प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
कोचिनचीन.- इ. स. २३६ पर्यंतच्या, या दोन राज्यांच्या हकिकतींतील मुख्य गोष्ट म्हणजे, कुलिएन नांवाचा कोचिनचीन मनुष्य चिनी सत्ता झुगारून देऊन, देश्य राजसत्ता स्थापन करण्याच्या कामांत यशस्वी झाला, पण या कामीं त्याला चिनी बादशहास खंडणी देणें भाग पडलें ही आहे. कुलिएननें कौची येथील जुनी राजधानी बदलून ती लिंग येथें म्हणजे हल्लीं सिनोए किंवा सिनोआ आहे त्या ठिकाणीं आणली; आपल्या राज्यालाहि त्यानें हेंच नांव दिलें. नंतर कोचिन-चीनचा राजा व चिनी बादशहाचा सुभेदार यांच्यामध्यें ज्यावेळीं लढाई सुरू झाली तेव्हां कुलिएननंतर गादीवर आलेल्या राजानें, मध्यदेशाच्या राजाचें प्रभुत्व मान्य केलें. या अशांततेचा फायदा घेऊन, दुसर्या सुई घराण्यांतील हुशार पण लुटारू बादशहा युंगटी यानें कोचिन-चीनच्या राज्यामध्यें लुटालुट करण्याकरितां मोहीम काढली. सेनानायकत्व लिओफंग या सेनापतीस देण्यांत आले. लिओफंगच्या हत्तीनीं शत्रुंची बरीच नासधूस केली. लढाई पूर्णपणें जिंकण्यांत येऊन, लिंग राजधानी काबीज करण्यांत आली. त्या वेळीं सिंहासनगृहांत टांगलेले कोचिन-चीनच्या राजांच्या वंशावळीचे १८ तक्ते जेत्यांनीं आपल्या देशांत नेले. त्या वेळचा राजा फंकी म्हणून होता व तो आपल्या घराण्यांतील १८ वा पुरुष होता. राजधानी उध्वस्त झाल्यावर, कोचिन-चीनच्या राजानें सुमारें इ. स. ८०८ मध्यें आपली राजधानी चिन् या समुद्रकिनार्यावरच्या शहरांत नेली. चिन् हें १७ उत्तर अक्षांशावर असून, हुएच्या जरा उत्तरेस चिनचिंग बंदराजवळ आहे; याला कुएचिन असेंहि नांव आहे. पण हें नांव त्या देशाचेंहि आहे, तेव्हा तें कसें पडलें, याविषयींची हकीकत अशी दिसते कीं, पोर्तुगीज लोकांनां, मलबार किनार्यावरील कोचीन हें एका शहराचें त्यांच्या ओळखीचें नांव, व हें कुएचिन नांव यांत व्यंजनांच्या दृष्टीनें बरेंच साम्य आढळून आलें; व या दोहोंतील फरक दाखविण्याकरितां त्याला त्यांनीं चीन हें नांव जोडून दिलें; कारण हा प्रदेश चीनपासून फारसा दूर नाहीं व शिवाय येथील लोकांचें व चिनी लोकांचें पुष्कळ बाबतींत साम्य आहे.
यापुढें, इ. स. ११६६ पर्यंत, यादेशाच्या सांवत्सरिक ग्रंथांतून कांहीं इतिहास आढळून येत नाहीं. एवढें मात्र निःसंशय आहे कीं, त्या कालांत चीनचें प्रभुत्व विशेष असे. इ. स. १०७० नंतर संगघराण्यांतील चिंगसौ बादशहाच्या कारकीर्दींत वरीष्ठ चिनी अधिकार्यांनीं बंड केलें होतें पण तें पार मोडण्यांत आलें.