प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
बलुचिस्तान.- आतां बलुचिस्तानाकडे वळूं. सध्यां येथील लोकसंख्येमध्यें हिंदूंचें प्रमाण दर हजारीं ४७ आहे. बलुचिस्तानचा व सिंधप्रांताचा इतिहास फारच संलग्न आहे. प्रत्यक्ष सिंधमध्यें आज फक्त शेंकडा २० लोक हिंदू आहेत. अफगाणिस्तानांतील शेवटच्या हिंदुराज्याची परिसमाप्ति ११ व्या शतकांत झाली. बलुचिस्तानचें हिंदुराज्यहि त्याच सुमाराला गेलें. राजानें आपल्यावर परचक्र आलें असतां कित्येक आसपासचे डोंगरी धनगर मदतीला बोलाविले आणि त्या डोंगरी धनगरांनी नंतर तें राज्य आपल्या ताब्यांत घेतलें. हे डोंगरी धनगर ब्राह्मणीधर्माचे हिंदू नव्हतेच. ते जर मुसुलमान नसले तर बौद्ध असण्याचा संभव आहे. ते पुढें महंमदीय झाले. बलुचिस्तानांत हिंदुत्वाचा आणखी एक अवशेष म्हणजे बेला नांवाचें एक शहर आहे. हें सिंध व इराण यांमध्यें चालणार्या व्यापाराचें केंद्र आहे. यास लासबेला असेंहि म्हणतात. "लास" हें लासी उर्फ लुमडी या रजपूत वंशाच्या नांवावरून लागलेलें उपपद आहे. सातव्या शतकामध्यें एक बौद्ध भिक्षु लासबेला येथें राज्य करीत होता. त्या वेळेस बलुचिस्तानांतील सर्व गंडावा प्रांत हा बुद्धानुयायी होता व सिंधमधील राजा त्या वेळेस ब्राह्मण होता. लासी हा बेला येथें ११ व्या शतकांत आला. अकराव्या शतकांत सिंधमधील अरब राजघराणीं मुसुलमान बनलेल्या रजपुतांनीं हांकलून दिलीं व तेंच रजपूत घराणें पुढें पुढें सरकत चाललें आणि त्यानें बेला येथें राज्य स्थापिलें. गंडावा प्रांताशिवाय मकरान नांवाचा एक प्रांत बलुचिस्तानांत आहे. त्या प्रांतावर बलुचिस्तानाच्या खानाचा नामधारी अंमल आहे. येथील मुख्य जात म्हटली म्हणजे 'गिचकी' ही होय. गिचकी हे आपणांस रजपूत वंशाचेच म्हणवितात, आणि ते सतराव्या शतकांत राजपुतान्यांतून आम्हांस हांकलून दिल्यामुळें येथें येऊन आम्हीं वसाहत केली, असें सांगतात.