प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
हर्षवर्धन (इ .स. ६०६-६४७).- राज्यवर्धन मारला गेला त्यावेळीं हर्षाचें वय अवघें सोळा वर्षाचें होतें. त्यानें प्रथम मालवाधिपाच्या अटकेंतून आपली सुटका करून घेऊन रानावनांत पळून गेलेल्या आपल्या बहिणीचा शोध लावला व तिला कनोजच्या गादीवर बसवून आपण राजपुत्र शिलादित्य हें नांव धारण करून तो कनोज येथून कनोजचा व ठाणेश्वराचा कारभार पाहूं लागला. या पुढील सहा वर्षांत हर्षानें पूर्वेस व पश्चिमेस स्वा-या करून पंजाब खेरीज करून उत्तर हिंदुस्थानांतील बहुतेक राजांवर आपलें अधिराज्य स्थापित केलें. येणेंप्रमाणें आपला दिग्विजय संपविल्यावर इ. स. ६१२ या वर्षीं त्यानें आपला राज्यारंभापासून सुरू होणारा आपल्या नांवाचा शक सुरू केला. यानंतरची हर्षाची ३५ वर्षांची कारकीर्द जवळ जवळ शांततेंतच गेली. इ. स. ६२० त त्यानें दक्षिणेस आपले साम्राज्य पसरविण्याचा उद्देशानें नर्मदेच्या दक्षिणेस राज्य करीत असलेल्या दुस-या पुलिकेशीवर स्वारी केली पण तींत त्याला पराभव पावून परत यावें लागलें. ६४३ च्या पूर्वीं कांहीं वंर्षे त्यानें वलभीवर स्वारी करून पश्चिमेकडील राजाकडून आपलें सार्वभौमत्व कबूल करून घेतलें व ६४३ त बंगालच्या उपसागरावरील गंजमच्या राज्यावर स्वारी करून विजय संपादन केला. हर्ष या शेवटच्या स्वारीनंतर चारच वर्षांनीं म्हणजे इ. स. ६४७ त मरण पावला.