प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.
प्रकरण १३ वें.
वेदकालीन इतिहास-यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास
अध्वर्यु.- आतां आपण यज्ञामध्यें विशेष प्रमुख व मुख्य कार्यकर्ता असा जो अध्वर्यु त्या अध्वर्यूच्या क्रियांकडे वळूं. त्याचें ऋक्संहितेंत आढळणारें स्वरूप पुढील उल्लेखांवरून स्पष्ट होईल.
अध्वर्यवो भरतेंद्राय सोममामत्रेभि: सिंचता मद्यमन्ध: कामी हि वीर: सदमस्य पीतिं जुहोत वृष्णे तदिदेष वष्टि ॥ २.१४,१.
हे अध्वर्यू हो, इन्द्राकरितां सोमरस भरून न्या. मदकर असा सोमरस चमसपात्रांनीं (अग्नीमध्यें) सिंचन करा. तो वीर इन्द्र या सोमपानाची सदैव इच्छा करणारा असल्यामुळें त्या वृष्टिकर्त्या इन्द्रासाठीं सोमरसाचें हवन करा.
अध्वर्यवो यो अपो वव्रिवांसं वृत्रं जघानाशन्येव वृक्षम् । तस्मा एतं भरत तद्वशायँ एप इन्द्रो अर्हति पीतिमस्य ॥ २.१४,२.
हे अध्वर्यू हो, जो इन्द्र उदकांनां आवरून धरणाऱ्या वृत्राला, वीज वृक्षाला मारते त्याप्रमाणें मारता झाला त्या सोमपानेच्छु इन्द्राकरितां हा सोम भरून घ्या व (उत्तरवेदीकडे) घेऊन जा. हा इन्द्र या सोमपानाला योग्य आहे.
अध्वर्यवो यो दृभीकं जघान यो गा उदाजदप हि वलं व:। तस्मा एतमंतरिक्षे न वातमिन्द्रं सोमैरोर्णुत जूर्न वस्त्रै:॥ २.१४,३.
हे अध्वर्यू हो, ज्या इन्द्रानें दृभीक नामक असुराला मारिलें व ज्यानें बलासुरानें आडवून ठेवलेल्या गाई खुल्या केल्या व वलाला मारिलें त्या इन्द्राला आकाशांत वारा व्यापून राहतो त्याप्रमाणें सोमधारांनीं व्याप्त करा. वस्त्रांनीं जसें अंग झांकून टाकतात त्याप्रमानें सोमरसानें इन्द्राला आच्छादित करून टाका.
अध्वर्यवो य उरणं जघाम नव चरब्वांसं नवतिं च वाहून् । यो अर्बुदमव नीचा बबाधे तमिन्द्रं सोमस्य भृथे हिनोत ॥ २.१४,४.
हे अध्वर्यू हो, जो इन्द्र नव्याण्णव बाहू असणाऱ्या उरण नामक असुराला मारता झाला व ज्यानें अर्बुदाला पालथा पाडून तुडविला त्या इन्द्राला सोमपात्र भरल्यानंतर स्तुतीनें संतुष्ट करा.
अध्वर्यवो य: स्वश्नं जघान य: शुष्णमशुषं यो व्यंसम्। य: पिप्रुं नमुचिं यो रुधिकां तस्मा इन्द्रायान्धसो जुहोत ॥ २.१४,५.
हे अध्वर्यू हो, जो इन्द्र सर्वभक्षक अशा अश्वाला मारता झाला व ज्या इन्द्रानें शुष्ण नामक असुराला भुजदंड छाटून मारलें आणि ज्यानें सर्वव्यापी पिप्रु नामक असुराला व नभुचि नामक असुराला मारिलें त्या इन्द्राकरितां हविरन्नांचें हवन करा.
अध्वर्यवो य: शतं शम्बरस्य पुरो बिभेदाश्मनेव पूर्वी:। यो वर्चिन: शतमिन्द्र: सहस्त्रमपावपद्भरता सोममस्पै ॥ २.१४,६.
