प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

हर्षकालीन सामाजिक स्थिति.- यासंबंधी ह्युएनत्संग म्हणतो:-
''या देशांत आनुवंशिक अशा चार भिन्न जाती आहेत. या जातींत ब्राह्मण हे अति शुद्ध व सर्वांनां बहुमान्य असे आहेत. क्षत्रियांचा क्रम वरून दुसरा असून त्यांत राजे लोकांचा अंतर्भाव होतो. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचें वर्तन निष्कलंक आणि अगदीं साधें असून त्यांच्यांत डामडौल फारसा नसतो व त्यांची राहणी काटकसरीची असते. तिसरी जात वैश्यांची म्हणजे व्यापा-यांची असून ते नानाविध वस्तूंचा देशींपरदेशीं व्यापार करून द्रव्यसंचय करतात. चवथी जात म्हणजे शूद्रांची अथवा शेतक-यांची होय. धार्मिक विधींच्या शुद्धतेच्या मानानें या चार जाती मिसळून पुष्कळ दर्जांचे वर्ग झालेले आहेत. या लोकांत विवाह फक्त जातीजातीमध्येंच होतो. बापाकडून किंवा आईकडून कांहीं पिढ्यांपर्यंत सपिंडसंबंध असलेल्या स्त्रीपुरूषांचा विवाह होत नाहीं आणि स्त्रिया पुनर्विवाह कधींच करीत नाहीत'' (वाटर्सकृत ह्युएनत्संगाचे लेख पृ. १४१, १५७ व १६९ पहा.)

या काळांत भिन्न जातींत विवाह झाल्याचीं कित्येक उदाहरणें सांपडतात. उदाहरणार्थ, हर्ष हा वैश्यवर्णी असून त्याची मुलगी वलभीच्या क्षत्रियवर्णीं ध्रुवभाटास व बहीण मौखरीच्या क्षत्रियवर्णी ग्रहवर्म्यास दिलेली होती व विशेष हा कीं, हर्षाच्या कन्येच्या म्हणजे ध्रुवभटाच्या पुत्राला क्षत्रियांकहून कमी असें कोणीं मानिलेलें नाहीं. ब्राह्मणवर्ग हा अद्यापि एकच असून त्याचे हल्लींच्या सारखे गुर्जरब्राह्मण, महाराष्ट्रब्राह्मण वगैरे देशभेदानुसार पोटभेद झालेले नव्हते. तत्कालीन शिलालेखांत व ताम्रपटांत ब्राह्मणासंबंधानें लिहितांना गौड, द्रविड, असल्या विशेषणांचा उपयोग न करतां त्यांच्या गोत्राचा व शाखेचाच फक्त निर्देश केलेला असतो. आजच्या क्षत्रियांत आपली पूर्व पीठिका सूर्य, चंद्र व अग्नि यांच्यापर्यंत नेऊन भिडविण्याचा जसा प्रघात आहे तसा प्रकार हर्षकाळीं फारसा प्रचलित असलेला दिसत नाहीं. वलभी राजांच्या दानलेखांतहि सेनापतिघराणें म्हणजे ज्यांशीं हल्लींचें मुख्य सूर्यवंशी शिसोद्यांचें रजपूत घराणें आपला संबंध जोडतें ते सूर्यवंशी होतें असें सांगितलें नाहीं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांशिवाय ‘आपआपल्या कामाप्रमाणें स्वतंत्र संघानें राहणारे वर्ग अनेक असून त्यांचें वर्णन करणें शक्य नाहीं' असें ह्युएनत्संगानें म्हटलें आहे (वाटर्सकृत ह्युएनत्संग पृ. २६८). आणखी एका मद्रासेकडील पंचमांसारख्या तत्कालीन वर्गाचा ह्यु-एन-त्संगानें उल्लेख केला आहे. तो म्हणतोः 'खाटीक, मासे धरणारे, झाडु, कत्तल करणारे, मांग इत्यादि लोकांच्या वसतिस्थानांवर कांहीं विशिष्ट निशाणी असे. त्यांनां सर्वत्र गांवाबाहेर रहावें लागे आणि गांवाच्या रस्त्यांतून समोरून जातांना आपल्या डावीकडून ते हळून जपून जपून चालतात (वाटर्सकृत ह्यु-एन-त्संग पु.१, पृ. १४७).

