प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

राजकीय विभाग.- त्या राज्याचे प्रांत पाडलेले असत, त्यांची संख्या निरनिराळ्या काळीं निरनिराळी असे. याकरितां यूरोपियन लेखकांनीं सयामी राज्यांतील प्रांतांच्या ज्या याद्या दिलेल्या आहेत त्यांचा आपणास फारसा उपयोग होण्यासारखा नाहीं. प्रांतांवरील सुभेदारांच्या हातांत अमर्याद सत्ता असे, तिचा त्यांच्या हातून कित्येक वेळां गरीब लोकांनां त्रास देण्याच्या कामीं दुरुपयोगहि होत असे; आणि त्याबद्दल त्यांच्यावर कोणी खटले केल्यास राजाकडे किंवा मुख्यप्रधानाकडे मोठमोठ्या रकमा भरून ते आपणांस त्यांतून सोडवून घेत व त्याच अधिकारावर राहात असत. ह्या जागा बहुधा वंशपरंपरेनें चालत असत. सर्व कामगारांनां वर्षांतून दोनदां शपथविधि करावा लागे, व त्या विधींत जलपान हें मुख्य असे. एखादा अधिकारी हें करण्यास चुकल्यास त्याची नोकरी जाई, व राजद्रोहाचा आरोप येऊन त्याला तुरुंगांत पडावें लागत असे. सर्व कामगारांनां वर्षांतून एकदां पगार मिळत असे;  आणि हे पगार वांटण्याचें काम पंधरा दिवस चाले. कामगारांच्या दर्जाप्रमाणें त्यांचे पगार कमज्यास्त असत. थईराज्यांत सर्व अरेरावी कारभार असल्यामुळें नोकरांच्या बढत्या वगैर गोष्टी निव्वळ राजाच्या मर्जीवर अवलंबून असत. राज्यांतील नगरांचे चार प्रकार असत. त्यांचीं नांवें मुआंग-एक, मुआंग-थो, मुआंग-त्रि, व मुआंग-शतव अशीं असत. पहिल्या प्रकारचीं शहरे म्हणजे राज्यांतील राजधान्या अथवा मांडलिक राजांच्या राजधान्या; दुसर्‍या प्रकारांत प्रांतांच्या राजधान्या अथवा मुख्य शहरें मोडत; व तिसर्‍या व चवथ्या प्रकारांत अनुक्रमें जिल्ह्यांचीं व तालुक्यांची ठाणीं येत. हीच पद्धति खालीं खेडेगांवापर्यंत पोहोंचलेली असून तेथील कामें गांवांतील मुख्य पहात असत.
थईराज्यांत राजाचे हुकूम बजावणारा असा दरबारांत कोणी दिवाण नसे, तर प्रत्येक अधिकार्‍याजवळ राजानें दिलेला थ्रा किंवा शिक्का असे, व त्या शिक्क्यानिशीं तो राजाज्ञा जाहीर करीत असे. त्या देशच्या राजाचे निरनिराळ्या आकाराचे व छापाचे पोटशिक्के असत. मुख्य शिक्क्यावर सिंहाचा छाप असे; कारण सिंह सर्वात श्रेष्ठत्वाता द्योतक आहे. या शिक्क्याचा उपयोग राजा व इतर राजेरजवाड्यांना लिहितांना करीत असे, व इतर शिक्क्यांचा उपयोग खालच्या दर्जाच्या लोकांनां लिहितांना करीत असे.