हे अध्वर्यू हो, ज्यानें शंबरासुराचीं जुनाट शंभर नगरें खडयाप्रमाणें जमीनदोस्त केलीं; व ज्यानें वर्चि नामक असुराचे हजार पुत्र भूमीवर हाणून पाडले त्या इन्द्राकरितां सोमरस भरून तयार करा.
अध्वर्यवो य: शतमासहस्त्रं भूम्या उपस्थेऽवपज्जघन्वान् । कुत्सस्यायोरतिथिग्वस्य वीरान्न्यावृणग्भरता सोममस्मै ॥ २.१४,७.
हे अध्वर्यू हो, ज्या इन्द्रानें प्रथम शत्रूंनां मारिलें, नंतर ज्या इन्द्रानें हजार असुरांना भूमीवर हाणून पाडलें. शिवाय ज्या इन्द्रानें कुत्सनामक राजर्षि, आयुनामक राजर्षि व अतिथिग्व यांच्याशीं शत्रुत्व करणाऱ्या शुष्णादि असुरांचा वध केला त्या इन्द्राकरितां सोमरस भरून घ्या.
अध्वर्यवो यन्नर: कामयाध्वे श्रुष्टी वहन्तो नशथा तदिन्द्रे। गभस्तिपूतं भरत श्रुतायेन्द्राय सोमं यज्यवो जुहोत ॥ २.१४,८.
हे यज्ञनेते अध्वर्यू हो, अभीष्टसिद्धीची इच्छा करणारे तुम्ही इन्द्राच्या ठिकाणीं सोमरस पोहोंचवून अभिलषित फलप्राप्त करून घ्या. लोकप्रसिद्ध इन्द्राकरितां शुद्ध केलेला सोमरस भरून न्या. हे याग करणारे अध्वर्यू हो, नेलेला सोमरस अग्नीमध्यें हवन करा.
अध्वर्यव: कर्तना श्रुष्टिमस्मै वने निपूतं वन उन्नयध्वम्। जुषाणो हस्त्यमभि वावशे व इन्द्राय सोमं मंदिरं जुहोत ॥ २.१४,९.
हे अध्वर्यू हो, या इन्द्राला सुखकर होईल असा सोमरस तयार करा. पाण्यांत कालवून व गाळून शुद्ध केलेला सोमरस चमसांत भरा. तो इन्द्र तुमच्या हातच्या सोमरसाची इच्छा करतो. यासाठीं मादक अशा सोमरसाचें इन्द्राकरितां हवन करा.
अध्वर्यव: पयसोधर्यथा गो: सोमेभिरीं पृणता भोजमिन्द्रम् । वेदाहमस्य निभृतं म एतद्दित्सन्तं भूयो यजनश्चिकेत ॥ २.१४,१०.
हे अध्वर्यू हो, गाईची कास जशी दुधानें भरलेली असते त्याप्रमाणें फलदाता व रक्षणकर्ता जो इन्द्र त्याला सोमरसांनीं परिपूर्ण करा. माझ्या सोमरसाच्या अंगीं असलेला सुखसाधन स्वभाव माझा मीच जाणतों हा मी आतांच तुम्हाला सांगत आहें, यजनीय असा इन्द्र सोमदात्या यजमानाला अतिशय ओळखतो.
अध्वर्यवो यो दिव्यस्य वस्वो य: पार्थिवस्य क्षमस्य राजा । तमूर्दरं न पृणता यवेनेन्द्रं सोमेभिस्तदपो वो अस्तु ॥ २.१४,११.
हे अध्वर्यू हो, जो इन्द्र पूज्य अशा द्युलोकाचा व पृथ्वी आणि अंतरिक्ष यांतील धनाचा राजा होतो, ज्याप्रमाणें एखादें कोठार धान्यानें भरलेलें असतें त्याप्रमाणें इन्द्राचें उदर सोमरसानें भरून काढा, हें काम तुमच्याच हातून होवो.
मंदस्व होत्रादनु जोषमन्धसोध्वर्यव: स पूर्णां वष्टयासिचम् । तस्मा एतं भरत तद्वशो ददिर्होत्रात्सोमं द्रविणोद: पिब ऋतुभि: ॥ २.३७,१.
