शिक्का दृष्टीस पडतो त्या अर्थीं यांचा समुदाय बराच मोठा असला पाहिजे, आणि तद्देशीयांची संस्कृति भारतीय संस्कृतीच्या मानानें दुर्बल असली पाहिजे.