प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
तामिळ देशांतील मध्ययुगीन राज्यें.- दख्खन किंवा महाराष्ट्र यांची सरहद्द ज्या कृष्णा व तुंगभद्रा या नद्या, त्यांच्या दक्षिणेकडील प्रदेश पूर्वीं तमिलकं किंवा तामिळ देश म्हणून प्रसिद्ध होता. ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यानें या तमिलकम् देशाबद्दल माहिती दिली आहे. त्यावेळीं त्या देशांत तामीळ ही एकच भाषा प्रचलित होती. मध्यकालांत येथे पांड्य, चोल व चेर उर्फ केरल हीं तीन प्रसिद्ध राज्यें होतीं. त्याशिवाय चौथ्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत तेथें पल्लवांचेहि एक राज्य होतें.
पां ड्य.- पांड्यांचें राज्य मदूरा व तिनवेल्ली हे जिल्हे आणि त्रिचनापल्ली व त्रावणकोर यांपैकीं कांहीं भाग इतक्या प्रदेशावर होतें. या पांड्यांची प्रथम लहानलहान पांच राज्यें होतीं. इसवीसनाच्या पहिल्या शतकांत मदुरा अथवा कूडल ही त्यांची राजधानी होती पण त्यापूर्वीं कोरकै ही त्यांची राजधानी असावी. कात्यायन या ख्रि. पू. ४ थ्या शतकापूर्वींच्या संस्कृत व्याकरणकारानें पांड्यांचा उल्लेख केला आहे. प्राचीन पांड्य राज्यासंबंधानें एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदुरा येथें एक मोठें विद्यापीठ होतें ही होय.
इ. स. ६४० मध्यें ह्युएनत्संग दक्षिण हिंदुस्थानांत गेला. त्यावेळीं तो पल्लव राजांची राजधानी कांची येथें राहिला होता. तेथेंच त्यानें आपल्या बौद्ध मित्रांजवळून मिळालेली पांड्यांच्या राज्यासंबंधाची माहिती लिहून ठेविली. त्यावेळीं पांड्य राजा कांचीच्या पल्लव राजांचा मांडलिक असावा. एका शिलालेखांत ८ व्या शतकाच्या मध्यापासून १० व्या शतकाच्या आरंभापर्यंतच्या पांड्य राजांची यादी दिली आहे. १० व्या शतकापासून पांड्य राजे चोल राजांचे मांडलीक बनले.
पांड्य राजांची सिलोनच्या राजांबरोबर वरचेवर युद्धें होत असत. मलिक काफूर व इतर मुसलमान पुढा-यांनीं इ. स. १३१० त व नंतर या दक्षिणेकडील राज्यांवर हल्ले केले. परंतु हीं स्थानिक राज्यें त्यानीं नष्ट केलीं नाहींत.
चे र उ र्फ के र ळ.- अशोकाच्या शासनपत्रांत या राज्याचा केरलपुत्र या नांवानें उल्लेख आढळतो. ख्रिस्ती शकाच्या आरंभीच्या शतकांत अरबस्थान व या राज्यांतील बंदरें यामध्यें मिरी वगैरे जिनसांचा व्यापार चालत असे ग्रीक व रोमन ग्रंथकाराचे उल्लेख आहेत. तथापि याखेरीज या केरळ राज्याबद्दलची प्राचीन माहिती उपलब्ध नाहीं. पुढें १० व्या शतकांत चेर व चोल या राज्यामध्यें आपसांत लढाया सुरू झाल्या. तेव्हांपासूनची त्रोटक माहिती चोल शिलालेखांवरून मिळते. केरळ प्रांत मुसुलमानी अंमलाखालीं फारसा नसल्यामुळें त्या प्रांतांतच फक्त प्राचीन भारतीय लोक, त्यांचा धर्म, कायदे, रूढी व चालीरीती शुद्धस्वरूपांत पहावयास मिळतात असें पी. सुंदरम् पिल्ले यांचे म्हणणें आहे.