स मा ज स्थि ति.- आपण पाहिलेल्या लोकांच्या वस्त्र प्रावरणाचें वर्णन ह्युएनत्संगानें असें केलें आहे: 'या लोकांचे आंतले व बाहेरचे असे कोणतेच कपडे शिवून तयार केलेले नसतात. त्याचा रंग स्वच्छ पांढरा असून छिटकावाचा किंवा मिश्र रंग त्यांनां आवडत नाहीं. पुरूष मंडळी कमरेभोंवतीं एक लांब वस्त्र गुंडाळतात आणि तसेंच दुसरें खाकांपर्यंत नेऊन उजवा खांदा उघडा ठेवतात. त्यांच्या स्त्रिया लांबच लांब झगेवजा वस्त्र नेसतात व तें दोन्ही खांद्यावरून जाऊन खालीं मोकळें सुटलेलें असतें. त्यांच्या डोक्याच्या वरच्या भागावरील केसांची गांठ बांधलेली असते व बाकीचे तसेच मोकळे राहतात. पुरूष कांहीं आपल्या मिशा कातरतात व कांहीं त्यांच्या निरनिराळ्या त-हा करतात. ते डोक्यावर फुलांच्या माळा गुंडाळून डोक्यावर हार घालतात'' (वाटर्सकृत ह्युएनत्संग पृ. १५१). ह्युएनत्संगाच्या ह्या पोषाखासंबंधीं वर्णनास हर्षचरितांत बाणभट्टानें हर्षाच्या पोशाखासंबंधीं जें वर्णन केलें आहे त्यानें पुष्टीच मिळतें (ह .च. उच्छवास ७). राज्यश्रीच्या विवाहप्रसंगीं आणिलेल्या वस्त्रांचें बाणानें जें वर्णन केलें आहे (उच्छवास ४) त्यावरून हिंदुस्थानांत रेशीम, कापूस, लोंकर इत्यादिकांची अति तलम वस्त्रें बनत होतीं असें दिसतें. बिनकाठाचीं साधीं व शुभ्र वस्त्रें आतां प्रमाणें तेव्हांच्याहि स्त्रियांनां पसंत नसत; तशीं वस्त्रें केवळ विधवा मात्र वापरीत असें प्रभाकरवर्धन मृत्यु पावला असतां हर्षानें केलेल्या शोकाच्या वर्णनांत ''परिधत्तां धवले वाससी वसुमती'' असें जें म्हटलें आहे त्यावरून अनुमान होतें (उच्छवास ५).

तत्कालीन लोकांचीं वस्त्रें जरी वर सांगितल्याप्रमाणें साधीं होतीं तरी त्यांनां दागिन्यांची फार आवड असे. ह्युएनत्संग म्हणतो 'राजे व सरदार लोक डोक्यावर किरीट चढवीत असून बोटांत आंगठ्या, मनगटांत कडीं, आणि गळ्यांत रत्नांचे हार घालतात (पृ. ५१). या दागिन्यांशिवाय अंगद नांवाचीं बाहुभूषणें आणि कुंडलें व केयूर नांवाचीं कर्णभूषणें बाणानें सांगितलीं आहेत. ही पुरूषाच्या दागिन्यांची गोष्ट झाली. अर्थात् स्त्री-मग ती कितीहि गरीब असो- कांहीतरी दागिने अंगावर घातल्याशिवाय राहणारच नाहीं. पादत्राणासंबंधीं ह्युएनत्संग म्हणतो कीं बहुतेक लोक अनवाणीच चालत असतात. लष्करी अधिकारी दाढी वाढवीत आणि कल्लेहि राखीत असें हर्षचरितांत ठाणेश्वरच्या सेनापतीचें जे वर्णन केलें आहे त्यावरून दिसतें (उच्छवास. ६).