हे धनदातृ देवा, देवाचें अन्न अशा या सोमरसानें होत्यानें केलेल्या यागास अनुमोदन देऊन हर्षभरित हो. हे अध्वर्यू हो, तो द्रविणोदा देव सिंचनरूपानें दिलेल्या संपूर्ण आहुतीची इच्छा करतो, यासाठीं धनप्रद अशा त्या अग्नीला हा सोम भरून पोंचता करा. तो द्रविणोदा तुम्हाला अभीष्ट फल देतो. हे द्रविणोद, होत्यानें केलेल्या यागापासून ऋतूंच्या सहवर्तमान तूं सोमरसाचें प्राशन कर.
अध्वर्यवश्चकृवांसो मधूनि प्रवायवे भरत चारु शुक्रम् । होतेव न: प्रथम: पाह्यस्य देव मध्वो ररिमा ते मदाय ॥ ५.४३,३.
हे अध्वर्यू हो, मधुर अशीं सोम, आज्य वगैरे हविर्द्रव्यें तयार करणारे तुम्ही वायूकरितां अवदान भरून घ्या. रमणीय व उत्तेजक अशा या सोमरसाला हे वायो, तूं होत्याप्रमाणें इतर देवांच्या अगोदर प्राशन कर. हे वायुदेवा, मधुर सोमरस आम्ही तुला अर्पण करतों.
सपर्यवो भरमाणा अभिज्ञु प्रवृंजते नमसा बर्हिरस्नौ । आजुह्वाना घृतपृष्ठं पृषद्वदध्वर्यवो हविषा मर्जयध्वम् ॥ ७.२,४.
गुडघे टेंकून परिचर्या करणारे हविर्द्रव्यासह दर्भ अग्नीमध्यें प्रक्षिप्त करीत असतात. हे अध्वर्यू हो, हविर्द्रव्य अर्पण करून घृतपृष्ठ अशा अग्नीची परिचर्या करा.
अध्वर्यवोरुणं दुग्धमंशुं जुहोतन वृषभाय क्षितीनाम् । गौरा द्वेदीयाँ अवपानमिनद्रो विश्वाहेद्याति सुतसोममिच्छन् ॥ ७.९८,१.
हे अध्वर्यू हो, जनतेमध्यें श्रेष्ठ अशा इन्द्रासाठीं घुसळून तयार केलेल्या व अरुणवर्ण अशा सोमरसाचें हवन करा. दूर असलेल्या पिण्यायोग्य सोमरसाला गौरमृगाहूनहि अधिक चाहणारा इन्द्र यजमानासाठीं सोमरसाची इच्छा करून सर्वदा यज्ञस्थलीं जात असतो. याकरितां इन्द्रासाठीं सोमरसानें यजन करा.
अध्वर्यवो हविष्मंतो हि भूताच्छाप इतोशतीरुशन्त: । अवयाश्चष्टे अरुण: सुपर्णस्तमास्यध्वमूर्मिमद्या सुहस्ता: ॥ १०.३०,२.
हे अध्वर्यू हो, तुम्ही हवि:संपन्न असे व्हा. हे सोमाभिषवाची इच्छा करणाऱ्यांनों, सोमाभिषवाला उत्सुक झालेलीं हीं उदकें येथून तुम्ही आपल्याकडे घेऊन जा. अरुणाप्रमाणें तांबूस असा सोमरस अंतरालांतून खालीं पडत असतांना मेघस्थ उदकांनां पाहतो. हे कमनीयहस्त अध्वर्यू हो, अरुणवर्ण अशा सोमरसाचा लोट त्या उदकासह खालीं (दशापवित्रावर) लोटा.
अध्वर्यवोपइता समुद्रमपांनपातं हविषा यजध्वम् । स वोदददूर्मिमद्या सुपूतं तस्मै सोमं मधुमन्तं सुनोत ॥ १०.३०,३.
