प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

टाँकिन.- कोचिनचीनप्रमाणें पुष्कळ दिवसपर्यंत टांकिन हेंहि चिनी बादशहांच्या ताब्यांत होतें. तें पुढें युनानमधील पिलोटो राजांच्या ताब्यांत आले व इ. स. ९०७ मध्यें जेव्हां तंग राजघराणें लयास गेलें तेव्हां कोठें या देशाला स्वातंत्र्य मिळालें.
चिनी लोकांबरोबर बर्‍याच लढाया केल्यानंतर चिनी लोकांनीं ११६४ मध्यें लिकिएन्झोला त्या देशाचा स्वतंत्र राजा म्हणून मान्य केलें. स्युव्हेनाच्या मुळें कोचिनचीनलाहि ११६६ पासून स्वातंत्र्य मिळालें. कुब्लइखानाच्या कारकीर्दींत मंगोलियन लोकांनीं केलेल्या स्वार्‍यांमुळें या दोन्ही देशांनां फार त्रास सोसावा लागला. १२७२ मध्यें त्याच्या एका हुटानगोटा नांवाच्या सरदारानें युनान जिंकून घेऊन टांकिमध्यें एकदम प्रवेश केला व सांगकानदीपर्यंत चाल करून किऔंची नांवाची अत्यंत जुनी राजधानी उध्वस्त करून टाकली. तथापि तेथील भयंकर उष्णतेमुळें तो परत आपल्या मालकाकडे गेला. १२७७ मध्यें टांकिनचा त्या वेळचा राजा चिंगहिवेन याला ही नवी जुलमी सत्ता मान्य करावी लागली; परंतु पुढें जेव्हां मंगोलियन बादशाहानें जबर खंडणीची मागणी केली तेव्हांमात्र या टांकिनी राजानें धीर करून त्याचा प्रतिकार करण्याचें ठरविलें; तेव्हां त्याच्यावर पुन्हा हल्ला झाला त्यांत तो मरण पावला. पुढें त्याचा मुलगा व गादीचा वारस चिसिबेन याला १२८०, १२८५, १२८७ या सालीं कुब्लइखान यानें केलेल्या हल्ल्यांनां तोंड द्यावें लागलें; आणि त्यांत टांकिनी लोकांनीं दाखविलेल्या धैर्यामुळें आणि त्या देशांतल्या अत्यंत उष्ण हवेमुळें शत्रुचाच पूर्ण मोड झाला. त्यावेळीं कांबोजपर्यंत मंगोली लोक आंत घुसले होते, तथापि त्यांनांच माघार घ्यावी लागली. मंगोलियन बादशाहाच्या सेनापतींनीं असल्या दूरदूरच्या व त्रासदायक स्वार्‍या करण्याचें सोडून देण्याबद्दल त्याचें मन वळविलें, आणि टांकिनच्या राजानेंहि समेटाचें बोलणे सुरू केलें. त्यानें कैद केलेल्या मंगोली शिपायांस फार दयाळुपणानें वागविलें व त्यांनां मोकळे करून घरोघर जाण्यास परवानगी दिली. शिवाय खंडणीदाखल एक सोन्याचा पुतळा मंगोलियन बादशाहाला नजर करण्याचें त्यानें कबून केलें. चिसिवेन १२९० मध्यें व कुब्लइखान १२९४ मध्यें मरण पावला; तेव्हांपासून या दोन राज्यांमध्यें शांतता प्रस्थापित झाली. टांकिनच्या राजांनां राजे म्हणून बादशाहांनीं मान्य केलें, व तेहि नियमितपणें बादशाहाच्या दरबारी खंडणी पोहोंचती करीत असत. चिनी लोकांनीं दिलेल्या माहितीवरून असें दिसतें कीं, त्यावेळीं त्या राज्याचे एकंदर तेरा प्रांत होते; ३२ शहरें पहिल्या प्रतीचीं व २४० दुसर्‍या व तिसर्‍या प्रतीचीं मिळून होतीं. कोचिनचीन मध्येंहि कुब्लइखानाच्या मरणानंतर सर्व भीति व संकटें नाहींशीं होऊन शांतता नांदूं लागली.
१३६८ मध्यें मिंग घराणें सत्ताधीश झाल्यानंतरहि शूर व उद्योगी हंगौ याच्यामुळें चिनी बादशाहांशीं या दोन संस्थानांच्या असलेल्या नात्यांत कांहीं फरक झाला नाहीं. बादशाहानें टांकिनच्या राजाला स्वतंत्र राजा म्हणून कबूल केलें; व त्या राजानें कोचिनचीन, सयाम व कोरिया येथील राजांप्रमाणेंच चिनी वर्षमानपद्धति (Calendar) आपल्या राज्यांत सुरू केली. बादशाहानें शिवाय चिंगचिंग उर्फ कोचिनचीनच्या इटाटाहा नांवाच्या राजाला आपण तख्तनशीन झाल्याची आनंदाची बातमी कळविली, आणि बुद्ध, टेंकड्या व नद्या यांच्या आत्म्याप्रीत्यर्थ होणार्‍या एका यज्ञसमारंभास येण्याबद्दल त्या राजाला निमंत्रण पाठविलें; आणि हा समारंभ पार पाडल्यानंतरच चिनी बादशाहानें कोचिनचीनच्या राजानें दिलेल्या सार्वभौमत्वाच्या मान्यतेचा व आभारप्रदर्शनाचा स्वीकार केला. इटाटाहा या कोचिन-चीनच्या राजाच्या हातून पूर्वीं बर्‍याच चांगल्या गोष्टी झाल्या होत्या; त्यानें कांबोजच्या राजाच्या ताब्यातून आपला देश सोडवून स्वतंत्र केला होता; तसेंच आपल्या राज्यांतील किनार्‍याला उपद्रव देणार्‍या एका समुद्रवरील लुटारूंच्या ताफ्याचा त्यानें १३७३ मध्यें नाश केला होता; आणि त्यांच्या वीस कुग (चिनी बोटी) पकडून त्यांच्या जवळून ७०००० पौंड किंमतीची लूट मिळवून ती त्यानें चीनच्या बादशाहाकडे पाठवून दिली होती. परंतु त्याचा स्वभाव दुष्ट असल्यामुळें सर्व त्याचा द्वेष करीत; आणि त्यांत टांकिन व कांबोज यांच्यामध्यें शत्रुभाव वाढल्यामुळें त्यांच्या चकमकी झडून त्या देशांचा जो बराच नाश होत होता त्यामध्यें इटाटाहा व त्याचे वंशज यांचें नेहमीं अंग असे या गोष्टीची भर पडली होती. मध्यवर्ती राज्यांतील सत्ताधीशानीं टांकिन व कोचिनचीन येथील आपल्या मांडलिक राजांनां तह  करण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांच्या सांगण्याचा मुळींच उपयोग झाला नाहीं. त्यामुळें १४०३ मध्यें बादशाही पदावर आरूढ झालेल्या यंगलो किंवा ताईतसंग या बादशाहाला टांकिनवर चंगपो नांवाच्या आपल्या सेनापतीच्या हाताखाली मोठें सैन्य देऊन पाठवावें लागलें. यानें सर्व देश जिंकून घेतला आणि चिंग राजघराण्यांतला कोणीच वारस न राहिल्यामुळें यालाच त्या देशाचा सुभेदार नेमण्यांत आलें.