प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
उत्तर हिंदुस्थानांतील प्रमुख राज्यें.- हर्षानंतर सर्व हिंदुस्थानावर साम्राज्य करणारा कोणी निघाला नाहीं. तथापि प्रांतानिहाय अनेक लहान लहान राज्यें सुव्यवस्थित रीतीनें नांदत होतीं. त्यांपैकीं प्रथम उत्तर हिंदुस्थानांतील प्रमुख राज्यांची माहिती थोडक्यात येथें देतों.
का श्मी र.- कल्हण पंडिताचा राजतरंगिणी ग्रंथ, ह्युएनत्संगाचे लेख वगैरे आधारांवरून काश्मीरचा इतिहास समजतो. काश्मिरावर अशोकाचें व नंतर कुशान घराण्यांतील कनिष्क व हुविष्क यांचें साम्राज्य होतें. पुढें इ. स. ६०२ मध्यें पूर्वींच्या गोनर्दीय वंशातील बालदित्य नांवाचा निपुत्रिक राजा मरण पावला; तेव्हा त्याचा दुर्लभवर्धन नांवाचा अधिकारी व जामात राज्यावर आला. ह्या राजवंशाला कर्कोटक वंश असें नांव आहे. या वंशांत एकंदर १७ राजे झाले व त्यांनीं इ .स. ६०२ पासून ८५६ पर्यंत काश्मिरांत राज्य केलें. यांतील प्रमुख राजांची सनावली येणें प्रमाणें.- १ दुर्लभवर्धन (इ. स. ६०२-६३७), २ दुर्लभक उर्फ प्रतापादित्य (६३७-६८७), ३ चंद्रापीड (६८७-६९५), ४ तारापीड (६९५-६९९), ५ मुक्तापीड उर्फ ललितादित्य (६९९-७३५), ६ कुवलयापीड [७३६], ७ वज्रापीड [७३६-७४३], ८ संग्रामपीड [७४३-७५०], ९ जयापीड (७५०-७८२).
पहिला राजा दुर्लभवर्धन राज्य करीत असतां ह्युएनत्संग काश्मिरांत आला. त्या वेळीं बौद्धसंप्रदायाला उतरती कळा लागलेली त्याच्या दृष्टीस पडली. दुसरा राजा प्रतापादित्य याच्या न्यायप्रियतेच्या व प्रजाहिततत्परतेच्या पुष्कळ गोष्टी कल्हणानें सांगितल्या आहेत. ललितादित्य हा या घराण्यांतील सर्वांत पराक्रमी राजा होय. त्याच्या दिग्विजयाचें वर्णन राजतरंगिणींत सविस्तर केलें आहे. त्यानें मोठमोठी देवालयें व विहार बांधले पैकीं मार्तंडाचें (सूर्याचें) मंदिर अद्याप प्रसिद्ध आहे.
जयापीड हा या घराण्यांतील आणखी एक प्रसिद्ध राजा होय. यानेंहि दिग्विजयास निघून कनोज, बंगाल वगैरे दोन चार प्रांतांतील राजांचा पराभव केला. विद्वानांचा आश्रयदाता म्हणून जयापीडाची प्रसिद्धि त्याचा आजा ललितादित्य याहूनहि अधिक आहे. जयापीडानंतर या घराण्यास उतरती कळा लागून शेवटचा राजा अनंगपीड याला इ. स. ८५५ मध्यें उत्पल घराण्यांतील अवन्तिवर्मा यानें पदच्युत करून स्वतःगादी बळकावली.
