प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

लखदीव, मालदीव.- हिंदुस्थानाच्या अगदीं जवळचींच ठाणीं म्हटलीं म्हणजे लखदीव व मालदीव हीं बेटें होत. मालदीव बेटाची भाषा सिंहली आहे म्हणजे संस्कृतजन्य आहे; आणि येथील लोक अरब व हिंदु यांच्या मिश्रणानें बनले आहेत. या बेटावर पोर्तुगीजांच्या व मुसलमानांच्या स्वार्‍या पुष्कळ होत असत त्यामुळें स्वसंरक्षणासाठीं येथील लोकांनीं सिंहलद्वीपांतील राजांचा मांडलिकपणा स्वीकारला होता. लखदीव उर्फ लक्षद्वीप या बेटांतील भाषा मलबारचीच म्हणजे मल्याळी आहे, तथापि ही अरबी लिपींत लिहिली जाते. ज्याप्रमाणें हिंदी भाषेचा फारसी शब्दबाहुल्यामुळें व फारसी लिपीच्या उपयोगामुळें उर्दु हा एक अपभ्रंश बनला आहे, त्याप्रमाणेंच अरबी लिपि व अरबी शब्द यांच्या उपयोगामुळेंच मल्याळी भाषेचा लखदीव बेटांत निराळा अपभ्रंश बनला आहे. येथील सुलतान पूर्वीं मलबारांतील कॅनेनूर येथील राजांचे मांडलिक असत. अर्थात ते आतां इंग्रजाचें मांडलिक झाले आहेत.