बाणानें मयूरकवीच्या प्रौढ बहिणीशीं विवाह केला अशी जी कथा आहे तिजवरून व हर्षचरितांत बाणानें विवाहाच्या दिवशींच वधूचा गर्भाधान संस्कार झाल्याचें जे वर्णन केलें आहे त्यावरुन त्या काळीं प्रौढविवाह रूढ होते असें व्यक्त होतें. एका ठिकाणीं बाणानें विधवा स्त्रीच्या वेणीचा उल्लेख केला आहे (''बन्धातु वैद्यव्य वेणीं वरमनुष्यता उच्छवास ५''). त्यावरून विधवांचें वपन जें आज दृष्टीस पडतें तें त्या काळीं नव्हतें असें रा. वैद्य आपल्या मध्ययुगीन भारतांत म्हणतात. परंतु ती चाल या काळीं मुळींच प्रचलित नव्हती असें म्हणतां येत नाहीं कारण राजस्त्रियांसंबंधी या काळाच्या अगोदर होऊन गेलेल्या कालिदासाच्या रघुवंशांत गतभर्तृका 'अमलकाम्सपत्नपरिग्रहान्' असें वर्णन आलें आहे. सतीची चाल त्यावेळीं अस्तित्वांत होतीसें दिसतें. हर्षाच्या आईनें पति आसन्नमरण झाला असतांच निराशेनें अग्निप्रवेश केला. ग्रहवर्मा मालवराजाकडून मारला गेल्यावर राज्यश्री कनोजहून निसटली व पुढील दुर्दशा टाळण्यासाठीं अग्निप्रवेश करीत होती असें वर्णन आहे. स्वामीविषयींचें दुःख अनावर झाल्यामुळें केव्हां केव्हां पुरूष देखील अग्निप्रवेशाचा अवलंब करीत. प्रभाकरवर्धनाच्या मृत्युसमयीं त्याचा राजवैद्य रसायन, विश्वासू मंत्री आणि दुसरे कांहीं सेवक यांनीं अग्निप्रवेश केला.

  धार्मिकस्थिति-  हर्षकाली जैन संप्रदाय अद्याप महत्त्वास पोंचला नसून त्याचे अनुयायी पंजाब, बंगाल व दक्षिण यांतच कायते थोड्या ठिकाणी दृष्टीस पडत होते. बौद्धांचें प्राबल्य विशेषतः अगदी वायव्य सरहद्दीवरील कपिश (काफरिस्थान) देशांत होतें तर अगदीं ईशान्येकडील आसाम वगैरे भागांत बहुतेक हिंदूंचाच भरणा होता. इतर प्रांतांत हिंदुधर्म व बौद्धपंथ यांच्या अनुयायांची संख्या साधारणतः समसमानच होती. या वेळचे हिंदू काय किंवा बौद्ध काय हे दोघेहि सारखेच मूर्तिपूजक होते. शिव, विष्णु, सूर्य आणि बुद्ध यांचीं अनेक मंदिरें त्या त्या देवतांच्या भक्त राजांनीं, बड्या अधिका-यांनीं व श्रीमंत व्यापा-यांनीं बांधलेलीं होतीं. मूलस्थानपूर येथें सूर्याचें प्रचंड मंदिर असून त्यांत सुवर्णाची मूर्ति व तीस रत्नजडित अलंकार असल्याचें ह्युएनत्संगनें म्हटलें आहे (वाटर्स पु. २, पृ. २५४). याच्याच जोडीचें दुसरें महत्त्वाचें मंदिर म्हणजे काशीचें शिवाचें देवालय होय. ह्युएनत्संग म्हणतो कीं, या देवालयांत दररोज १०,००० शिवभक्त दर्शनास येत असून देवाची ७० हात उंचीची भव्य व सुबक मूर्ति सजीव माणसासारखी वाट ! (वैद्य) शैव पंथांतील कित्येक शिवभक्तांच्या कल्पना अति विलक्षण होत्यासें दिसतें. शिवाचे गण म्हणून कोणी राक्षस व पिशाच्च असतात व त्यांना संतुष्ट करावयाचें तर मनुष्याचे बळी किंवा प्रेतमांसाच्या आहुती दिल्या पाहिजेत असें ते लोक मानीत. या लोकांनां पाशुपत असें नांव असून गळ्यांत ते नररुंडाच्या माळा घालीत असें ह्युएनत्संगानें त्यांचे वर्णन केलें आहे. असल्या विधींत पुरोहित म्हणून ज्यांचें नांव येतें ते द्रविड किंवा आंध्र असत (हर्षचरित उच्छवास पांच). शिवपूजेसारखीच जी दुसरी अघोरी पद्धतीची चंडिका पूजा तींतहि द्रविड व आंध्र हेच पुरोहित असत. यांच्या खालोखल कुमार म्हणजे कार्तिक स्वामीचें महात्म्य दिसून येतें व क्वचित् कोठें गणपतीचेहि भक्त आढळतात.