या पुढील काळांत काश्मिरांत उत्पल घराणें (८५५-९४०), (२) वीरदेवाचा वंश (९४०-९४९), (३) दिविर वंश (९५०-१००३), (४) लोहर वंश (१००३-११०१), (५) सातवाहन वगैरे घराणीं झालीं. पैकीं उत्पल घराण्याचा पहिला राजा अवन्तिवर्मा हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्यानें आपल्या सुय्य नांवाच्या मंत्र्याच्या साहाय्यानें अनेक नद्यांनां बंधारे घालून ठिकठिकाणीं कालव्याचीं कामें करून घेतलीं व हजारों एकर पडित जमीन लागवडीखाली आणली. उत्पल घराण्यांतील पुढील राजे जुलुमी किंवा दुर्बल निघाले. पार्थ नांवाच्या राजाच्या कारकीर्दींत इ. स. ९१७-१८ सालीं काश्मिरांत इतका भयंकर दुष्काळ पडला कीं 'वितस्ता (झेलम) नदी प्रेतांनीं भरून गेली व जमीन हाडांनीं आच्छादून गेल्यामुळें सर्वत्र श्मशानभूमीसारखा देखावा दिसूं लागला' असें एक ब्राह्मण बखरकार म्हणतो. पार्थ व त्याचा मुलगा उन्मत्तावंति यांनीं प्रजेचा भयंकर छळ केला.
यानंतर उत्पल घराणें नष्ट होऊन वीरदेवाचा वंश राज्य करूं लागला. त्यानंतरच्या दिविर घराण्याचा वेळीं दिद्दा नांवाच्या राणीनें सुमारें पन्नास लोकांस फार त्रास दिला. या घराण्यांतील संग्रामदेवाच्या कारकीर्दीत गझनीच्या महमदानें काश्मिरावर स्वारी केली. तथापि तो देश पर्वतांच्या ओळींनीं संरक्षित असल्यामुळें काश्मिरचें स्वातंत्र्य कायम राहिलें.
त्यानंतरच्या लोहर घराण्यांपैकीं कलश व हर्ष हे राजे फार जुलमी झाले. कल्हणानें राजतरंगिणीमध्यें इ. स. ११४८ पर्यंतचा इतिहास दिला आहे. त्या नंतरच्या दोन शतकांत काश्मिरांत अंतस्थ कलहांनीं फाटाफूट झालेल्या स्थितींत एक लहानसें स्वतंत्र राज्य होतें. शेवटी इ. स. १३३९ त काश्मिरच्या दक्षिणेकडून आलेल्या एका शहामीर नांवाच्या धाडशी मुसुलमानानें काश्मिरच्या शेवटच्या हिंदुराजाच्या कोटानामक राणीला पदच्युत करून तेथें आपलें मुसुलमानी घराणें चालू केलें. मुसुलमानी संप्रदायानें क्रमाक्रमानें आपलें पाऊल तेथें रोवण्यास सुरूवात केली. तथापि ब्राह्मणांनीं आपलें वर्चस्व धर्मत्याग न करतां कायम ठेविलें आणि विद्या व सरकारी महत्त्वाचीं कामें आपल्या हातून जाऊं दिलीं नाहींत.
काश्मीर देश पहिल्यापासून विद्येबद्दल प्रसिद्ध आहे. तेथील राजे पंडितांचे मोठे आश्रयदाते असत. काश्मिरी पंडितांची ख्याति सर्व हिंदुस्थानभर असे. त्यांच्या नांवांत एक विशेष आढळतो तो असा कीं, त्यांच्या शेवटीं ट किंवा ण हें अक्षर नेहमी येतें. उद्भट, मम्मट, लवट, कय्यट, तसेंच कल्हण, बिल्हण, सल्हण वगैरे नांवे प्रसिद्ध आहेत.
ने पा ळ.- हा हिमालयाच्या पायथ्याचा देश बहुतेक डोंगरांनीं व द-यांनीं आच्छादिलेला आहे. अद्यापहि तेथील सरकार यूरोपीय वगैरे सर्व परकीयानां स्वराज्यांत फिरकुं देत नसल्यामुळें या देशाची फारशी माहिती उपलब्ध नाहीं. काश्मिरातील वंशावळीप्रमाणें इ. स. १७६८ सालीं पृथिवीनारायणाच्या नेतृत्वाखालीं गुरखे लोक नेपाल जिंकीपर्यंतच्या राजांचा इतिहास बहुतेक दंतकथात्मक असून तो डॉ.राइटनें लिहिला आहे. अशोकाच्या व समुद्रगुप्ताच्या शिलालेखांवरून हा प्रांत त्या सम्राटांच्या राजकीय वर्चस्वाखालीं होता असें दिसते.