प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण २ रें.
वेदप्रवेश– ऋग्वेद.

अग्निसूक्तें.– अग्नि हा मनुष्यांचा परममित्र होय. मनुष्यें व देव यांचा अग्नि हा मध्यस्थ होय. याच्या संबंधानें बोलतांना परममित्राशीं बोलण्यची भाषा वापरली आहे. वैदिक ऋषीनीं याची स्तुति करून बाप मुलाला आशीर्वाद देतो त्याप्रमाणें तूं आम्हांला आशीर्वाद दे अशी प्रार्थना केली आहे. या स्तोत्रानें अग्नि संतुष्ट झाला आहे व तो आपली इच्छ पूर्ण करणारच अशा प्रकारची त्यांची भावना या सूक्तांत दृष्टीस पडते.

इन्द्र ही जशी रणगाजींची रणदेवता आहे तशी अग्नि ही गृहस्थांची गृह-देवता आहे. गृहांतील बायकांपोरांचें तो रक्षण करितो; व तेथील ऐतिक संपत्ति वाढवितो. त्याला ‘गृहपति’ असें वारंवार म्हटलें आहे. तो प्रत्येक घरांत अतिथि मानला जातो व त्याला अतिथिश्रेष्ठ समजतात. तो स्वतःअमर असून मुर्त्य लोकांत राहतो, व घरांतील धनधान्यसमृद्धि वगैरे त्याच्यावर अवलंबून असते.

फार पुरातन काळापासून ‘नवरी’ लग्न होऊन स्वतःचे घरीं गेली म्हणजे तिला अग्नीला प्रदक्षिणा घालण्यास सांगण्याची चाल आहे. यावरून अग्नीला ‘कुमारींचा प्रियकर’ ‘स्त्रियांचा पति’ अशीं नांवें देण्यांत येतात. एका विवाहप्रसंगीं म्हणावयाच्या मंत्रांत अग्नि हा सर्व कुमारिकांचा पति असून त्याच्याचपासून वराला वधूची प्राप्ति होते असें वर्णन आहे. विवाह, जातकर्म वगैरे अनेक गृह्यसंस्कारांच्या प्रंसगीं अग्नीची प्रार्थना करण्यांत येते. विवाहहोमाच्या वेळीं मुलीच्या वतीनें म्हणून अग्नीची प्रार्थना येणेंप्रमाणें केली जातेः “गृहपति अग्नि या मुलीचें रक्षण करो; या मुलीचे वंशज दीर्घायुष्य पावोत; हिच्या गर्भस्थानावर अग्नीची कृपादृष्टि असो; हिचीं अपत्यें जगोत व हिला संततिसुख प्राप्त होवो.”

यज्ञिय अग्नि हा देव व मनुष्यें यांचा मध्यस्थ आहे. तो देवांच्याकडे हविर्भाग लवकर नेऊन पोंचवितो, तो देवांना यज्ञस्थलीं त्वरित घेऊन येतो, म्हणून याला ऋत्विज् म्हणतात, कवि म्हणतात, ब्रह्मा म्हणतात, पुरोहित म्हणतात, होता, ‘सर्व ऋत्विजांत श्रेष्ठ’, असेंहि म्हणातात.

