प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
थइ :— थइ अथवा तहइ ही भाषा सयामी लोक वापरतात आणि आपल्या भाषेंत ते आपणां स्वतःस तहय असेंच म्हणवितात. ब्रह्मी लोक त्यांनां 'स्यन' असें म्हणतात. त्याचाच पोर्तुगीज लोकांनीं सिअम, सिअओम असा अपभ्रंश केला व शेवटीं सयाम हें सर्व सामान्य नांव या लोकांस मिळालें. {kosh ब्रह्मी 'शन' या उच्चाराचा जो (र्हम) शब्द आहे तो शान लोकांस उद्देशून ब्रह्मी लोक वापरतात व सयामी लोकांस 'योधया' असें म्हणतात. योधया हा शब्द सयामची राजधानी 'अयुथ्य' या शहराच्या नांवावरून निघाला आहे. तथापि सयामी भाषेंत 'स्येम' 'सायम्' हे संस्कृत 'श्याम' शब्दापासून निघालेले दोन्हीहि शब्द प्रचारांत आहेत. परंतु सयामी लोक स्वतःस 'थइ' असें म्हणवितात—मॅक्सवेल.}*{/kosh}
फ्रान्सच्या बादशहाचा खास वकील म्हणून ल लूबेर हा फ्रेंच मनुष्य १६८७-८८ मध्यें सयामला गेला होता. त्यानें या राष्ट्राची फार बिनचूक माहिती लिहून ठेविली आहे. हें राष्ट्र भरतखंडाच्या पूर्वेकडील फार संस्कृत राष्ट्र समजलें जात असे. या राष्ट्राचे ल लूबेरच्या माहितीप्रमाणें दोन भाग होते. एक तइ लोकांचा व दुसरा तइ यइ लोकांचा. 'तइ यइ' हे रानटी लोक होते, परंतु ते आपणास 'तइ यइ' म्हणजे 'महा तइ' असें म्हणवीत व म्हणून दुसरे तइ आपणास 'तइ नोश' म्हणजे 'लहान तइ' म्हणवीत. बुकॅनन यानें या देशांत अनेक जातींचे लोक होते असें म्हटलें आहे व त्यापैकीं तिहींच्या भाषांचे नमुने व शब्दकोश दिले आहेत. ल लूबेर याचा ग्रंथ, बुकॅननचे कोश व कांहीं मिशनर्यांनीं त्याच्या म्हणी गोळा करून केलेलीं भाषांतरें, एवढेंच काय तें वाङ्मय सयामी लोकांविषयीं यूरोपीय भाषांत उपलब्ध आहे.
लेडेन यानें तेथील लोकांपासून बरीच माहिती मिळविली आहे. या लोकांत ज्या मुख्य दोन जाती आहेत त्यांची नांवें तहय आणि 'तहय जहय' अशीं आहेत. यापैकीं दुसरें राष्ट्र फार जुनें असून त्रंगपासून पांच दिवसांच्या वाटेवर लिगोर येथें एका जुन्या देवळाच्या अवशेषांत त्यांचे कांहीं जुनाट शिलालेख आहेत, परंतु ते अलीकडच्या लोकांस वाचतां येत नाहींत. या दोन्ही राष्ट्रांची लिहिण्याची भाषा सारखीच आहे पण बोलण्याच्या भाषांत मात्र फरक आहे. तहय जहय हे लोक मेनाम आणि मेकॉन (कांबोजची नदी) यांच्या दरम्यान रहातात; आणि तहय हे लोक मेनाम नदीच्या पश्चिमेकडे राहतात.
थइ अथवा सयामी भाषा स्वतंत्र असून या भाषेंत बहुतेक एकाक्षरी शब्दांचाच भरणा आहे. हिचा चिनी भाषेशी कांहींसा संबंध दिसतो. विशेषतः या भाषेंतील अंक चिनीसारखेच आहेत. कांहीं शब्द पाली भाषेंतूनहि आले आहेत पण त्यांचा स्वरुपांत संक्षेप फार आढळतात. हिचें ब्रह्मी किंवा रुखेंग भाषांपेक्षां चिनी पोटभाषांशींच विशेष साम्य आहे ही गोष्ट या भाषेंतील, बोलणारांच्या दर्जाप्रमाणें सर्वनामांचा उपयोग, शिष्टाचाराची भाषा, दुसर्याची वाहवा करण्याची पद्धति, इत्यादि गोष्टींवरून सिद्ध होते. हिची रचनाहि अगदीं साधी आहे. सयामी लोकांची काव्यें पठण करण्याची पद्धति कांहीं लोकांच्या मतें अगदीं सामवेदपठनासारखी आहे, परंतु लेडेनच्या मतें ती चिनी पद्धतीप्रमाणें आहे.
थइ भाषेंत कांहीं शब्द ब्रह्मी किंवा मलयूसारखे आहेत पण यांची संख्या फार थोडी आहे.
थइ भाषेची वर्णमाला आकारानें व उच्चाराच्या बाबतींतहि पालीप्रमाणेंच आहे. या भाषेंत स्वरोच्चार वीस आहेत पण प्रत्येक उच्चारास स्वतंत्र वर्ण नाहीं. व्यंजनें ३७ आहेत. थइ भाषेंत प्रत्येक विषयावर बरेंच वाङ्मय आहे. या भाषेंत काव्यें, चरित्रें ऐतिहासिक व पौराणिक कथा यांचा भरणा पुष्कळ आहे. कांहीं सयामी राजे नामांकित कवी होते आणि त्यांचीं पुष्कळ काव्यें उपलब्ध आहेत. त्यांचे वैद्यकीय ग्रंथ फार प्राचीन आहेत. सयममधील धर्मशास्त्रीय ग्रंथ पूर्वेकडील देशांत फार प्रसिद्ध आहेत. ल लुबेर यानें त्यांपैकीं तिहींचा उल्लेख केला आहे. 'प्र तम नोन', 'प्र तमर', 'प्र राज कम मनोत' हे ते ग्रंथ होत. यांपैकी पहिल्या ग्रंथांत प्राचीन सयामी राजांचे कायदे संगृहीत आहेत. दुसर्यांत निरनिराळ्या अधिकार्यांचे अधिकार व त्यांची कामें, त्यांचीं नावें, इत्यादि असून राज्यव्यवस्थेसंबंधीं नियम आहेत. तिसर्यांत पुरवणीदाखल नियम आहेत. यांपैकीं पहिला फार महत्त्वाचा आहे.
सयामी इतिहासामध्यें गेल्या एक हजार वर्षांत सयाम व त्याचे आसपासचे प्रांत यांमध्यें जेवढ्या गोष्टी घडल्या त्यांचें सविस्तर व कांहीं ठिकाणीं अतिशयोक्तिपूर्ण वर्णन आढळतें. या हजार वर्षांपूर्वींच्या ४०० वर्षांची हकीकतहि नखोब शहराच्या स्थापनेपासून या ग्रंथांत आढळते, पण ती जास्त त्रोटक आहे. तहयजहय घराण्याच्या इतिहासाचेहि कांहि ग्रंथ अद्यापि आहेत असें म्हणतात व ते सांपडल्यास त्यांतून कांहीं माहिती मिळण्याचा संभव आहे.