प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
भारतीय व पूर्वेकडील राज्यपद्धति. - पूर्वेकडील उपभारत व भरतखंड येथील राज्यपद्धतींत दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळें फार फरक पडलेला आहे. एक गोष्ट म्हणजे हिंदुस्थानांत रूढ असलेला जातिभेद व ग्रामसंस्था यांचा टांकिन वगैरे देशांत असलेला अभाव ही होय. पूर्वेकडील देशांतील बहुतेक राज्यांत कित्येक रानटी वर्ग व टांकिन व कोचिनचीन येथील बहुजन समाज हे अपवाद खेरीजकरून सामान्यतः सर्वत्र प्रचलित असलेला जो बौद्धसंप्रदाय त्याचा संस्थापक बुद्ध यानें आपल्या संप्रदायांतून जातिभेद काढून टाकला इतकेंच नव्हे, तर आपल्या संप्रदायातून जातिभेद काढून टाकला इतकेंच नव्हे, तर आपल्या संप्रदायांत सर्व लोकांचा त्यांच्या जन्मकुरादि गोष्टींकडे लक्ष न देतां समावेश करून जातिभेद समूळ नष्ट केला. जातीजातींतील नियमांमुळें प्रत्येक विशिष्ट जातीच्या हक्कांचें संरक्षण होत असे, व या जातिनियमामुळें राजकर्त्यांना लोकांच्या हक्कांमध्यें ढवळाढवळ करण्यास मोठा अडथळा येत असे, कारण जातीजातींतील कायद्यांनां पवित्र धार्मिक स्वरूप असल्यामुळें त्यांचा मजबूत तटबंदीप्रमाणें उपयोग होत असे. उलट जातिविशिष्ट कायद्यांचा असलेला अभाव हें पूर्वेकडील देशांत तिकडे सर्व ठिकाणीं जी अरेरावी राज्यकारभारपद्धति दिसून येते, त्याचें एक कारण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे कीं, पूर्वेकडील देशांतील लोकांचा मूळ स्वभावच असा कांहीं आहे कीं ते स्वःताच्या अक्कलेवर स्वतःची उन्नति करून घेण्यास असमर्थ दिसतात आणि त्यांनीं स्वतः होऊन कोणती राज्यकारभारपद्धति निर्माण केली असें मुळींच कधीं झालेलें नाहीं; म्हणून त्यांच्या राज्यकर्त्त्यांनीं अरेरावी राज्यकारभार करण्याचा जेथें जेथें उपक्रम केला तेथें तेथें तो यशस्वी झाला. कारण तो हाणून पाडण्याची पात्रता त्यांच्या आंगीं नव्हती. हिंदुस्थानामध्यें अगदीं प्राचीन काळापासून असलेली ग्रामसंस्थापद्धति व त्याकरतां गावकर्यांनीं नेमलेले कामगार व धंदेवाले लोक व त्या त्या कुटुंबांतच वंशपरंपरा चालत आलेले अधिकार व धंदे या सर्व गोष्टींचा असा एक मोठा फायदा झालेला आहे कीं, अनेक युद्धें व अनेक राज्यक्रान्त्या जरी होऊन गेल्या तरी गांवकरी लोक आपल्या सुव्यवस्थित ग्रामव्यवस्थेरखालीं सुखासमाधानांत राहिलेले असत आणि त्यांचे शेतकी व इतर उद्योगधंदे चांगल्या तर्हेनें चाललेले असत. ही ग्रामसंस्थापद्धतिच पूर्वेकडील देशांत नसल्यामुळें सुव्यवस्थित राज्यघटनेच्या पायालाच ते अन्तरलेले होते. टांकिन आणि कोचिन-चीन येथील राज्यव्यवस्था एकसत्ताक असून जुलमाची जरी आहे तरी ती पितृसत्ताक अर्थात वात्सल्यपूर्ण म्हणून सांगण्यांत येते. खाजगी कुटुंबांतल्याप्रमाणें, देशांतील राज्यव्यवस्था आहे अशा तर्हेचा बहाणा करण्यांत येतो, पण राज्यशकट हांकण्याला मुख्यत्वेंकरून दंडुक्याचाच उपयोग होतो. राज्यसत्तेला आळा घालण्यास फक्त बंडाची भीति व अनेक शतकांपासून सर्व देशांतून, मग त्या देशांतील राज्यव्यवस्था कितीकां वाईट असेना, रूढ असणार्या चालीरीती अतिक्रमण करण्याची धास्ती हींच कांहीं अंशीं कारणीभूत होतात. सरदारवर्गहि फक्त सेवावृत्ती असल्याकारणानें त्याचें बरेंवाईट करण्याची सत्ता सर्वस्वी राजाच्या इच्छेवर अवलंबून असे.