अग्निसूक्तांमध्यें कविकल्पना कोणत्या व परंपरागत लौकिककथा कोणत्या याची निवड करतां येणें कठिण आहे. पुष्कळसें तूप घालून यज्ञिय अग्नि नेहमीं प्रज्वलित ठेविला जात असें. असल्या प्रज्वलित अग्रीचें वर्णन एक कवि असें करितो, “अग्नीचा चेहरा प्रफुल्लित दिसतो आहे, त्याचा पृष्ठभागहि तसाच तेजस्वी दिसत आहे; त्याच्या केंसांतून तूप गळत आहे.” अग्रीचें वर्णन कोठें ज्वालाशिख किंवा रक्तशिख आणि रक्तकूर्च असें केलें आहे, त्याच्या जबड्याचीं हाडें मोठीं बळकट व तीक्ष्ण असून त्याचे दांत सोन्यासारखे झळकणारे आहेत, असें म्हटलें आहे. कोठें अग्नीच्या ज्वालांनां त्याच्या जिह्वा असें म्हटलें आहे; तर कोठें त्यच्या चोहोंकडे पसरणार्‍या ज्वालांनां उद्देशून त्याला चतुर्नेत्र किंवा सहस्त्रनेत्र म्हटलें आहे. या सर्व प्रकारच्या कल्पना परंपरागत लोककथांतील अथवा कवीच्या वैयक्तिक मनःसृष्टींतील असणें सारखेंच संभवनीय आहे. तसेंच, अग्नीचा तडतड असा होणारा आवाज व बैलाचें डुरकणें यांची तुलना करून त्यावरून अग्नीला वृषभ म्हटलें आहे. अग्नीच्या उंच वाढणार्‍या ज्वालांनां शिंगांसारखीं टोंकें असतात म्हणून ज्वाला हीं अग्नीचीं शिंगें होत, असें एकजण म्हणतो. दुसरा एक ऋषि अग्नीला हजार शिंगे होतीं, असें म्हणतो. तिसरा म्हणतो कीं, तो आपलीं शींगें पाजवून रागानें इकडें तिकडे हालवितो. तसेंच अग्नीला अतिशय वेगवान् दूत, मौजेनें खिंकाळणारा घोडा, असेंहि म्हटलें आहे. पुराणकथा आणि धार्मिक विधी या दोहोंतहि अग्नीचा व घोड्याचा बराच निकट संबंध आढळतो.

पण अग्नीला ज्या वेळीं पृथ्वी व आकाश यांमध्यें चपलतेनें तळपणारा स्वर्गीय गरूड असें म्हणण्यांत येतें त्या वेळीं मात्र अग्नि या शब्दानें आकाशांतून खालीं येणारा विजेचा झोतच उद्दिष्ट असला पाहिजे. पुन्हां खालील ऋचेंत जें वर्णन दिले आहे त्यावरून तेथें कवीच्या मनासमोर यापेक्षांहि निराळें अग्निस्वरूप आहेसें वाटतें.

अग्निर्जम्भौस्तिगितैरत्ति भवेति योधो न शत्रून्त्स बनाम्यृञ्जते।  क्र. १.१४३,५.

अग्नि तीक्ष्ण दाढांनीं (वृक्षादिकांस) भक्षितो व चाऊन टाकतो. योद्धा जसा शत्रूंनां जेर करतो तसा हा वृक्षांनां जेर करतो. अशाच प्रकारचें वर्णन पुढील ऋचेंत आहेः-

यद्वातजूतो बना व्यस्थादग्रिर्ह दाति रोमा पृथिव्याः। क्र. १.६५,४.

वातप्रेरित अग्नि जेव्हां अरण्यांत शिरतो, (तेव्हां) तो पृथ्वीचे केंसच जणूं कापतो.

अग्रीसंबंधाच्या म्हणून ज्या कथा आहेत त्या सुद्धां काव्यमय, गूढ व अलंकारीक भाषेंतून निघाल्या असाव्या. अग्रीचे जन्म अथवा जन्मस्थानें तीन आहेत असेंहि एके ठिकाणीं वर्णन आहे. आकाशांत तो सूर्यतेजाच्या रूपानें तळपतो; मर्त्यलोकांत माणसें त्याला काष्ठावर काष्ठ घांसून प्रकट करितात;  व पाण्यांत त्याचें जन्म विद्युद्रूपानें होतें. ज्या दोन अरणींच्या साहाय्यानें अग्नि सिद्ध करतात त्या अरणी म्हणजे अग्नीच्या माता असें समजतात, व हें बाळ जन्मास येतांच आपल्या मातांनां खाऊन टाकतें असें वर्णन {kosh ऋ. १०. ७९, ४}*{/kosh} आहे. दुसर्‍या एका ठिकाणीं दहा कुमारींनीं या त्वष्ट्याचे पुत्राला जन्म दिला असें वर्णन {kosh क्र. १.९५,२.}*{/kosh}  आहे. या ठिकाणीं अग्निमंथन करण्यांत उपयोगांत आणावीं लागणारीं दहा बोटें उद्दिष्ट आहेत. अग्निमंथन करण्याचें काम अत्यंत मेहनतीचें असल्यानें सर्व संहितेंत अग्नीला ‘बळाचा पुत्र’ सहस:-सूनु:’ अशी संज्ञा आहे.

