प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

गुप्त घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त (इ .स. ३२०-३३० किंवा ३३५).- पाटलिपुत्र येथील किंवा त्याच्या शेजारचा स्थानिक राजा चंद्रगुप्त याचा विवाह इ. स. ३०८ मध्यें किंवा त्या सुमारास लिच्छवी जातीच्या एका कुमारदेवी नांवाच्या राजकन्येशीं झाला. लिच्छवी जातीचे लोक प्राचीन काळच्या बौद्ध संप्रदायी ग्रंथांत विशेष वर्णिलेले आहेत. अजातशत्रूची कारकीर्द, आणि वर सांगितलेला कुमारदेवीचा विवाह या दोन गोष्टींच्या दरम्यानच्या सुमारें आठ शतकांच्या कालावधींतील या लिच्छवी जातीचा इतिहास बहुतेक नष्ट झालेला आहे. मनुस्मृतीनें लिच्छवीची गणना शूद्रांत केली आहे. त्यांनीं नेपाळांत एक राजघराणें स्थापलें होतें. उपर्युक्त विवाहानें या जातीचें नांव पुन्हां पुढें आलें. या विवाहाचें महत्त्व विशेष आहे, कारण या दांपत्यानें मौर्यांच्या तोडीच्या एका राजघराण्याचा पाया घातला. शिवाय कुमारदेवीबरोबरच्या विवाहानें चंद्रगुप्ताचें वर्चस्व. मगध व त्या शेजारच्या देशांत थोडक्या वर्षांत स्थापन होण्यास फार मदत झाली. वैशालीचे लिच्छवी आणि पाटलिपुत्र येथील राजे यांची फार वर्षें स्पर्धा चालू होती, व पुष्यमित्रांनंतरच्या अस्वस्थतेच्या काळांत या लिच्छवींनीं पाटलिपुत्र जिंकून घेतले होतें असें दिसतें. या लिच्छवीबरोबरच्या शरीरसंबंधामुळें चंद्रगुप्ताला बाप व आजा यांच्या संस्थानिकाच्या दर्जापेक्षां बराच मोठा दर्जा प्राप्त झाला. तो आपल्या नाण्यांवर स्वतःच्या नांवाबरोबर आपल्या लिच्छवी राणीचेंहि नांव घालीत असे हें वर सांगितलेच आहे. या पहिल्या चंद्रगुप्तानें गंगायमुनांच्या कांठचा प्रदेश जिंकून घेतला, व तिरहुत, दक्षिण बहार, अयोध्या व शेजारचे प्रांत एवढ्यावर राज्य केलें. यानें आपल्या घराण्याचा नवा शकहि सुरू केला. त्यानें मरणापूर्वीं लिच्छवी राणीचा मुलगा समुद्रगुप्त याला युवराज्याभिषेकहि केला होता.