सयामी समाज.- सयामांतील थइ राज्यांतील व तत्पूर्व समाजस्थितीचें त्रोटक वर्णन पूर्वीं*  दिलेंच आहे त्यापेक्षां थोडें विस्तृत द्यावयाचें म्हणजे सुमारें १०० वर्षांपूर्वींच्या सयामधील समाजस्थितीचें वर्णन द ला लूबेर, जॉन क्राफर्ड व पलेगोइ इत्यादि ग्रंथकारांच्या आधारें लासेन यानें पुढें दिल्याप्रमाणें केलें आहे. सयाममधील जनतेचे पांच वर्ग आहेत. पहिला वर्ग सैनिकांचा, दुसरा सक्तीनें निरनिराळीं कामें करणारांचा, तिसरा कर देणारांचा, चवथा मुदतीच्या चाकरांचा आणि पांचवा गुलामांचा. सैनिकांसंबंधीं वर्णन पुढें येईल. सक्तीची चाकरी करणारांनां खाव-ड्यूएम म्हणतात, व त्यांनां किल्ले, कालवे, धरणें, इत्यादि बांधण्याचीं कामें करावीं लागतात. त्यांनां वर्षांतून तीन महिने काम करावेंच लागतें, व नंतर सुटका करून घेणें असल्यास १० टिकेल द्यावे लागतात. त्यांनां मजुरीनें बदली देतां येतात. जे अधिकारी सरकाराच्या असल्या कामावर असतात ते स्वतःचे खिसें भरण्याकरितां आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करितात. तिसर्‍या कर देणार्‍या वर्गांतल्या लोकांनां ८ ते १६ टिकेलपर्यंत कर द्यावा लागतो. या वर्गांतले कित्येक लोक आपल्यावरील कर आपल्या जमिनींतील पिकांच्या रूपानें किंवा आपल्या धंद्यांतल्या मालाच्या रूपानें देतात. वरच्यापेक्षां याच वर्गाची स्थिती बरी असते, कारण एकदां द्यावयाचे तेवढे कर नियमीतपणें दिले म्हणजे वर्षभर स्वेच्छेप्रमाणें वाटेल तें करण्यास ते स्वतंत्र असतात. मुदतीच्या चाकरांनां लेक असें नांव आहे. त्यांनां राजाचीं किंवा अधिकार्‍यांचीं घरगुती कामें करावीं लागतात. अधिकार्‍यांच्याबरोबर नेहमीं त्यांचे हे मुदतीचे चाकर किंवा गुलाम असतात. या दोन्ही वर्गांनां कांहीं हलके कर खजिन्यांत भरावे लागतात. राजे व अधिकारी लोकांच्या चाकरीस अशा तर्‍हेचीं कुटुंबें असतात. कारण हे लोक अगदीं गरीब असतात आणि कर भरण्याकरितां जवळ पैसा नसल्यामुळें त्यांनां कर्ज काढावें लागतें व त्या कर्जापायीं शेवटी ते गुलाम होतात. या नोकरांचा त्यांच्या धन्यांनां शेतकी व इतर कामें करण्याकडे फार चांगला उपयोग होतो. पांचवा म्हणजे समायीलोकांतील गुलामांचा वर्ग. यांत तीन प्रकारचे लोक येतात. युद्धकैदी, कायमचे गुलाम, व आईबापांनीं विकलेलीं मुलें. यांपैकीं पहिल्या युद्धकैद्यांनां खंडणी भरून पुन्हां आपलें स्वातंत्र्य मिळवितां येतें; परंतु दुसर्‍या प्रकारचे कायमचेच गुलाम रहातात.  तिसर्‍या प्रकारचे गुलाम कर्जामुळें सुमारें वीस वर्षेंपर्यंत आपल्या सावकाराची गुलामगिरी केल्यावर मोकळे होऊं शकतात. पण त्यांनां विकण्याचा सावकारांनां हक्क असतो व त्यांची किंमत त्यांच्या वयाच्या व उपयुक्ततेच्या मानानें २४ पासून १६० टिकेलपर्यंत येते. वसाहतवाले नीग्रोंनां वागवितात तसल्या कडकपणानें व क्रूरपणानें त्यांनां फारच क्वचित वागविण्यांत येतें. तथापि त्यांनां अत्यंत हलके समजतात व अगदीं खालच्या वर्गाच्या लोकांतहि त्यांचा समावेश होत नाहीं. सयामीलोकांपैकीं बर्‍याच जणांबद्दल अत्यंत तिरस्कार दर्शविण्यांत येतो व ते लोक तो निमूटपणें सहन करतात त्यामुळें थईलोकांत ही गुलामगिरीची वृत्ति उत्पन्न झाली असावी.

सयामी लष्कर.- आतां सयामीलोकांतील लष्करी बाबींचा विचार करूं. हे लोक विशेषतः शेतकी व व्यापार करणारे असल्यामुळें त्यांच्यामधील युद्धकलेचे ज्ञान फारसें वाढलेलें असणें संभवनीय नाहीं. शिवाय दुसरें असें कीं अलीकडील काळांत जवळपासच्या राष्ट्रांशीं मोठाल्या लढाया त्यांनीं मुळींच केल्या नाहींत व त्यामुळें अर्थांत युद्धकलेची वाढ करण्याकडे त्यांचें दुर्लक्ष झालें आहे. सुमारें १०० वर्षांपूर्वीं थई राजानें इंग्रज अंमलदारांकडून आपल्या सैन्याला शिस्त व कवाईत चांगली शिकविण्यास आरंभ केला. पण यावरून हें उघड ठरतें कीं, त्यांच्या अलीकडील लष्करी तयारीवरून पूर्वींच्या लष्करी स्थितीबद्दल मत ठरवितां येत नाहीं.

