प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

ठाणेश्वर येथील राजघराणें.- सहाव्या शतकाच्या उत्तरार्धांतील हिंदुस्थानचा इतिहास अज्ञात आहे. सातव्या शतकापासून मात्र ही अडचण दूर होऊन आपला ज्ञात काळांत पुन्हा प्रवेश होतो. नाणीं, शिलालेख इत्यादि साधनांखेरीज तत्कालीन ग्रंथहि आज उपलब्ध आहेत. त्यांत चिनी प्रवाशी ह्युएनत्संग यानें लिहून ठेवलेले प्रवासवृत्त हा ग्रंथ बहुमोल आहे. यानें इ. स. ६३० ते ६४४ यांच्या दरम्यान हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत फिरून प्रत्येक राज्य व प्रांत यांचें वर्णन लिहून ठेविलें आहे. शिवाय ह्युएनत्संगचा चरित्रकार हवुडली यानें बरीचशी अधिक माहिती दिली आहे. दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे बाणाचें 'हर्षचरित्र' हा संस्कृत ग्रंथ होय.

ठाणेश्वर येथें ६ व्या शतकाच्या उत्तरार्धांत प्रभाकरवर्धन नांवाचा राजाराज्य करीत होता. पण या ठाणेश्वर येथील राजासंबंधाची माहिती सातव्या शतकापासूनची मिळते. ठाणेश्वरच्या आसपासचा प्रदेश फार प्राचीनकाळापासून 'कुरूक्षेत्र' म्हणून प्रसिद्ध आहे. सातव्या शतकाच्या आरंभीं ठाणेश्वरचा प्रभाकरवर्धन हाच उत्तर हिंदुस्थानांतील राजमंडळांत प्रमुख होतात. त्यानें यापूर्वींच हूण लोकांचा पराभव केला होता. हूणांशिवाय सिंधप्रांताचा तत्कालीन राजा व राजस्थानांतील गुर्जर या प्रमुख राज्याचा अधिपति यांचाहि प्रभाकरवर्धनानें पराभव केला असून सहाव्या शतकाच्या अखेरीस त्यानें माळवा व गुजराथ येथील राजांनांहि आपलें अंकित केलें होतें. पुढें इ. स. ६०५ मध्यें हूण लोकांनीं मागील पराभवाचा सूड उगविण्याकरितां ठाणेश्वरावर चाल केली. त्यांचा पराभव प्रभाकरवर्धनाचा ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन यानें केला. इतक्यांत प्रभाकरवर्धन मृत्यू पावला व त्याचा ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन राज्यावर आला. परंतु त्यास पुरें एक वर्ष देखील राजकांरभार करावयास मिळाला नसेल. प्रभाकरवर्धनाची मुलगी राज्यश्री कनोजच्या मौखरी घराण्यांतील ग्रहवर्मा यास दिली होती. या कनोजच्या राज्यावर माळव्याचा राजा देवगुप्त यानें स्वारी करून ग्रहवर्म्यास ठार मारलें व त्याची पत्नी राज्यश्री हिला बंदींत टाकलें आणि आपला मित्र बंगालचा राजा शशांकगुप्त याच्या मदतीनें ठाणेश्वरावर हल्ला करण्याचें ठरविलें. पण शशांकगुप्त त्यास येऊन मिळण्यापूर्वींच राज्यवर्धनानें देवगुप्ताच्या सैन्याचा पराभव करून त्यास ठार मारलें. इतक्यांत देवगुप्ताचा मित्र बंगालचा शशांकगुप्त येऊन पोहोचला. व त्यानें राज्यवर्धनाजवळ तहाचें बोलणें सुरू करून एके दिवशीं भोजनाच्याप्रसंगीं त्याचा कपटानें वध करविला. इ. स. ६०६ मध्यें ही गोष्ट घडली. प्रभाकरवर्धनाच्या मृत्यूनंतर ठाणेश्वरचें राज्य त्याचा धाकटा भाऊ हर्ष याजकडे आलें.