प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
सामाजिक स्थिति व व्यापार.- दक्षिणेंतील राज्यांत आपसांत लढाया नेहमीं चालू असत हें खरें आहे. तथापि त्यामुळें सर्वत्र अशांतता होती किंवा वाङ्मय, कलाकौशल्य व व्यापार यांची वाढ झाली नाहीं असें मात्र नाहीं. या संबंधानें मिगॅस्थिनीझ म्हणतो: 'समाजांतील मोठा वर्ग शेतक-यांचा असून तो अत्यंत शांतताप्रिय आहे. त्या वर्गाला लष्करी नोकरीची माफी आहे, इतकेंच नव्हे तर त्याच्या शेतकीच्या धंद्याला लढाऊ वर्गाकडून बिलकूल उपद्रव होत नाहीं. एकीकडे लढाई चालू असली तरी दुस-या बाजूला शेतकरी शेतकीचीं कामें बिनधोकपणें करीत असतात;'
या तामिळ देशांत मिरी, मोतीं व पाच हे दुसरीकडे न मिळणारे व्यापाराचे जिन्नस फार असत. मि-यांनां यूरोपमधील बाजारांत फार किंमत येत असे. पाच या रत्नास रोमन व्यापारी भारी किंमती देऊन नेत असत, व मोतीं नेण्याकरितांहि दूरदूरचे व्यापारी दक्षिणेंत येत असत.
दक्षिणेकडील राजे स्वतःविद्वान् व विद्वानांचे मोठे आश्रय दाते होते यासंबंधीं उल्लेख वर जागोजागीं आलेच आहेत.
हर्षाचें साम्राज्य हेंच शेवटचें उत्तर हिंदुस्थानांतील हिंदूंचे साम्राज्य होय. अशोकानंतर उत्तर हिंदुस्थानांत सर्व हिंदुस्थानास एकत्र करणारी हिंदू शक्ति उत्पन्न झाली नाहीं. सर्वांत मोठा होऊन गेलेला राजाधिराज म्हणजे हर्षवर्धन त्याचें दक्षिणेंत सत्याश्रय पुलकेशीनें बिलकूल चालूं दिलें नाहीं. त्यावेळेस हर्ष व पुलकेशी हे दोन समान बलाचे सम्राट उत्तरेस व दक्षिणेस होते, आणि यानंतर हिंदू शक्तीनें हिंदुस्थान व दक्षिण यांचें तात्पुरतें ऐक्य करण्यांचें श्रेय बाळाजी बाजीरावास मिळालें.
गुप्त साम्राज्य मोडल्यानंतर चोहोंकडे अनेक स्थानिक राज्यें उत्पन्न झालीं. साम्राज्य नष्ट झालें म्हणजे स्थानिक राज्यें बलवान व्हावयाचींच. या त्यांच्या कालांत देशी भाषांचा अधिक विकास झाला. गुप्तनाशापासून ही क्रिया मुसुलमानी स्वारीपर्यंत चालू होती. आणि तशीच क्रिया युरोपांतहि चालू होती. सातवें व आठवें शतक घेतलें तर असें म्हणतां येईल कीं, फ्रान्स पासून चीनपर्यंतच्या जगांत सुरळीत चाललेलें बलवान साम्राज्य म्हणजे खलीफात हेंच होतें. पश्चिम युरोपांत जो जोरदार होई त्यानें पूर्वेकडील बादशाचें नामधारी अंकितत्व मान्य करावें पण सत्ता आपणच चालवावी. नवव्या शतकाच्या आरंभीं पश्चिमेकडे नवीन साम्राज्य स्थापन झालें. पण त्यानें नामधारी परंपरा रोमची घेतली, नवव्या दहाव्या व अकराव्या या तीन शतकांत हिंदुस्थानांत आणि युरोपमध्यें स्थानिक राज्यांचा जोम, देशी भाषांचा विकास व भाषामूलक लोकसंघाच्या समाजाची जाणीव या क्रिया चालू होत्या.