प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

शासनसंस्था.- वरिष्ठ शासनयंत्रांत, एक महासभा (State Council) आणि सहा मंत्री असतात. पौरोहित्य, युद्ध, न्याय, सार्वजनिक कागदपत्र व लिखाण यांचें रक्षण, कोश, आणि सरकारी जंगल यांसंबधीं निरनिराळीं कामें वरील मंत्र्यांकडे असतात; जंगलखात्यावरील मंत्री सार्वजनिक इमारती व आरमार यांवर देखरेख ठेवतो. सहा मंत्री व महासभा याखेरीज या राज्यांत, इतर वरिष्ठ अधिकारी असतात; त्यांना ‘कूम’ असें नांव देतात. यांत, प्रांताधिपति, टांकिनचा राजप्रतिनिधि पीलखाना आणि परराष्ट्रांसंबंधी कारभार, यांवर देखरेख करतो. राज्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांतून सहा मंत्री घेण्याची ही पद्धत चिनी आहे. फक्त कोचिन-चीनमध्यें, कांहीं थोडा फरक आहे, पण तो फारसा महत्त्वाचा नसल्यानें, येथें दिला नाहीं. मंत्रिसभा व महासभा राजा त्याला आवश्यकता भासेल त्या वेळीं बोलवितो. हे सर्व अधिकारी व त्यांच्या हाताखालील दुय्यम अधिकारी मिंग या चिनी राजघराण्याच्या दरबारी पोषाखासारखा पोषाख करितात; व चीन देशांतल्याप्रमाणें यांचेहि दहा दर्जे आहेत. चिनी पद्धतीपेक्षां अजीबात निराळें वळण म्हणजे कोचिन-चीनमध्यें लष्करी अधिकार्‍यांनां विद्वानांपेक्षा व धर्माध्यक्षांपेक्षांहि जास्त मान देण्यांत येतो. या राज्यांत शास्त्रज्ञांपेक्षां लष्कराला जास्त महत्त्व आहे एवढें सांगितल्यास वरील गोष्टीचें आश्चर्य वाटणार नाहीं.