प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

३००० सत्याग्रही - न्यू कॅसल हें संपवाले एकत्र मिळण्याचें ठिकाण झालें. चोहोंकडील संपवाले स्त्रिया व पुरुष डंडीहून न्यू कॅसलकडे चालले. पुष्कळांनीं आपलीं कोंबडी, बकरीं व घरसामान येईल त्या किंमतीला फुंकून टाकून आपला बोजा आटोपशीर केला व हा बोजा घेऊन ते न्यू कॅसलकडे निघाले. पावसाळ्याचे दिवस. मुसळधार पावसांत बराच वेळ त्यांनां मार्गक्रमण करावें लागलें. गांधी या संपवाल्यांबरोबर होते. बायकामुलांनां आगगाड्यांनीं रवाना करण्याची शक्य तेवढी व्यवस्था करण्यांत येत होती परंतु पुष्कळ बायकांनीं या व्यवस्थेचा फायदा घेण्याचें नाकारलें व पुरुषांबरोबर सर्व आपत्ति त्यांनीं आनंदानें भोगल्या. न्यू कॅसल येथें संपवाल्यांनां सर्व प्रकारची मदत मिळाली. तेथील हिंदी लोकांनीं आपली दुकानें व मालसांठ्याच्या जागा मोकळ्या करून संपवाल्यांच्या राहण्याची सोय केली व त्यांच्या जेवणखाणाची व्यवस्था करून त्यांची इतर सर्व प्रकारची चाकरी केली. पुष्कळ श्रीमंत तरुण याप्रकारें संपवाल्यांची सेवा करीत होते. या सत्कृत्याबद्दल न्यू कॅसलमधील पुष्कळशा हिंदी सज्जनांवर पुढें करारबंदीच्या मजुरांनां गैरकायदा आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यांत आला. न्यू कॅसलहून संपवाले चार्लसटाऊन येथें गेले. या ठिकाणीं कालेनबॅक् (युरोपीय सत्याग्रही) व थुंबी नायडू यांनीं संपवाल्यांची व्यवस्था ठेवली. न्यू कॅसल व चार्लसटाऊन या ठिकाणीं स्त्रिया व मुलें यांची व्यवस्था मिस् श्लेसीन या यूरोपीय स्त्रीनें आपल्या अंगावर घेतली होती. नोव्हेंबर ६ रोजीं गांधीं ३००० हिंदी लोकांसह नेटलची सरहद्द ओलांडून ट्रान्सवालांत शिरलें. ग्रेलिंगस्टाड येथें या सर्वजणांनां पकडलें. सत्याग्रही संपवाल्यांनां ज्यांच्या खाणींवर पोंचविण्यांत आलें. (गांधी पोलक व कालेनबॅक यांनां संपवाल्यांचें अग्रेसरत्व पत्करल्याबद्दल पुढें तीन तीन महिने कैद मिळालीं.) संपवाले खाणींवर पोंचते केले गेले परंतु तेथें त्यांनीं काम करण्याचें नाकारलें.