चो ल.- चोल किंवा चोळ व पाण्ड्य यांचा उल्लेख पाणिनि करीत नाहीं व कात्यायन करतो. अशोकानें हीं राज्यें स्वतंत्र असल्याचें मान्य केलें आहे. जुन्या कवींनीं उल्लेखिलेला पहिला चोल राजा करिकाल हा असून त्यानें सिलोनवर स्वारी केली व तेथून कावेरी नदीला धरण बांधण्याकरितां हजारो मजूर धरून आणले अशी माहिती मिळते. हा ख्रिस्तोतर पहिल्या किंवा दुस-या शतकांतला राजा असावा. परंतु यानंतर लवकरच चेर राजे प्रबल बनून चोळ राजे अनेक शतकें हतप्रभ होऊन पडले. इ. स. ६४० मध्यें पल्लव राज्याची राजधानी कांचीं येथें गेलेल्या ह्युएनत्सगानें चोळ राजांसंबंधीं उल्लेख केला आहे. ८ व्या शतकांत महाराष्ट्रांतील चालुक्य व कांचीचे पल्लव ह्यांच्यामध्यें मोठा सामना होऊन पल्लव राजे पराभूत झाले. या संधीचा फायदा घेऊन चोळ राजांनीं आपलीं सत्ता पुन्हा वाढविली. यानंतरच्या चोळ राजांबद्दलची माहिती शिलालेखांवरून बरीच मिळतें. या राजांचीं नांवें येणेप्रमाणे:-
१ विजयालय, २ आदित्य (८८०-९०७), ३ परांतक पहिला (९०७-९४९), ४ राजादित्य, ५ राजराजदेव (९८५-१०१८), ६ राजेंद्र चोलदेव पहिला (१०१८-१०३५), ७ राजाधिराज, ८ राजेंद्र परकेसरी वर्मा, ९ वीर राजेंद्र, १० अधिराजेंद्र. अधिराजेंद्राला औरस संतति नव्हती म्हणून राजेंद्र नांवाच्या त्याच्या नातलगाला त्याची गादी मिळाली. या राजेंद्राचा चालुक्य घराण्याशीं संबंध होता म्हणून पुढें चालुक्यचोल असें मिश्र घराणें बनले. राजेंद्र हा पहिला कुलोत्तुंग चोल या नांवानें प्रसिद्ध आहे. हें चोल घराणें १३१० मध्यें मलिक काफूरनें नष्ट केलें. पुढें लवकरच विजयानगरचें हिंदुराज्य उदयास येऊन बहुतेक तामिळ देश त्या राज्यांत समाविष्ट झाला.
प ल्ल व- पल्लव म्हणजे पुराणांत आलेले पल्हव किंवा पारसी ग्रंथांतील पल्हव असे बहुतेकांचे तर्क होते. परंतु या तर्कांला ऐतिहासिक पुरावा नाहीं. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो पल्लव ही एक हिंदुस्थानांतील मूळच्या लोकांचींच जात असावी. चिं. वि. वैद्य म्हणतात, महाराष्ट्रांत वसाहत करणा-या आर्यांपैकीच पल्लव हे होते. पल्लव लोक शेंकडों वर्षांपासून महाराष्ट्री प्राकृत बोलत आले असल्यामुळें कांचीस वसति केल्यावरहि त्यांनीं आपली मूळभाषा सोडून द्रविडीचा स्वीकार केला नाहीं. पल्लव याचें थोडें प्राकृत रुपांतर होऊन बनलेलें पालवे हें आडनांव मराठ्यांच्या आडनांवांपैकीं एक आहे. ह्युएनत्संगानेंहि कांचीचा राजा नरसिंबर्मा यांस क्षत्रिय म्हटलें आहे.