गुप्तांच्या काळापासून हिंसाप्रधान यज्ञांचें पुनरूज्जीवन झालें होतें परंतु हर्षानें त्यास पुन्हा बंदी केली. प्राचीन वैदिक कर्ममार्गाचा अवशेष म्हणून त्याकाळीं बहुतेक ब्राह्मणांच्या घरांत अग्निहोत्र असे. त्याचप्रमाणें उत्तरवेदकालीन मार्गाचा भाग जो संन्यासाश्रम त्याचे देखील भक्त व अनुयायी हर्षकाळीं पहावयास सापडत. या सन्याशापैकीं कित्येक खरोखर फार सत्शील व विद्वान असत पण त्यांच्यांत बहुतेक भरणा उदरंभरी अधार्मिक लोकांचाच असून त्यांनीं आपल्या आश्रमाला तिरस्कारार्ह करून सोडलें होतें. या सन्याशांना हर्षचरित्रांत पाराशरी असें नांव असून बाणभट्ट म्हणतो कीं, या पाराशरीमध्यें अधार्मिक नाहीं असा माणूस विरळाच (उछवास ६). ह्युएनत्संग व बाणभट्ट या दोघांच्या साक्षीवरून हर्षाच्या काळीं सर्व हिंदुस्थानभर बौद्ध मठ पसरले असून त्यांत हजारो भिक्षू व भिक्षुणी यांना आश्रय मिळे. या काळीं तत्वज्ञान्यांत किती भिन्न वाद होते हें आठव्या उछवासांत हर्ष दिवाकरमित्र नांवाच्या भिक्षूच्या मठांत गेला असतां तेथें आपापले सिद्धांत स्थापन करण्यासाठीं जे जैन, संन्यासी, श्वेतांबर जैन, श्वेतवस्त्री भिक्षु, भागवत, ब्रह्मचारी, केशलुंचक, सांख्य, चार्वाक, वैशेषिक, वेदांती, नैय्याइक, धातुवादी, धर्मशास्त्री, पौराणिक, साप्ततंतू (पूर्वमीमासक यज्ञवादी) शैव, वैय्याकरण, पांचरात्र (वैष्णव) इत्यादि लोक जमल्याचें सांगितलें आहे त्यावरून चांगलें ध्यानांत येतें. या यादींत जैन शब्द बौद्धवाचक असून ज्यांनां आपण जैन म्हणतों त्यांनां अर्हत् म्हटलेलें असतें. या लोकांमध्यें तात्त्विक विषयावर होणारे वादविवाद ऐकण्याची तत्कालीन राजांनां व लोकांनां मोठी आवड असे. हे निरनिराळे मतवादी आपआपसांत कितीहि निकरानें विवादले तरी त्यांतील लोकायतिक म्हणजे नास्तिकवादी चार्वाक सोडून इतर सर्व आत्म्याचें आस्तित्व व कर्मानुसार त्याचें अनेक योनींत भ्रमण मानणारे होते. त्यांच्या विषयीं ह्युएनत्संग म्हणतो कीं, हे लोक उतावळ्या व अनिश्चित स्वभावाचे असूनहि ते कोणाची वस्तु अन्यायानें घेत नाहींत व न्यायानें द्यावें लागावयाचें त्याहूनहि अधिक देतात. पापाचें प्रायश्चित अन्य जन्मीं भोगिलें पाहिजे अशी त्यांची खात्री असल्यामुळें ते पापाला भितात व या जन्मीं नीतीनें वागण्याचा प्रयत्न करितात (वाटर्स पु. १ पा. १७१).

कृष्णभक्तीनें हिंदुलोकांमध्यें गाई व बैल यांबद्दल पूज्यबुद्धि उत्पन्न झाल्यामुळें गोवध व त्याबरोबर दुस-याहि मोठ्या प्राण्यांचा वध हे भरतखंडांतून अजीबात नाहींसे झाले होते. ह्युएनत्संग म्हणतो कीं, बैल, गाढव, हत्ती, घोडे, कुत्रे, डुकरें, कोल्हे, लांडगे, सिंह, वानर, व माकडें यांचें मांस लोकांस सर्वस्वी वर्ज आहे व जे कोणी या मांसाचें सेवन करितात ते अंत्यज वर्गांत जातात (वाटर्स पु. १ पा. १७८). परंतु याखेरीज इतर कांही प्राण्यांचें मांस निषिद्ध नसून तत्कालीन क्षत्रिय, बहुधा ब्राह्मण सुद्धां बोकड व हरीण यांचें मांस खात असत. मासे तर सर्वांनांच चालत. शिवाय गुप्तांच्या साम्राज्यांत अश्वमेधाचें पुनरुज्जीवन झाल्यामुळें त्यांत बैल व घोडा यांचा वध होत असला पाहिजे. यज्ञार्थ हिंसा म्हणजे हिंसाच नव्हे असें हे यज्ञप्रवर्तक प्रतिपादन करीत असत.