प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
हूण राजे तोरमाण व मिहिरगुल.- गुप्त सम्राट स्कंदगुप्त (इ .स. ४५५-८०) याच्या वेळेपासून हल्ले करून हळूहळू गुप्त साम्राज्य ज्या हूण लोकांनीं संपुष्टांत आणले, ते रानटी लोक प्रथम मध्य आशियांतील मैदानांतून निघून इ. स. ३७५ च्या सुमारास पश्चिमेकडे आशियांतील ऑक्झस नदीकडील प्रदेशांत व यूरोपांतील व्होलग व डॅन्यूब नदीकडील प्रदेशांत विभागून गेले. यूरोपांत गेलेल्या हूण लोकांचा एक पराक्रमी पुढारी अँटिला यानें तिकडे मोठें साम्राज्य स्थापन केलें पण तो इ .स. ४५३ मध्यें मरण पावल्यावर १०|२० वर्षांत हें हूणांचें साम्राज्य लयास गेलें. आशियांत ऑक्झस नदीकडील प्रदेशांत हूणांचें साम्राज्य अधिक काळ टिकलें. या पांढ-या हूणांच्या टोळ्यांनीं काबूलांतील कुशान राज्यावर हल्ला केला व नंतर त्या टोळ्या हिंदुस्थानांत शिरल्या. त्यांनीं हिंदुस्थानावर इ. स. ४५५ मध्यें केलेला पहिला हल्ला स्कंदगुप्तानें परत फिरविला. पुढें १० वर्षांनी गंधार (पेशावर) च्या राज्यावर हल्ला करून नंतर त्यांनीं हिंदुस्थानावर दुसरा हल्ला केला, व गुप्त साम्राज्य नष्ट केलें. या वेळचा हूणांचा पुढारी तोरमाण या नांवाचा होता. त्यानें इ. स. ५०० पूर्वीं मध्यहिंदुस्थानांतील माळवा येथें राज्य स्थापिलें व हिंदू राजांच्या पद्धतीप्रमाणें ''महाराजांचा राजा'' अशी पदवी धारण केली. वलभीचा राजा व दुसरे कित्येक स्थानिक राजे याला खंडणी देत असतले पाहिजेत असें दिसतें. हा हूण राजा तोरमाण इ. स. ५१० मध्यें मरण पावल्यावर त्याला मुलगा मिहिरगुल राज्य करूं लागला. त्याची राजधानी पंजाबांत साकल (अर्वाचीन सिआलकोट) येथें होती. त्याकाळीं हूणांचें साम्राज्य हिंदुस्थानाबाहेर इराणपासून खोतानपर्यंत दूरवर पसरलेलें होतें. या हूण बादशहाच्या दरबारीं सोंगयुन नांवाचा चिनी प्रवासी-वकील इ .स. ५१९ मध्यें गेला होता. या हूणांच्या बादशहाला एकंदर ४० देशांचे राजे खंडणी देत असत. याच सुमारास कॉस्मस इंडिकोप्लुस्टस नांवाच्या भिक्षूनें हिंदुस्थानांतील गोल्लस नांवाच्या पांढ-या हूण राजाचें वर्णन लिहून ठेवलें आहे. हा हूण राजा आपल्या सैन्यांतील दोन हजार लढाउ हत्ती व घोडेस्वारांचें मोठें सैन्य यांच्या बळावर जुलुमानें खंडणी वसूल करीत असे असें तो लिहितो. हा हूण राजा मिहिरगुलच असला पाहिजे. यूरोपांत हूणांचा पुढारी अँटिला याची क्रूरपणाबद्दल जशी प्रसिद्धि आहे तशीच हिंदुस्थानांत मिहिरगुल याची आहे. परंतु हिंदू ग्रंथकारांनीं या रानटी हूणांच्या क्रूर कृत्यांचीं वर्णनें दिलीं नाहींत. तथापि हूणांचा जुलुम इतका असह्य झाला कीं, हिंदुस्थानांतील अनेक देश्य राजांनी मगधाचा राजा बालादित्य (नरसिंहगुप्त) आणि मध्यहिंदुस्थानचा राजा यशोधर्मन् यांच्या नेतृत्वाखालीं संघ बनवून हूणांशीं लढण्याची तयारी केली व इ. स. ५२८ मध्यें मिहिरगुलचा पूर्ण पराभव करून त्याला कैद केलें आणि हिंदुस्थान देशाला परकीयांच्या जुलमांतून सोडविलें. मिहिरगुलाला मात्र ठार न मारतां बालादित्यानें