सयामी राष्ट्राच्या मूलभूत तत्त्वाप्रमाणेंच अधिकारी लोक खेरीज करून सर्व सयामी लोकांस लष्करांत नोकरी करणें सक्तीचें असे. दुसरा अपवाद म्हणजे पुरोहितवर्गाचा, तिसरा अपवाद सक्तीची चाकरी करणार्‍यांचा, आणि चवथा जे लोक कर भरून त्या रूपानें सरकारसंबंधीं आपलें कर्तव्य पूर्णपणें बजावतात त्यांचा. या अर्थानें पाहिलें म्हणजे सयाममध्यें राष्ट्रीय शिंबदीची पद्धत होती असें म्हणता येईल. अलीकडील सुधारणा सुरी केल्यानंतर सयामी लष्कराचें वर्णन सामान्यतः पुढें दिल्याप्रमाणें लासेन यानें केलें आहे. लष्करी नोकरींतल्या लोकांचे दोन मोठाले वर्ग पाडतात. त्यांपैकीं एकाला उजवी तुकडी व दुसर्‍याला डावी तुकडी असें म्हणतात. ह्या मुख्य दोन तुकड्यांचे नंतर पोटविभाग करितात, त्या प्रत्येकांत हजार सैनिक असून त्यांचे पुन्हां शंभराशंभराचे भाग पाडतात व त्यांच्याखालीं दहादहाचे अगदीं लहान भाग पाडतात. त्यांच्यावरच्या अधिकार्‍यांनां नाई ह्या पदवीला आणखी शब्द जोडून नांवें देतात तीः दहा शिपायांवरच्या अधिकार्‍याला नाई-सिप, शंभरावरील अधिकार्‍यास नाई-रोव, हजारावरील अधिकार्‍यास नाई-पोऊ, अशीं असतात. नाईलोक आपल्या हाताखालच्या शिपायांनां कर्जाऊ पैसे देतात व या रीतीनें त्यांनां आपले गुलाम बनवितात. सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीस पगारमास्तर दिलेले असतात. या पगारमास्तरांनां आपल्या लायकीची खात्री करून द्यावी लागते. प्रत्येक विभागांत अनेक पागरमास्तर असतात. राज्यांतील प्रत्येक प्रांतांत सेनापति प्रांतातील सैन्यांत नोकरी करण्यालायक अशा लोकांची बरोबर नोंद ठेवितात. अशा लोकांनां १९ व्या वर्षापासून सरकाची चार महिने नोकरी करावी लागते. सैनिकांनां पोषाख व हत्यारें सरकार पुरवितें. पण अन्नसामुग्री मात्र ज्याची त्यानें घ्यावयाची असते. हत्यारांमध्यें तरवारीं, खंजीर, भाले, धनुष्यबाण, बंदुकी, पिस्तुलें व निरनिराळ्या पल्ल्याच्यातोफा इतक्यांचा समावेश होतो. पोषाख अगदीं साधा असतो. डोक्याला गवताची किंवा बांबूची विणलेली टोपी, खालीं गुडघ्यापर्यंत आंगरखा, व गुडघ्यापासून पायांनां बांधण्याच्या पट्ट्या, निरनिराळ्या तुकड्यांचे निरनिराळ्या रंगांचे ओव्हरकोट आणि खालीं पाय अगदीं उघडे असा पोषाख असतो. सैनिकांपासून ओळखूं येण्याकरितां सेनापतींनां रेशमी फीत लावलेले ओव्हरकोट असतात. जेव्हां लटक्या लढायांवर जावयाचें असेल त्या वेळीं बरोबर एक महिना पुरतील इतके तांदुळ प्रत्येकाला घ्यावे लागतात. सयामी सेनापतींनां लढाईंतले डावपेंच वगैरे फारसे माहीत नसतात, त्यामुळें लढाई म्हणजे लहानसहान चकमकीवजा होते. अगदीं अलीकडील काळांत सुद्धां एकंदर सयामी सैन्य कायतें ३० हजार आहे;  व तें बहुतेक पायदळ असून घोडदळ फारसें महत्त्वाचें नाहीं व तोफखाना तर अगदींच टाकाऊ आहे. हत्तीचा उपयोग मोठाल्या अधिकार्‍यांनां बसून जाण्यापुरता करितात.