प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
दक्षिण हिंदुस्थानांतील राज्यें.- नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील सर्व प्रदेशाला दक्षिण हिंदुस्थान म्हणतां येईल. परंतु दख्खन या शब्दानें तुंगभद्रानदीपर्यंतच्या प्रदेशांचाच बोध होतो व पलीकडील मद्रास इलाख्यांतला भाग स्वतंत्र गणला जातो. दख्खन म्हणजे व-हाड, हैद्राबाद, महाराष्ट्र व म्हैसूर हा प्रदेश होय. हा डोंगरपठाराच्या प्रदेश असून त्यांतून गोदावरी व कृष्णा या दोन मोठ्या नद्या वाहतात. या प्रदेशांत इ. स. २२५ च्या पूर्वीं चार शतकें आंध्र घराणें राज्य करीत होतें. त्यानंतर इ. स. २२५ ते ५५० पर्यंतच्या काळासंबंधाची नीटशी माहिती उपलब्ध नाहीं. महाराष्ट्रांत राष्ट्रकूट नांवाचें घराणें मात्र- जें पुढें ८ व्या शतकांत विशेष प्रसिद्ध पावलें-बरींच शतकें राज्य करीत असावें असें दिसतें. सर भांडारकर यांनीं १८९६ मध्यें दख्खनचा प्राचीन इतिहास लिहिला. त्यानंतर आणखी उपलब्ध माहिती जमेस धरून दक्षिण हिंदुस्थानाच्या इतिहासावर कांहीं प्रकरणें व्हिसेंटस्मिथनें आपल्या 'हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडिया' या पुस्तकांत आणि रा. चिं. वि. वैद्य यांनीं 'मध्ययुगीनभारत' या पुस्तकांत आणि रा.चिं.वि.वैद्य यांनी 'मध्ययुगीनभारत' या पुस्तकांत लिहिली. तथापि दक्षिणहिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास स्वतंत्र सविस्तर व सुसंगतवार अद्याप लिहिला जावयाचा आहे. तूर्त महाराष्ट्रांतील चालुक्य व राष्ट्रकूट आणि मद्रासकडील पांड्य, चेर उर्फ केरल, चोल व पल्लव या घराण्याची माहिती थोडक्यांत येथें देतों.
चालुक्य- चालुक्य राजे स्वतःस रजपुताचे वंशज म्हणवितात. चालुक्यांच्या शिलालेखांतर अयोध्येच्या राजवंशापासून चालुक्यांची उत्पति झाली असल्याचें म्हटलें आहे. या राजघराण्याचा आद्यसंस्थापक पहिला पुलकेशी यानें इ.स. ५५० च्या सुमारास विजापूर जिल्ह्यांतील वातापि, अलीकडील बदामी, येथें राज्य स्थापून आसपासचा प्रदेश जिंकला; इतकेंच नव्हे तर, सम्राट पदाची आकांक्षा धरून अश्वमेध यज्ञहि केला असें म्हणतात. पुलकेशीच्या कीर्तिवर्मा व मंगलीश या पुत्रांनीं आपलें राज्य पूर्वेकडे व पश्चिमेकडे आणखी वाढविलें. त्यानंतरचा राजा दुसरा पुलकेशी (इ. स. ६०८-६४२) हा फार पराक्रमी होता. त्यानें चोल, पांड्य, केरल, पल्लव वगैरे आसपासच्या राज्यांवर, आणि गुजराथ, राजपुताना, माळवा वगैरे दूरदूरच्या प्रांतांवरहि स्वा-या केल्या. इ. स. ६२० च्या सुमारास सम्राट् हर्षानें दक्षिणेंत केलेली स्वारीहि पुलकेशीनें परतविली. या पराक्रमी चालुक्य राजाची कीर्ति हिंदुस्थानाबाहेरहि पसरून इराणचा राजा दुसरा खुशरू व पुलकेशी यांनीं परस्परांच्या दरबारी आपआपले वकील पाठविले. इराणी वकील चालुक्य राजाला आपले खलिते अर्पण करीत आहेत असा प्रकारचा देखावा अजिंठा येथील लेणे नं. १ मध्यें आहे. इ. स. ६४१ मध्यें चिनी प्रवाशी ह्युएनत्संग पुलकेशी राजाच्या दरबारीं गेला होता. त्या वेळीं पुलकेशीचा मुक्काम नाशिक नजीक होता. पुलकेशीच्या या उत्कर्षावर ६४२ मध्यें संकट आलें. कांचीचा पल्लव राजा नरसिंहवर्मा यानें पुलकेशीची राजधानी हस्तगत करून त्याला ठार मारलें.
