प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

राज्याभिषेक.- नवीन राजाला राज्याभिषेक यथासांग व मोठ्या थाटानें करण्यांत येतो; यासाठीं ज्योतिष्याकडून एका शुभदिवसाची योजना होते. राज्याभिषेकाच्या दिवशीं संध्याकळीं तेथील सर्व घरांत रोषनाई करण्यांत येते; व प्रत्येक दरवाजासमोर लहान वेदी तयार करून तेथें होमहवन करण्यांत येतें. ज्याला राज्याभिषेक व्हावयाचा असतो, तो राजपुत्र सर्व राजचिन्हांनीं सुशोभित होऊन दिवाणखान्यांत येतो. नंतर सर्व मोठ्यामोठ्या अधिकार्‍यांनां घेऊन पुरोहित लोक विजयदेवतेची एक मूर्ति तेथें आणतात. तो राजपुत्र मूर्तिच्या पायां पडतो. प्रास्ताविक कृत्यें झाल्यानंतर तो राजपुत्र एका सोनेरी सिंहावर आरूढ होतो. तेथें बसल्यावर त्या नवीन राजाला सर्व लोक आशीर्वाद देऊन कित्येक नजराणे देतात; त्यांमध्यें सर्वप्रकारचीं शस्त्रें व त्या देशांतील सुंदर सुंदर फळें व फुलें हे मुख्य नजराणे असतात. नंतर तो अभिषिक्त राजा त्या समारंभाच्या जागेंतून सभागृहांत जातो; त्या ठिकाणीं राज्यांतील वरिष्ठ अधिकारी आपापल्या हुद्यांप्रमाणें त्याला देणग्या देऊन त्याचें स्वामित्व कबूल करितात. राज्याभिषेकाच्या दिवशीं मांडलिक राजेहि नजराणें देऊन त्याचें स्वामित्व कबूल करितात. नंतर कांहीं दिवसांनीं सुशोभित अशा त्या राजधानीच्या रस्त्यांतून मोठ्या थाटानें राजाची मिरवणूक काढण्यांत येते. आणखी थोड्या दिवसांनीं, सुशोभित केलेल्या क्रीडानौकेंत बसवून नदींतून दुसरी मिरवणूक काढण्यांत येते.