प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
चवथ्या शतकापासून हिंदुस्थानच्या इतिहासाची माहिती मिळूं लागून इतिहासाचें कथासुत्र पुन्हां चालू करतां येतें. कुशान घराण्याच्या अंतापासून गुप्त घराण्याच्या उदयापर्यंत सुसंगत इतिहास लिहिण्यास माहिती न मिळण्याचें कारण हिंदुस्थानात हा काळ फार धामधुमीचा होता हें होय. या काळाच्या अखेरीस बुद्धाच्या वेळीं प्रसिद्ध असलेल्या लिच्छवी जातीचें नांव पुन्हां प्रामुख्यानें पुढें येतें. कुशान राजे वायव्येकडे पेशावर येथें राज्य करीत असतां या लोकांनीं पूर्वेस पाटलिपुत्र हस्तगत करून आसमंतांतील भागांत आपली सत्ता पसरविण्याचा उपक्रम केला होता. गुप्त घराण्याच्या उदयापूर्वीं पूर्वेस लिच्छवी घराणें बरेंच प्रसिद्धीस आलें होतें, हें गुप्त घराण्याचा, संस्थापक चंद्रगुप्त यानें जीं नाणीं पाडलीं होतीं त्यांत लिच्छवी लोकांच्या घराण्यांतील आपल्या बायकोस प्रमुख स्थान दिलें होतें यावरून दिसून येतें.