नंतर तेरा वर्षांनीं पुलकेशीचा मुलगा पहिला विक्रमादित्य यानें ६५५ मध्यें आपलें शत्रूनें घेतलेलें राज्य परत मिळविलें. तथापि पुढें अनेक वर्षें चालुक्य व पल्लव राजांमध्यें झगडा चालू राहिला. त्यांत अखेर चालुक्य घराणें नामशेष होऊन त्या ठिकाणीं राष्ट्रकूट नांवाचें निराळें राजघराणें इ. स. ७५० च्या सुमारास उदयास आलें.
या राष्ट्रकूट घराण्याकडे दोन सव्वादोन शतकें राजसत्ता राहिल्यानंतर इ. स. ९७३ मध्यें चालुक्य घराण्यांतील तैल उर्फ दुसरा तैलप नांवाच्या एका वंशजानें राष्ट्रकूट घराण्याचा शेवटचा राजा दुसरा कक्क यास पदच्युत करून पुन्हां चालुक्यांची सत्ता स्थापिली. या दुस-या चालुक्य घराण्यानें आपलें वैभव बरेंच वाढविलें. या घराण्यांतील सहावा विक्रमादित्य (१०७६-११२६) हा बिल्हणानें लिहिलेल्या ऐतिहासिक काव्याचा नायक आहे. या घराण्याची राजधानी निजामच्या राज्यांतील कल्याणी येथें होती. याज्ञवल्क्यस्मृती वरील सुप्रसिद्ध टीकाग्रंथ 'मिताक्षरा' याचा कर्ता विज्ञानेश्वर हा कल्याणीचाच रहिवाशी होय. या चालुक्यांच्या राज्यास विक्रमादित्यानंतर उतरती कळा लागून इ. स. ११९० मध्यें तें नष्टप्राय झालें. त्यानंतर चालुक्यांचें लहानसें राज्य अस्तित्वांत होतें.
रा ष्ट्र कू ट.- चालुक्यांनां पदच्युत करून राष्ट्रकूट घराण्यानें महाराष्ट्रांत आपली सत्ता स्थापिली. यांतील कांहीं महत्त्वाचे राजे येणेप्रमाणे:-
१ दंतिदुर्ग ७५३ ६ दुसरा कृष्ण ८७५
२ कृष्ण ७७३ ७ तिसरा इंद्र
३ ध्रुव ७८३ ८ दुसरा अमोघवर्ष
४ गोविंद ९ तिसरा कृष्ण ९४०-९६१
५ अमोघवर्ष ८१५ १० खोट्टिग ९७१
११ कोक्कल ९७२-९७४
मालखेडचें राष्ट्रकूट घराणें महाराष्ट्रांत फार प्रसिद्ध आहे. हे राष्ट्रकूट आपणांस चंद्रवंशी समजतात. अरबांनीं सिंध व कच्छ जिंकल्यावर त्यांनीं आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला परंतु राष्ट्रकूटांच्या पराक्रमापुढें त्यांनां माघार घ्यावी लागली, व त्यामुळें मुसुलमानी अंमलाचें महाराष्ट्रावरील संकट पांच शतकें पुढें ढकललें गेलें. शिवाय राष्ट्रकूटांनीं अलीकडील मराठ्यांप्रमाणें उत्तरेकडेहि स्वा-या केल्या, व माळवाप्रांत जिंकून स्वराज्यास जोडला इतकेच नव्हे तर भयाण व विस्तृत यमुनानदी ओलांडून कनोज उध्वस्त करून टाकलें. कलाकौशल्यांतहि राष्ट्रकूटांनीं आपलें चिरंतन स्मारक करून ठेविलें आहे. वेरूळ येथील मनास थक्क करून सोडणारें 'शिवलेणें' दंतिदुर्गाच्या पुढील कृष्ण नामक राजानें करविलें होतें. हें शिवाचें देवालय एक प्रचंड डोंगर खोदून तयार केलेलें आहे.
या द व.- देवगिरीचे यादव हे चालुक्यांच्या राज्यांतील सरदार होते. त्यांनीं देवगिरी (दौलताबाद) व नाशिक यांच्या दरम्यानच्या मुलुखावर राज्य स्थापलें. यादव घराण्यांतला सर्वांत बलिष्ठ राजा सिंघण (इ. स. १२१०) यानें गुजराथ व इतर देश जिंकून राष्ट्रकूट व चालुक्य राजांइतका आपल्या राज्याचा विस्तार वाढविला. परंतु यादवांचें राज्य फार काळ टिकलें नाहीं. इ. स. १२९४ मध्यें दिल्लीच्या अल्लाउद्दिनानें देवगिरीच्या रामदेवाचा पराभव केला. व अखेर १३१८ मध्यें मुसुलमानांनीं ते राज्य नष्ट केलें.