प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

सन १९१४  चा इंडिअन रिलीफ अ‍ॅक्ट.- या अ‍ॅक्टनें कमिशननें केलेल्या चौदा शिफारशींपैकीं पहिल्या पांचांस अवश्य तें कायदेशीर स्वरूप दिलें. सन १९१३ सालच्या कायद्याच्या कलमांतून कांहीं शब्द गाळून, पहिल्या कलमानें ज्या हिंदी गृहस्थाचें लग्न एकाच वेळीं अनेक बायका करण्यास परवानगी देणार्‍या धर्माच्या विधींप्रमाणें झालेलें असेल त्यास त्याची बायको व तिचीं याच्यापासून झालेलीं अज्ञान मुलें आणण्याची परवानगी दिली. या कायद्यानें कमिशनची दुसरी एक शिफारस अमलांत आणली ती अशीः- एखाद्या हिंदी पुरुषानें व स्त्रीनें दोघांनीं मिळून एखाद्या मॅजिस्ट्रेटसमोर अगर लग्नें नोंदविणार्‍या समोर जर असा अर्ज केला कीं ‘आम्हीं नवरा बायको आहोंत’ व जर कांहीं विधि पाळून त्यांनीं आपलें लग्न एकपत्‍नीव्रताच्या अटीवर नोंदून घेतलें, तर हें लग्न आफ्रिकेमध्यें कायदेशीर मानलें जाईल, व या विवाहामुळें उत्पन्न होणारे निरनिराळे प्रश्न हा विवाह कायदेशीर समजूनच सोडविले जातील. अशा विवाहांत या पतिपत्नींच्या धर्मानें जरी एकाच वेळीं अनेक बायका करण्यास मोकळीक दिली असली तरी तेवढ्यानें कांही बाध येत नाहीं. कमिशनच्या सूचनांपैकीं तिसरी सूचना जी अमलांत आणली गेली ती अशीः- संयुक्त आफ्रिकेच्या निरनिराळ्या संस्थानांमध्यें विवाहविधींबद्दल जे कायदे प्रचलित आहेत त्यांअन्वयें उपाध्याय म्हणून हिंदी भिक्षुकांची योजना करण्यास हरकत नसावी. केपकालनीपुरती १८६० सालच्या पहिल्या कायद्यानें ही गोष्ट मुसलमानी संप्रदायापुरती शक्य झाली होती. १८९१ सालच्या १९ व्या कायद्याप्रमाणें नाताळ मध्येंहि अशाच प्रकारची व्यवस्था करण्यांत आली. नवीन कायद्यानें संयुक्त आफ्रिकेंतील लग्नविधींच्या कायद्याप्रमाणें कोणाहि हिंदी भिक्षुकास लग्नाचा उपाध्याय नेमण्याची मोकळीक मिळाली; व अशा उपाध्यायाच्या साक्षीनें लागलेलें लग्न हें कायदेशीर समजलें जावें अशी व्यवस्था करण्यांत आली कमिशनच्या आणखी एका सूचनेप्रमाणें, नाताळांत मुदतबंदीच्या मजुरांनीं करार मोडल्यास त्यांजवर ३ पौंडांची वार्षिक डोईपट्टी जी बसविली जात होती ती उठविण्यांत आली.