प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
मलयु.- या भाषेला मलाया द्वीपकल्पांत मलयु असें नांव आहे. परंतु यूरोपीय लोक मॅले असा त्याचा उच्चार करतात. ही भाषा वापरणार्या मलायी लोकांस सयामी लोक 'खेक' असें म्हणतात व ब्रह्मी लोक 'मासु' असें म्हणतात. या भाषेला तिच्या माधुर्यावरून यूरोपीय लोक पूर्वेकडील इटालियन असें म्हणतात व तिच्या प्रसारावरून पूर्वेकडील हिंदुस्थानी असें नांव देतात. इचें एकाक्षरी भाषांशीं जरीं बरेंच साम्य आहे तरी ती मूळची अनेकाक्षरी भाषा आहे. या भाषेची व्याप्ति फार मोठ्या प्रदेशावर असल्यामुळें व हिचा प्रसार पंडितवर्गापेक्षां तरवारबदाद्दरांनींच विशेष केला असल्यामुळें हिचें निरनिराळ्या प्रदेशांतील देश्य अथवा लोकभाषांशीं मिश्रण होऊन हिच्यापासून अनेक पोटभाषा किंवा उपभाषा निघाल्या आहेत. यामुळेंच मूळची मलयु भाषा कोणतीं हें शोधून काढणें बरेंच श्रमाचें झालें आहे. हा शोध करण्याकरितां प्रत्येक राज्यांतील भाषेची रचना व त्या राज्याचा इतिहास या दोहोंचाहि अभ्यास करावा लागतो. यद्यपि ही भाषा उपयोगांत आणणारें राष्ट्र बरेंच अर्वाचीन आहे तथापि त्या राष्ट्राच्या इतिहाससंशोधनास लागणारी अनेक प्रकारची सामग्री उपलब्ध असूनहि तिचें संशोधन न झाल्यामुळें त्या राष्ट्राचा इतिहास बराचसा अज्ञातच राहिला आहे; आणि यामुळें मलयु भाषेची उत्पत्ती व वाढ यांच्यावरहि या अज्ञानांधकाराची छाया पडली आहे. बोलण्याच्या लोकभाषांत (बस ददंग) जरी निरनिराळ्या प्रदेशांत बराच फरक आहे तरी लिहिण्याची भाषा (बस जवि) बहुतेक सर्व राज्यांतून एकच आहे आणि यामुळें जी लोकभाषा लेखनभाषेशीं विशेष जुळते ती सर्वांत उच्च समजली जाते.
यास्तव लेखनभाषा ही आपण तुलनेकरितां प्रमाणभाषा म्हणून धरून चालूं. या भाषेमध्यें तीन निरनिराळे अंश दिसतात. त्यापैकीं महत्त्वाचा म्हटला म्हणजे संभाषणामध्यें व सामान्य व्यवहारामध्यें जे शब्द वरचेवर प्रचारांत आढळतात त्या शब्दांचा होय. अशा शब्दांचा भरणा विशेष असून ते बहुतकरून येथील मूल देश्य भाषेंतील असावेत. या भाषेचा सभोंवतालच्या बेटांतील भाषांशीं संबंध असावा एवढेंच नव्हे तर ब्रह्मी, तहइ इत्यादि एकाक्षरी भाषांशींहि तिचा संबंध असावा असें लेडेन याचें मत आहे. या भाषेंतील दुसरा महत्त्वाचा अंश म्हटला म्हणजे संस्कृत भाषेचा. संस्कृत भाषेंतील शब्दांचा अथवा तत्साधित शब्दांचा भरणा जरी वरील भाषेंतील शब्दांपेक्षां कमी असला तरी या भाषेंतील तिसरा अंश जो अरबी भाषेपासून आला आहे त्यापेक्षां बराच अधिक व महत्त्वाचा आहे. मलयु भाषेचा विशेष प्रचार म्हटला म्हणजे मलाया द्वीपकल्पांत आहे. ही भाषा उत्तरदिशेकडे पतनीपर्यंत चालते व तेथून सयामी सुरू होते. त्यांतल्या त्यांत पश्चिमेच्या बाजूला हिंचे स्वरूप पूर्वेकडील बेटांपेक्षां अधिक शुद्ध आढळतें. सुमात्रा बेटाच्या किनार्यावर पुलौ पुरिच येथून तींत बत्ता भाषेंचें मिश्रण होतें. सुमात्रा बेटांतील मेनंगकबौ ही जात मलयु भाषेची एक निराळीच पोटभाषा वापरते. या भाषेचें लेडेन याच्या मतें जावा भाषेशीं बरेंच साम्य आहे.
मलायी लोकांच्या शौर्यामुळें व धाडशी स्वभावामुळें मलयु भाषेचा प्रसार विस्तीर्ण प्रदेशावर झाला व संस्कृत भाषेचा ज्याप्रमाणें भरत खंडामध्यें व पाली भाषेचा जसा इंडोचीनमध्यें इतर स्थानिक भाषांवर महत्त्वाचा परिणाम झाला त्या प्रमाणेंच मलयु भाषेचा पूर्वेकडील बेटांवर झाला. यामुळें या भाषेबद्दल थोडेंसे विस्तृत विवेचन करणें अवश्य आहे.