प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
दक्षिणेंतील धार्मिक परिस्थिति.- दक्षिणेंतील मूळच्या लोकांत भुताखेतादि तामसी दैवतांची पूजा चालू असे. असल्या रानटी चालीरीतींवर हिंदु संस्कृतीचा व जैव आणि बौद्ध संप्रदायांचा परिणाम होऊन सुधारणा झाली. चंद्रगुप्त मौर्याच्या कारकीर्दींत ख्रि. पू. ३०९ च्या सुमारास बारा वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता त्या तडाक्यांत कित्येक जैंन लोक दक्षिणेकडे गेले, व त्यांनीं बौद्ध प्रचारक दक्षिणेंत जाण्याच्या एक शतक पूर्वींच जैन संप्रदायाचा तिकडे प्रसार केला. हें जैन मत म्हैसूर व इतर प्रांतांत ख्रिस्तोत्तर ७ व्या शतकापर्यंत बरेंच पसरलेलें होते. बौद्धसंप्रदायाचा दक्षिणेंत प्रसार अशोकाचा बंधु महेंद्र व अशोकानें पाठविलेले इतर प्रचारक यांनीं ख्रि. पू. तिस-या शतकाच्या मध्याच्या सुमारास केला. तथापि बौद्ध मताचें वर्चस्व दक्षिणेंत कधींहि नव्हतें. ख्रिस्तोत्तर ७ व्या शतकांत तर जैन व हिंदु धर्मांच्या प्राबल्यामुळें बौद्धमत बहुतेक नष्टप्रायच झालें; व अखेर हिंदुधर्माचा जैनमतावरहि विजय झाला. तेव्हांपासून इतर प्रांतांपेक्षां जातिभेदोपन्न आचारांची तीव्रता मद्रासकडे फार वाढली आहे.