मोठ्या थोर मनानें सोडून देऊन उत्तरेकडे त्याच्या देशास सन्मानानें परत पाठविलें. मध्यंतरी मिहिरगुलाचें साकलाचें राज्य त्याच्या धाकट्या भावानें बळकाविलें तें तो परत देईना म्हणून मिहिरगुल काश्मीरच्या राजाच्या आश्रयास गेला. तेथें काश्मीरच्या राजानें मिहिरगुलाला लहानशा मुलूखाचा कारभार पाहण्यास सांगितलें. या संधीचा फायदा घेऊन मिहिरगुलानें आपल्या आश्रयदात्याच्याच विरुद्ध बंड केलें आणि त्याचें सिंहासन बळकाविलें. नंतर गंधारच्या राज्यावर हल्ला करून तेथील राजास विश्वासघातानें ठार मारिलें आणि राजघराणें व लोकसमाज यांची कत्तल केली. हा मिहिरगुल शिवाचा उपासक होता व त्यानें या विनाशक देवतेप्रमाणें क्रूरपणाची अनेक कृत्यें केलीं व विशेषत: शांतताप्रिय व अहिंसावादी बौद्ध लोकांचे मठ व स्तूप उध्वस्त केले व त्यांतील खजिना लुटून नेला. याप्रमाणें अनेक अनर्थ करून मिहिरगुल ५४० च्या सुमारास मरण पावला. मिहिरगुलाच्या मृत्यूनंतर ऑक्झस नदीकडील पांढ-या हूणांची सत्ता फार दिवस टिकली नाहीं. ६ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तिकडे तुर्क लोक चालून गेले व त्यांनीं इराणच्या राजाबरोबर दोस्ती करून पांढ-या हूणांचा नाश केला. व पुढे तुर्क लोकांनी हूणांचे सर्व साम्राज्य आपल्या ताब्यांत घेतल.
यानंतर सुमारें पन्नास वर्ष म्हणजे इ .स. ५६५ ते ६०५ पर्यंतची हिंदुस्थानांतील परिस्थितीची माहिती उपलब्ध नाहीं. हूण शब्द संस्कृत वाङ्मयांत अनेकवार आला आहे.
शिलालेखांत हूण या नांवाबरोबर गुर्जर, (अर्वाचीन गुजर,) या नांवाचा कित्येकदां उल्लेख येतो. हे गुर्जर परकी असून हूण लोकांचे ते सजातीय असावे, तसेच राजपुतान्यांतील परिहार नांवाची कित्येक क्षत्रिय म्हणून मानलीं जाणारी घराणीं मूळ बाह्य असून हूणांचे वेळीं त्यांनीं राजपुतान्यांत लहान लहान राज्यें स्थापल्यानंतर हिंदुधर्मांत शिरून क्षत्रिय बनलीं असावीं, असें व्हिन्सेंट स्मिथचें मत आहे.
पश्चिम माळवा उर्फ मोलापोचें राज्य- चिनी प्रवाशी ह्युएन-त्संग इ. स. ६४१ च्या सुमारास मोलापोच्या राज्यांत गेला होता. येथील राजाच्या सत्तेखालीं आनंदपुर सुराष्ट्र व कच्छ हीं तीन मांडलिक राज्यें होतीं. शिवाय मोलापो व सुराष्ट्र यांच्यामध्यें वलभीचें राज्य होतें. मोलापो येथें शीलादित्य नांवाचा हुषार व विद्वान राजा होता. तो ह्युएनत्संग येण्यापूर्वीं साठ वर्षें होऊन गेला होता. तो बौद्धधर्मी होता व त्यानें आपल्या राजवाड्याजवळ बौद्ध देवालय बांधून त्यांत सात बुद्धांच्या मूर्ति ठेवल्या होत्या. दरसाल भिक्षूंनां तो मोठमोठ्या देणग्या देत असे. ती चाल हुएनत्संगाच्या वेळेपर्यंत चालू होती. पुढें वलभी व मोलापो ही दोन्हीं राज्यें हर्षानें जिंकून आपल्या साम्राज्यसत्तेखालीं आणलीं. मोलापो व उज्जनी एकच असा बील वगैरे कित्येक लेखकांचा समज आहे. पण वास्तविक मोलापो उर्फ पश्चिम माळवा व उज्जनी किंवा प्राचीन अवंती उर्फ पूर्व माळवा अशीं दोन निरनिराळीं राज्यें होतीं; व दोघांचा स्वतंत्रपणे उल्लेख ह्युएनत्सगंनेंहि केला आहे.