प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

लष्करी खातें.- राज्यांतील निरनिराळ्या खात्यांविषयीं विचार करितांना प्रथम लष्करीखातें घेणें उत्तम; कारण कोचिन-चीनमध्यें लष्कर विशेष श्रेष्ठ आहे. प्रत्येक प्रजाजन १८ ते ६० वर्षें पावेतों लष्करी नोकरी करण्यास बांधलेला आहे. तथापि, हा कायदा कडक रीतीनें अंमलांत आणीत नसून, व्यवहारांत कोचिन-चीन व तेथील राजाचे परंपराप्राप्‍त प्रदेश यांतून, प्रत्येक तिसरा मनुष्य लष्करी नोकरीस बोलवण्यांत येतो; टांकिनांत तर यापेक्षांहि जास्त सवलती आहेत; कारण, हें जित राष्ट्र जास्त दयाळूपणानें वागविलें जाते. तीन वर्षें नोकरी केल्यावर सामान्य शिपायानें आपल्या घरीं परत जावें. अधिकार्‍यांनां जास्त दिवस नोकरी कारावी लागते. एकंदर लोकसंख्येंत शस्त्रें धारण करण्यास लायक असे किती पुरूष आहेत, याची बरोबर यादी ठेवलेली असेत. याच लोकांनां आरमारावर काम करावें लागतें, शिवाय यांची योजना देशांतील रस्ते, तलाव, पूल वगैर बांधण्याच्या कामींहि होते. पण या योगानें शिस्त बिघडते. कोचिन-चीनच्या राजाचें लष्कर म्हणजे, राजसंरक्षक (हें पायदळ असतें), पायदळ, घोडेस्वार आणि लढाऊ-जहाजें इत्यादि प्रकारचें असते. हत्तींचा फक्त ओझ्याकरितां व बसण्याकरितां उपयोग करतात. कोचिन-चिनी लष्करी व आरमारी बलाविषयींची माहिती, फार अलीकडच्या काळांतील असल्यामुळें, ती येथें देण्याचें प्रयोजन नाहीं; तसेंच, लष्कररचनेतील पलटणी, पथकें वगैरे प्रकार अलीकडच्या काळचेच आहेत; व कोचिन-चीनच्या राजांच्या पदरीं असलेल्या फ्रेंच सैन्याधिकार्‍यांनीं हे प्रकार पाडले आहेत. पगाराचें मान कमी आहे; व तोहि कांहिं पैशाच्या रूपानें व कांहीं तांदुळाच्या रूपानें देतात. सामान्य शिपायाचा पेहराव म्हणजे शंखूसारखी हाथरीची टोपी, गुढग्यापर्यंत लांब आंगरखा व लांब विजार, पायांत कांहीं नसतें. अधिकारीवर्ग लष्करी पेहेराव करीत नाहीं तर त्या देशाच्या रिवाजाप्रमाणें, पगडी, अंगरखा आणि विजार असा नेहेमींचा पोशाख करतो. पायदळाचा सरंजाम पाश्चात्य पद्धतीचा असे म्हणजे त्यांजवळ संगिनीच्या बंदुकी असत. इंग्लंडच्या वकीलानें दिलेल्या माहितीवरून असें समजतें कीं, कोचिन-चिनी लष्काराचा डौल फार छान असे.