प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
भारतीय-चिनी.- हिंदुस्थान व चीन या देशांच्या मध्यंतरीं असलेल्या देशांतील व बेटांतील लोक जरी परस्परांपासून आचारविचार व भाषा या बाबतींत बरेच भिन्न असले तरी त्या सर्वांस 'इंडो-चायनीज', भारतीय-चिनी, हें नांव सामान्यपणें लावतां येईल. त्यांनीं आपले पारमार्थिक संप्रदाय, धर्मशास्त्र, आचारविचार हे आपल्या शेजार्यांपासून घेतलेले आहेत. परंतु या गोष्टी प्रत्येक देशानें निरनिराळ्या काळीं घेतल्यामुळें त्यांमध्यें निरनिराळे संस्कृतीचे थर दृष्टीस पडतात; आणि या नव्या आचारविचारांचे जें मूळ आचारविचारांशीं मिश्रण झालें त्यामुळें त्यांत बरीच परस्परभिन्नता दृष्टीस पडते.
या प्रदेशाशीं संबंध येणारें पहिलें यूरोपीय राष्ट्र म्हटले म्हणजे पोर्तुगीज होय. परंतु यांनीं तद्देशीय लोकांच्या राहणीबद्दल अथवा भाषा किंवा वाङ्मय याबद्दल फारशी माहिती मिळविली नाहीं.
पुढील माहिती जे. लेडेन यानें १८०५ सालीं केलेल्या प्रवासामध्यें जमविली असून ती १८०८ च्या 'एशियाटिक रिसर्चेस' {kosh Asiatic Researches Vol X. (1808) pp. 158-289.}*{/kosh} या नियतकालिकांत प्रथम प्रसिद्ध झाली होती.
या प्रदेशांत बर्याच प्राचीन काळीं बौद्धसंप्रदाय प्रचलित असावा असें वाटतें. परंतु ऐतिहासिक लेखांच्या अभावीं त्याचा प्रवेश केव्हां झाला असावा याची केवळ कल्पनाच केली पाहिजे. १८०५ च्या सुमारास बौद्धसंप्रदाय फक्त मुख्य प्रदेशांत म्हणजे मलाया द्वीपकल्पाच्या अंतर्भागांत चालू असावा. त्या द्वीपकल्पाचा किनारा व बरींचशीं पूर्वेकडील बेटें महंमदीयानीं व्यापिलीं होतीं; आणि अंतर्भागाशीं यूरोपीयांचा संबंध फारच थोडा येत असल्यामुळें त्या भागांत बौद्धसंप्रदाय आहे कीं हिंदुधर्म आहे याची त्यांनां नीटशी कल्पना येणें संभवनीयहि नव्हतें; परंतु त्या लोकांत प्रचलित असलेल्या उपास्यांचीं जी नांवें ऐंकूं येत त्यांवरून ते हिंदू असावेत अशीच कल्पना होत असे. तथापि यूरोपीयांचे आचारविचार पौरस्त्य आचारविचारांपेक्षा इतके भिन्न आहेत कीं, पुष्कळसे यूरोपीय ग्रंथकार आपल्या निवळ कल्पना वस्तुस्थितिदर्शक गोष्टी म्हणून केव्हां केव्हां दडपून देतात आणि ज्यांनां तद्देशीय लोकांचे आचारविचार निरीक्षण करण्याची संधि मिळते ते आपल्याला त्यांच्यापेक्षां फार श्रेष्ठ समजून त्यांच्याकडे तुच्छतादर्शक दृष्टीनें पाहतात व त्यामुळें पुष्कळ पौराणिक व इतर गोष्टी काल्पनिक म्हणून त्याज्य ठरवितात व या कारणानें अनेक गोष्टींच्या ज्ञानास ते मुकतात असें लेडेन यानें म्हटलें आहे.
मलायी लोक व कांहीं डोंगरी जाती सोडून दिल्या तर भरतखंड व चीन यांच्या मध्यंतरी असलेल्या सर्व देशांतील बाकीचे लोक बौद्धसंप्रदायी आहेत. त्यांच्या विधी व आचारांमध्यें कांही फरक आहेत. सर्वांची सामान्य तत्त्वें बहुतेक सारखींच आहेत. हा संप्रदाय नेपाळ, भूतान, तिबेट इत्यादि प्रदेशांत चालत असून चीन, तार्तरी, जपान इत्यादि देशांतून पसरला आहे. त्याप्रमाणेंच या मोठ्या प्रदेशांतील सर्वच राष्ट्रांचे धार्मिक ग्रंथ एकाच भाषेंत आहेत असें जरी निश्चयानें सांगतां येत नाहीं तरी बहुतेक बौद्धसांप्रदायिक ग्रंथाची भाषा सिंहलद्वीपाप्रमाणेंच येथेंहि पाली हिच आढळते. पाली ही येथील लोकभाषा नाहीं. भरतखंडांतील संस्कृत भाषेप्रमाणेंच या देशांत पाली भाषा ही पंडिती भाषा म्हणून धार्मिक व शास्त्रीय ग्रंथांत वापरतात.
मलायी भाषा व पूर्वेकडील बेटांतील भाषा या संस्कृत भाषेप्रमाणेंच मूळच्या अनेकाक्षरी भाषा असाव्यात. या भाषांवर संस्कृत भाषेचा परिणाम विशेष झालेला दिसतो. तथापि पालिचाहि परिणाम बराच झाला असावा. महंमदी संप्रदायाच्या प्रसारानंतर या भाषांवर अरबी भाषेचाहि परिणाम झालेला दिसतो.
इंडोचीनमधील मूळच्या लोकभाषा चीन देशांत प्रचलित असलेल्या भाषांप्रमाणें एकाक्षरी भाषा असाव्यात व ज्या कांहीं अनेकाक्षरी भाषा असतील त्या पाली भाषेवरून किंवा मूळ अक्षरें एकमेकांस जोडून बनल्या असाव्यात.
इंडोचीनमध्यें ऐतिहासिक शोध करण्याकरितां उपयुक्त अशा अवशेषांच्या अभावामुळें केवळ तेथील भाषांच्या परीक्षणावरच भिस्त ठेवावी लागते. या भाषांचा चिकित्सक दृष्टीनें अभ्यास केल्यास त्यांचेवर निरनिराळ्या काळीं कोणकोणतें व कसकसे बाह्य परिणाम झाले हें लक्षांत आल्यावाचून रहात नाहीं. त्यानंतर आपली दृष्टी त्यांतील वाङ्मयाकडे व इतर अवशेषांकडे वळविली असतां आपणांस त्या प्रदेशांच्या इतिहासाचें बरेंचसें ज्ञान होईल.
इंडोचीनमधील भाषांचें पुढें दिल्याप्रमाणें वर्गीकरण करतां येईल.
अनेकाक्षरी भाषा.- (१) मलयु (२) जावा (३) बूगी (४) बिम (५) बत्ता (६) गाल अथवा तागाल. एकाक्षरी भाषा.- (७) रुखेंग (८) ब्रह्मी (९) मोन (१०) तहइ (थइ) (११) खोहमेन (१२) लाव (१३) अनाम. पंडिती भाषा- (१४) पाली.