प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

सल्लागारकचेरी. - कांहीं वर्षांपूर्वींपर्यंत हिंदी विद्यार्थ्यांनां, स्वतःच्या ओळखीच्या इंग्रज मित्रांच्या द्वारा येणारे व बिनसरकारी लोकांच्या अपुर्‍या साहाय्यानें इंग्लंडांत येणारे कांहीं अपवादभूत विद्यार्थी वगळले तर, बहुतेक स्वतःच्या प्रयत्‍नांवरच अवलंबून रहावें लागत असे. परंतु सन १९०९ च्या एप्रिल महिन्यांत लॉर्ड मोर्ले यांनीं इंडिया ऑफिसच्या एका कमिटीच्या शिफारशीवरून या लोकांच्या साहाय्यार्थ एक इन्फर्मेशन ब्यूरो (माहिती पुरविणारी कचेरी) नांवाची संस्था काढिली व डॉ. टी. डब्ल्यू. अर्नोल्ड या गृहस्थांनां एज्युकेशनल अ‍ॅडव्हायसर या नांवाखालीं तिचे अध्यक्ष नेमिलें. ही ब्यूरो लवकरच २१ क्रॉमवेलरोड या ठिकाणीं स्थापण्यांत आली. याच्याबरोबर नॅशनल इंडिअन असोसिएशन व नॉर्थब्रुक सोसायटी या संस्था या जागेंत आल्या. जबर भाड्याचा प्रश्न अशा तर्‍हेनें आपोआप सुटून या संस्थांनां ऐसपैस जागा मिळाल्यामुळें तरुण हिंदी विद्यार्थ्यांच्या संबंधानें जें सामाजिक कार्य त्यांनीं अंगीकारलें होतें तें त्यांस सुकर झालें. ब्रह्मदेशांतील विद्यार्थ्यांकरितां आल्बिअन हाऊस नांवाच्या प्रशस्त जागेंत (सेंट पीटर्स स्क्वेअर हॅमरस्मिथ. डब्ल्यू. सी.) पृथक् क्लबाची व्यवस्था करण्यांत आली आहे. लॉर्ड मोर्ले यांनीं सदरील कचेरीखेरीज एक सल्लागार मंडळहि नेमिलें होतें. या मंडळावर बहुतेक हिंदी रहिवाशीच सभासद असत. परंतु हें मंडळ आतां नामशेष झालें असून त्याच्याऐवजीं हिंदुस्थानांत परदेशीं जाणार्‍या विद्यार्थ्यांनां सल्ला देण्यासाठीं म्हणून प्रांतिक कमिट्या नेमण्यांत आल्या आहेत. इन्फर्मेशन ब्यूरोचें काम झपाट्यानें वाढत चाललें. त्यामुळें सन १९१२ सालीं लॉर्ड क्र्यू यांनीं ‘सेक्रेटरी फॉर इंडिअन स्टूडंट्स’ या नांवाखालीं एक अधिकारी नेमून त्याच्या हातांत हें ऑफिस दिलें व त्याची पुनर्घटना केली. ह्या सेक्रेटरीच्या जागीं तेव्हांचे मि. आणि आतांचे सर सी. ई. मॅलेट यांची योजना करण्यांत आली. परंतु १९१६ सालच्या अखेरीस त्यांनीं राजीनामा दिला. यांच्या मागून ‘हिंदी विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल अडव्हायसर’ म्हणून डॉ. अर्नोल्ड हे तेथें आले. ‘लंडनमधील स्थानिक सल्लागार’ म्हणून मि. एन्. सी. सेन हे डॉ अर्नोल्डच्या मागें तेथें गेले आहेत, व सध्यांच्या प्रांतिक युनिव्हर्सिट्यांतून असलेच अधिकारी नेमिलेले आहेत.

या बाबतींत दोन चुकीच्या समजुती झालेल्या आहेत; किंवा यांनां मुद्दाम पसरलेले गैरसमज म्हटलें असतांहि हरकत नाहीं. [इअसबुककरांचें हें म्हणणें वस्तुस्थितीस सोडून आहे.] एक समजूत   अशी कीं, इंग्लंडांत जे एक प्रकारचें राजद्रोहाचें वारें पसरलें होतें व ज्याचें पर्यवसान सर कर्झन वायली यांच्या खुनांत झालें तें वारें नाहींसें करण्यासाठीं इंडीया ऑफिसनें हा ब्यूरो निर्माण केला. वास्तविक, हा खून होण्यापूर्वींच ३ महिने हा ब्यूरो अस्तित्वांत होता, व ह्याच्या स्थापनेबद्दलचा विचार एक वर्ष अगोदरपासून चाललेला होता. टाइम्सनें १९०८ च्या सपटेंबरांत म्हटल्याप्रमाणें “या ब्यूरोचा उद्देश हिंदी तरुण लोकांनां राजकीय चळवळीच्या आखाड्यांत नेऊन सोडण्याचा नव्हता; किंवा अधिकाराच्या जोरावर त्यांचें स्वातंत्र्य हरण करण्याचाहि नव्हता. त्याचें सामान्यतः हित व्हावें व त्यांची शिक्षणविषयक प्रगति जास्त झपाट्यानें व्हावी, व त्यांच्यावर एकंदरींत हितकर असा  दाब राहावा” एवढ्याच हेतूनें हा ब्युरो अस्तित्वांत आला. यामध्यें हेराचें काम बिलकूल करावें लागणार नाहीं अशा समजुतीवरच डॉ. अर्नोल्ड यांनीं ही जागा पतकरिली होती.