प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
जावानी.- जावा अथवा जावानी भाषी ही मलायी राष्ट्रापेक्षां एका जुन्या राष्ट्राची भाषी असून ती थोड्या कालापूर्वींच सर्व जाव बेटावर प्रचलित होती ही गोष्ट मलायी लोकांसहि मान्य आहे. जावा अथवा यवद्वीप हें पूर्वीं एकाच राजाच्या सत्तेखालीं होतें. हे राजे सुसुपन वंशांतील असून त्यांस रतु अगोंग अथवा सुसुहुनंग असें उपपद असे. त्यांची राजधानी कुरिपन, सूर्यकर्त येथें असे. हें राष्ट्र बलाढ्य, धाडशी व दाट वस्तीचें असून मुसुलमानांनीं ख्रि. श. १४०० च्या सुमारास आपली सत्ता स्थापण्यापूर्वीं या राष्ट्राची पूर्वसमुद्रांत अप्रतिहत सत्ता असून त्यांनीं सुमात्रा, बोर्निओ व मोलक्कापर्यंत स्वार्या करून विजय संपादन केले होते. यूरोपीयांचा त्यांच्याशीं संबंध आला तेव्हां त्यांच्या सत्तेस उतरती कळा लागली होती, परंतु तेव्हा सुद्धां त्यांनीं मलाक्कामधील पोर्तुगीज सत्तेलाहि वरचेवर डळमळावयास लाविलें.
जावमधील भाषांचे अन्तःप्रदेशस्थ भाषा व तीरप्रदेशस्थ भाषा असे दोन मुख्य वर्ग करतां येतील. तीरप्रदेशस्थ म्हणजे किनार्यावरील प्रदेशांतील भाषा या ज्यास्त अपभ्रष्ट आहेत. परंतु अन्तःप्रदेशस्थ म्हणजे बेटाच्या मध्यभागीं असलेल्या प्रदेशांतील भाषा या संस्कृत भाषेशीं फारच सदृश्य आहेत. त्या भाषांतून अगदी साध्या पदार्थांनांहि संस्कृत शब्दच आढळतात. जो थोडा उच्चारामध्यें फरक आढळतो तो तेथील लिपीच्या अपूर्णत्वामुळें झालेला दिसतो.
जावा भाषेची मातृकामाला फारच चमत्कारिक असून तिचें देवनागरीशीं मुळींच साम्य नाहीं. या मालेंत २० वर्ण आहेत व ए, इ, उ, ओ हे चार स्वर आहेत. परंतु उच्चारांची संख्या बरीच मोठी आहे. हे वर्ण उजवीकडून डावीकडे लिहीत जातात.
जावाबेटाच्या अंतर्गत भागांत बरेच प्राचीन शिलालेख सांपडतात. असाच एक शिलालेख थुनबर्ग यास नीलपर्वताजवळ पदितुलिस येथें सांपडला होता. त्यामध्यें साडेआठ ओळी असून तो दोन फूट रूंदीच्या एका दगडी स्तम्भावर खोदलेला होता. त्यांतील अक्षरें उजवीकडून डावीकडे लिहिलेलीं होतीं, परंतु तीं कोणासच लावतां आलीं नाहींत. जावा बेटांत असलेल्या बागेलेन आणि सुंदा या भाषा जावा भाषेहून अगदीं भिन्न आहेत. बागेलेन भाषेपासून सुलु भाषा निघाली असें म्हणतात परंतु या बाबतींत लेडेन यानें कांहीं संशोधन कलेलें नाहीं. जावा भाषेंतील वाङ्मय मलायी वाङ्मयाप्रमाणेंच आहे आणि या वाङ्मयापासूनच मलयु भाषेंतील वाङ्मय तयार झालें आहे ही गोष्ट वरती सांगितलीच आहे. या भाषेंतील ‘कुग्गविन’ अथवा ‘चरित्र ग्रंथ’ यांमध्यें पौराणिक कथा व तद्देशीय वीरपुरूषांच्या कथा असतात व हे ग्रंथ अगदीं भारतीय पुराणांसारखे असतात. जावानी धर्मशास्त्रग्रंथ अथवा कायद्यांचे ग्रंथ फारच प्राचीन असून ते सर्व पूर्वद्वीपांत प्रसिद्ध आहेत. जावामधील वाङ्मयाचें विस्तृत वर्णन पुढें यावद्वीपसंस्कृतीच्या प्रकरणांत {kosh प्रकरण ६ वें.}*{/kosh} केलें आहे.
मलयु भाषेप्रमाणें जावा भाषेचा अभ्यास यूरोपीयांनीं विशेषसा केलेला दिसत नाहीं. जावामधील पौराणिक कथांचीं संविधानकें वगैरे व कांहीं शब्दकोश बटेव्हिया येथील एशियाटिक सोसायटीने प्रसिद्ध केले आहेत. ‘ईस्ट इंडिया कंपनीचा उदय आणि वाढ’ या डच ग्रंथांत मलयु आणि जावा या भाषांची तुलना केली आहे. मुसुलमानांनीं कुराणाचें जावानी भाषेंत भाषांतर केलें आहे.
बलि व मदुरा द्वीपांत असलेल्या त्याच नांवांच्या भाषा या जावा भाषेच्याच पोटभाषा असाव्या. या बेटांतील बहुतेक लोक आपले परंपरागत धर्म पाळतात. ते दिसण्यांत हिंदूंसारखे दिसतात. कपाळावर गंध व कुंकू लावतात व हिंदूप्रमाणेंच तेथील बायका सती जातात. ते इन्द्र, सूर्य आणि विष्णु यांची उपासना करितात. जावांतील लोकहि जे अद्याप ख्रिस्ती कळपांत शिरले नाहींत ते वरील उपास्यांची पूजा करितात. या लोकांसंबंधीं व त्यांच्या धर्मशास्त्रासंबंधीं माहितीचीं साधनें लेडेन याजवळ नसल्यामुळें त्यानें यांचें फारसें वर्णन दिलें नाहीं.