उत्तर हिंदुस्थानांतील किंवा महाराष्ट्रांतील पल्लव आडनांवाचा वीरकूर्च म्हणून कोणी आर्य सरदार दक्षिणेंत आला व त्यानें इ. स. १७८ च्या सुमारास मर्दुमकी गाजवून तेथील नागवंशी राजकन्येशीं विवाह केला. वीरकूर्चाचा नातु कुमारविष्णु इ. स. २०० च्या सुमारास कांची (कांजीवरम) शहर हस्तगत करून तेथें स्वतंत्र राजा बनला. हें राज्य पुढें इ. स. ३३८ त पाटलिपुत्राच्या समुद्रगुप्तानें जिंकलें त्यामुळें कांहीं काळपर्यंत पल्लवांनां नम्र व्हावें लागलें, पण पुन्हा इ. स. ५७५ च्या सुमारास सिंहविष्णु यानें डोकें वर काढून वैभव संपादिलें व त्याच्यापासून उत्तर पल्लवांची राजमालिका सुरू झाली. हे पल्लव राजे हिंदुधर्माभिमानी व शैवमतानुयायी होते. या उत्तरपल्लव राजांची नांवे येणें प्रमाणे:-
१ सिंहवर्मा (मृत्यु स. ५८२) ५ महेंद्रवर्मा, २ रा ६६०
२ सिंहविष्णु (मृत्यु स. २९०) ६ परमेश्वरवर्मा १ ला सन ६७४
३ महेंद्रवर्मा १ ला (मृत्यु स. ६१८) ७ नरसिंहवर्मा २ रा सन ७००
४ नरसिंहवर्मा १ ला (६४६) ८ परमेश्वरवर्मा २ रा सन ७१५
९ दंतिपोतवर्मा स. ७४२
उत्तर पल्लवांतील पहिला मोठा राजा सिंहविष्णु होय. यानें पांड्य, चोळ इत्यादि जवळच्या देशांखेरीज आणखी सिंव्हलद्वीपहि जिंकलें होतें. त्याचा पुत्र पहिला महेंद्रवर्मा याचा हर्षाचा प्रतिस्पर्धी जो द्वितीय पुलकेशी चालुक्य त्यानें युद्धांत पाडाव केला. ह्युएनत्संग कांचीस गेला तेव्हां तेथें महेंद्राचा पुत्र नरसिंहवर्मा राज्य करीत होता. तो जरी नांवानें पुलकेशीचा मांडलिक होता तरी पुढें इ. स. ६४२ त त्यांचें युद्ध होऊन त्यांत पुलकेशीचा त्यानें पराभव केला, व त्यांची राजधानी वातापी नगरी हस्तगत करून ती लुटून टाकिली, पण या गोष्टीचा सूड पुलकेशीचा पुत्र पहिला विक्रमादित्य यानें घेतला. त्यानें कांचीवर स्वारी करून ती नगरी घेतली व चालुक्यांचा दरारा पुनःबसविला. याप्रमाणें सन ५५० पासून ७५० पर्यंत पल्लव व चालुक्य या दोन राजघराण्यांत पुष्कळ झगडे झाले. तथापि पल्लवांनीं आपलें राज्य कायम राखून बलाढ्यहि केलें. शेवटीं इ. स. ७४० मध्यें दुसरा विक्रमादित्य चालुक्य यानें पल्लवांचा मोठा पराभव केला, व तेव्हांपासून पल्लवांच्या राज्यास उतरती कळा लागून सन ९०० च्या सुमारास चोळांच्या आदित्य राजांनीं पल्लव कुलाचा उच्छेद केला. या वेळेपासून पल्लवांचें नांव इतिहासांत ऐकुं येईनासें झालें.
मराठ्यांप्रमाणें पल्लव हेहि मोठे शिवोपासक होते. त्यांनीं कांचीस मोठमोठीं शिवमंदिरें बांधलीं. शैवमताचें दक्षिणेंतील मुख्य पीठ कांची येथेंच असून तेथें अनेक शैव कवी व साधू होऊन गेले. याच कारणास्तव हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध सप्तपुरींत कांचीची गणना होऊं लागली असें वाटतें.
या तीनचार मुख्य राज्यांशिवाय सुमारें एकशेवीस लहान लहान पण बहुतांशीं स्वतंत्र अशीं राज्यें दक्षिणेत होतीं. त्यांची आपापसांत नेहमींच युद्धें चालू असत, असें हल्लीं या प्रांतांत जीं अनेक तटबंदी असलेलीं पण सांप्रत ओस पडलेलीं गांवठणें आढळतात त्यांवरून दिसतें.