प्राचीन हिंदुलोकांत वाढलेलें अग्निहोत्राचें स्तोम लक्षांत घेतां ऋग्वेदांतील अग्निसूक्तांपैकीं बरींचशीं सूक्तें यज्ञासंबंधाचीं असावी याचें कांहीं आश्चर्य वाटणार नाहीं. ही सुक्तें सुमारें २०० आहेत. यांपैकीं कित्येक केवळ यज्ञासाठीं म्हणूनच रचिलेलीं आहेत. तरी पण यांतील कांहीं सूक्तें, तीं जरी प्रार्थनापर व ऋत्विजांनीं केलेलीं असेलीं तरी, कवींच्या अंतःकरणांतून निघालेलीं काव्यें आहेत यांत शंका नाहीं. ऋग्वेदसंहितेचें पहिलेंच सूक्त खालीं देतों. त्यावरून मूळ सूक्तांची यथार्थ कल्पना होणारी आहे.

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजन्। होतारं रत्‍नधातमम्।।१।।
अग्रिः पूर्वेभिर्ऋषिभिरीड्यो नूतनैरूत । स देवाँ एहवक्षति।।२।।
अग्निना रयिमश्नवत्पोषमेव दिवेदिवे। यशस वीरवत्तमम्।।३।।
अग्रे यं यज्ञमध्वरं विश्वतः परिभूर्सि। स इद्देवेषु गच्छति।।४।।
अग्निर्होता कविक्रतुः सत्यश्चित्रश्रवस्तमः।देवो देवेभिरागमत्।।५।।
यदङ्ग दाशुषे त्वमग्रे भद्रं करिण्यर्सि। तवेत्तत्सत्यमङ्गिरः।।६।।
उप त्वाग्रे दिवेदिवे दोषावस्तर्धिया वयम्। नमो भरन्त एमसि।।७।।
राजन्तमध्वराणां गोपामृतस्य दीर्दिविम्। वर्धमानं स्वे दमे।।८।।
सनः पितेव सूनवेग्ने सूपायनो भव। सचस्वा नःस्वस्तये।।९।। क्र.१.१


पुरोहित, यज्ञाचा दैदीप्यमान ऋत्विज् होता (व) अतिशय संपत्ति देणारा अशा अग्नीस मी स्तवितों.१.

अग्नि पूर्वींच्या ऋषींनीं तसाच नव्या ऋषींनीं स्तुति करावी असा आहें. तो देवांनां येथें घेऊन येवो.२.

अग्नीच्या द्वारें (यजमानास) यशोयुक्त, वीर (पुत्रभृत्य) युक्त व दिवसेंदिवस पुष्ट होणारें धन प्राप्त होतें.३.

हे अग्रे, ज्या यज्ञाभोंवतीं तूं परिवेष्टन करून असतोय व जो विघ्नरहित असतो तोच देवांप्रत पोंचतो. ४.

दिव्यकर्मा, अनृतरहित, अतिशय विविध कीर्तींचा, होम संपादक असा  अग्नि देव देवांसह येवो.५.

बा अग्रे, तूं हविर्दान करणाराचें चें कल्याण करशील तें हे अंगिरा, तुझेंच कल्याण (आहे).६.

हे अग्रे, रोज रात्रीं व दिवसां आम्ही तुला ध्यानपूर्वक नमस्कार करीत तुजसमीप येतों.७

अध्वरांचा रक्षिता, सत्या (कर्मफला) चा प्राकाशक, स्वगृहीं (यज्ञशालेंत) वृद्धि पावणारा असा जो तूं दैदीप्यमान अग्नि (त्या तुला नमस्कार करीत.)८

जसा पिता पुत्राला तसा तूं आम्हांला शोभन उपायन {kosh उपायन, - सूपायन याचा अर्थ सुगम केला आहे (सायण.}*{/kosh} देणारा (चांगली देणगी देणारा) हो व आमच्या कल्याणासाठीं जवळ रहा.९.