प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

इ .स. ६४७ ते १२०० पर्यंतची राजकीय परिस्थिती :- हूण लोकांच्या स्वा-यांमुळें त्रस्त झालेल्या प्रजेस हर्षाच्या कारकीर्दींत फारच सुख व शांतता लाभली. इ. स. ५२८ मध्यें मिहिरगुलाचाच पराभव झाला तेव्हां पासून ११ व्या शतकाच्या आरंभीं गझनीच्या महमदाच्या स्वा-यांस आरंभ होईपर्यंतचा सुमारें पांचशें वर्षांचा काळ परकीयांच्या स्वा-यांपासून मुक्त होता. या काळांत राजकीय दृष्ट्या स्वतःची हवी तशी सुधारणा करून घेण्यास हिंदुस्थान देश स्वतंत्र होता. पण हर्षाच्या कारकीर्दींत किंवा पुढील काळांत शासनसंस्थांत कोत्याहि प्रकारची विशेष सुधारणा हिंदुस्थांनांत झाल्याचें दिसत नाहीं. हर्षानें अशोकाप्रमाणें बहुतेक हिंदुस्थानावर स्वतःची साम्राज्यसत्ता स्थापली. चंद्रगुप्त मौर्य, अशोक किंवा हर्ष यांच्या सारख पराक्रमी सम्राट पुढील चार पांच शतकांत कोणी निपजला नाहीं.

हर्षानंतर कोणीहि पराक्रमी सम्राट हिंदुस्थानांत न झाल्यानें हिंदुस्थानभर सर्वत्र लहान लहान राज्यें उद्भवलीं. या कारणामुळें पुढील चारपाच शतकांच्या हिंदुस्थानच्या इतिहासांत एकसूत्रीपणा नसला तरी तेथें व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो त्याप्रमाणें केवळ या काळांत अराजकताच माजली असेल असें म्हणतां येत नाहीं. परस्परांशीं भांडणा-या लहान लहान स्वतंत्र संस्थानांचे अस्तित्व अराजकतेचें द्योतक असतेंच असें नाहीं, हें प्राचीन ग्रीक नगरराज्यांच्या इतिहासावरून कोणाच्याहि ध्यानांत येईल.