प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
पुनःस्वातंत्र्य - तथापि ही केवळ तरवारीच्या जोरावर प्रस्थापित झालेली शांतता अर्थांत थोडाच काळ टिकली. टांकिनी लोकांनां हा झालेला आपल्या स्वातंत्र्याचा नाश सहन होईना, त्यामुळें ते वरचेवर या परकीय सत्तेविरुद्ध बंडें करीत असत, आणि या त्यांच्या प्रयत्नांनां शेजारच्या कोचिनचीन वगैरे ठिकाणच्या लोकांकडून मदत मिळत असे. १४२२ मध्यें लिली नांवाच्या एका टांकिनी राजपुत्रानें एका लढाईमध्यें पूर्ण जय मिळविला, आणि आपण पूर्वींच्या चिनघराण्यांतील वंशज राजे आहोंत असें जाहीर केलें. ही गोष्ट घडली तेव्हां चीनमध्यें चिंगहोबा राज्य करीत होता. लिलीनें टी म्हणजे सत्ताधीश राजा अशी पदवी धारण केली आणि नवें घराणें सुरू केलें. सिंगहोफू या राजधानीला त्यानें सिटू असें नांव दिलें, त्याचा अर्थ पश्चिमवसति-स्थान आहे. शिवाय जुन्या किऔची याला टांकिन असें नांव दिलें. पुढें सर्व देशाचें पूर्वींचे जुनें न्गानग अथवा गेनन हें नांव जाऊन त्याला टांकिन हेंच नांव पडलें. या ली राजांनीं आपले स्वातंत्र्य कायम राखलें; व शिवाय १४६८ व १४७१ मध्यें लिहोआनें कोचिनचीन व युनान हे प्रांत आपल्या अम्मलाखालीं आणले, परंतु पुढें ते त्याच्या हातांतून गेले. १५४० मध्यें टांकिन येथें क्रान्ती होऊन तेथें पुन्हां चिनी लोकांचा हात शिरला; व टांकिनी लोकांनां चीनला खंडणी देणें भाग पडलें. १५५८ मध्यें कोचिनचीननें टांकिनी लोकांच्या सत्तेचें जूं झुगारून देऊन पुन्हां स्वातंत्र्य मिळविलें. याच सुमारास एका टांकिनी प्रधानानें जपानमध्यें व मराठे लोकांमध्यें प्रचलित असलेली एक नामधारी व एक खरा सत्ताधारी अशा दोघांच्या नांवानें राज्यकारभार चालविण्याची पद्धति टांकिनमध्यें सुरू केली. पहिल्या नामधार्याला डोंवाबोमा असें नांव असून तो देशांतील जुन्या राजघराण्यांतील वंशज असे; पण देशाच्या राज्यकारभारांत त्याला कोणताहि भाग घेतां येत नसे; आणि दुसरा खरा सत्ताधारी खान ह्या नांवाच्या विजयी बंडखोराचा वंशज असून त्याच्याकडे राज्यकारभारचा सर्व अधिकार असे. या प्रकारची राज्यकारभारपद्धति १७४९ पर्यंत चालू होती.