प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
पूर्वेकडील द्वीपकल्प.- आतां पूर्वेकडील द्वीपकल्पाकडे वळलें पाहिजे, आणि अनाम, कांबोज, सयाम, अंकोर इत्यादि राष्ट्रांमध्यें असलेलें हिंदुत्व तपासून पाहिलें पाहिजे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे थोडेसे मुसुलमान वगळले असता हा सर्व प्रदेश अजूनहि हिंदूच आहे. बौद्ध म्हणजे हिंदूंपैकींच एक संप्रदाय होय आणि बौद्धांचें परमार्थसाधन जरी निराळें आहे तरी बौद्धांचें समाजनियमन करणारें धर्मशास्त्र हिंदूंहून निराळें नाहीं. ब्रह्मदेशांतील धर्मशास्त्रग्रंथ मनुप्रणीतच आहेत अशी समजूत आहे, हें वर सांगितलेंच आहे.
कॅम्बोडियामध्यें म्हणजे काम्बोजमध्यें अद्याप शैवसंप्रदायी लोक पुष्कळ आहेत. त्यांस चाम (Cham) असें म्हणतात. चाम स्त्रियांच्या पातिव्रत्याची तारीफ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या ११ व्या आवृत्तींत सांपडते. कांबोजांत अजून हिंदुत्वाचे पुष्कळ अवशेष सांपडतात. सयाममध्यें ब्राह्मणवर्ग आहे आणि तो जातिरूपानें आहे. तेथें ब्राह्मण मुख्यत्वेंकरून तीन कामांस लागतात. तीं तीन कामें म्हटली म्हणजे घराची वास्तुशांति करणें, सयामच्या राजाचा राज्याभिषेक करणें व लग्नासाठीं वधुवरांची पत्रिका जुळते किंवा नाहीं हें पहाणें. या सर्व गोष्टीनां ब्राह्मण लागतात असें नाई सुत, सयामच्या इंजिनियरिंग खात्यांतील एक कामदार, यांनी डॉ. केतकर यांस सांगितलें. (नाई म्हणजे राजमान्य राजश्री सुत हे पूर्वीं अमेरिकेंत हार्वर्ड येथें शिकत होते.) सयाममध्यें रामायणाचीं नाटकें होतात, आणि त्यांतील तोशकंठ (अच्या ऐवजीं ओ आला व सयामींत द नसल्यामुळें त येतो, तेव्हां तोशकंठ म्हणजे दशकंठ म्हणजे रावण.) रंगभूमीवर आला म्हणजे मुलें घाबरतात असें त्यांनीं सांगितलें.
या पूर्वेकडील देशाच्या संस्कृतीची चांगली कल्पना येण्यासाठीं तेथील भाषा आणि वाङ्मय यांचें विहंगमावलोकन अवश्य आहे. भाषेंतील शब्दसमुच्चयामध्यें जे परकीय भाषांचे निरनिराळे थर सांपडतात त्यांवरून ती भाषा बोलणार्या जनतेवर परकीयांचा झालेला संस्कार व्यक्त होतो. वाङ्मय आणि गोष्टी या देखील इतिहास दाखवितात. हिंदूंचा परिणाम इतर राष्ट्रांवर शोधावयाचा म्हणजे आपणांस तीन मुद्यांवर माहिती गोळा करावयाची. एक मुद्दा म्हटला म्हणजे विवक्षित राष्ट्राच्या भाषेंत संस्कृतसंभव शब्द किती रूढ आहेत, दुसरा मुद्दा हिंदुस्थानांतील इतिहासपुराणांतील किती कथानकें त्या लोकांत प्रचलित आहेत, आणि तिसरा मुद्दा ब्राह्मणांचें महत्त्व तेथें काय आहे. असे हे तीन मुद्दे आहेत. निरनिराळ्या भाषांची माहिती देणें म्हणजे निरनिराळ्या लोकसमूहांची माहिती देणें होय; आणि निरनिराळ्या भाषांच्या वर्णनाच्या अंगानें वर सांगितलेल्या तीन मुद्यांवरील माहिती देणें म्हणजे किती लोकांमध्यें भारतीयांनीं आपली करामत दाखविली याचा हिशोब घेणें होय. या हिशोबासाठीं ब्रह्मदेशापासून कांबोज, फिलिपाइनपर्यंत पसरलेल्या प्रदेशांत दिसून येणार्या भाषांचें आणि वाङ्मयांचें स्थूल अवलोकन आपण करूं.
यवद्वीप व त्याचीं मांडलिक राष्ट्रें वगळतां या सर्व प्रदेशास आज जरी एकत्व नाहीं तरी संस्कृतीच्या ऐक्याबरोबर वृद्धि पावणारें किंवा संस्कृतीच्या ऐक्यास कारण होणारें राजकीय ऐक्य एकाकाळीं येथें होतें हें निश्चित आहे.