हे अध्वर्यू हो, उदकें आणण्यासाठीं तुम्ही जलाशयावर जा, तो अपांनपात् तुम्हांला शुद्ध असा जलसमूह देवो. तुम्हीसुद्धां त्या अपांनपात्देवानें दिलेल्या उदकानें सिंचन करून मधुर असा सोम कुटून तयार करा, व त्या सोमानें अपांनपात्चें यजन करा.
याभि: सोमो मोदते हर्षते च कल्याणीभिर्युवतिभिर्न मर्य: । ता अध्वर्यो अच्छा परेहि यदासिंचा ओषधीभि पुनीतात् ॥ १०.३०,५.
कुटून तयार केलेला सोम ज्या उदकांच्या सहवासानें तरुणींच्यासह तरुण हर्षित हातो त्याप्रमाणें हर्षित होतो त्या उदकांनां आणण्यासाठीं तूं जलाशयावर जा. ज्यावेळीं त्या उदकानें सोमवल्ली भिजवून काढशील त्या वेळीं सोम व उदकें हीं बरोबरच गाळण्यावर ओत.
एवेद्यूने युवतयो नमन्त यदीमुशन्नुशतीरेत्यच्छ । संजानते मनसा संचिकित्रेध्वर्यवो धिषणापश्च देवी: ॥ १०.३०,६.
सोमाभिषवाकरितां उत्सुक झालेला अध्वर्यु सोमाभिषवार्थ उत्सुक झालेल्या उदकांनां आणण्यासाठीं ज्या वेळेस जातो त्या वेळेस तरुण स्त्रिया ज्याप्रमाणें नमतात त्याप्रमाणें तीं उदकें अध्वर्यूपुढें नमतात. अध्वर्यू हे त्या उदकांचीं स्तुति, लक्षण, वाणी व तीं उदकें यांनां विशिष्ट बुद्धीनें उत्कृष्ट जाणतात व स्वत:चा अधिकार व परस्परोपकार यांनां डोळयांनीं पाहतात.
यं सोममिन्द्र पृथिवीद्यावा गर्भं न माता बिभृतस्त्वाया । तं ते हिन्वन्ति तमु ते मृजन्त्यध्वर्यवो वृषभ पातवा उ ॥ ३.४६,५.
हे इन्द्रा, हे द्यावापृथ्वी हो ! माता ज्याप्रमाणें गर्भाला धारण करते त्याप्रमाणें तुझ्यासाठीं आम्ही हा सोम धारण केला आहे. हे श्रेष्ठ इन्द्रा, अध्वर्यू हे तुझ्याकरतांच त्या सोमरसाला भरून पाठवितात व तुला पिण्यासाठीं सोमरस गाळतात.
यजामहे वां मह: सजोषा हव्येभिर्मित्रावरुणा नमोभि: । घृतैर्घृतस्नू अध यद्वामस्मे अध्वर्यवो न धीतिभिर्भरन्ति ॥ १.१५३,१.
हे मित्रावरुण हो, आम्ही सर्व मिळून हविर्द्रव्यांच्या योगानें व स्तोत्रांच्या योगानें तुमचें पुष्कळसें यजन करतो. हे उदकवृष्टि करणारे मित्रावरुण हो, आमचे अध्वर्यूहि घृताहुतियुक्त अशा यजनकर्मांनीं तुम्हांला तृप्त करीत आहेत.
आ यं जना अभिचक्षे जगामेन्द्र: सखायं सुतसोममिच्छन् । वदन्ग्रावाववेदिं भ्रियाते यस्य जीरमध्वर्यवश्चरन्ति ॥ ५.३१,१२.
अहो लोक हो, हा पहा, स्तोत्र करणाऱ्याला व सोमाचा अभिषव करणाऱ्याला भेटण्याची इच्छा करणारा इन्द्र तुमच्या भेटीस आला आहे. हे अध्वर्यू हो, तुम्ही जो वरवंटा (घाव घालतांना) आदळतां तो सोम कुटण्याचा वरवंटा फट् फट् असा शब्द करीत आपल्या आघातानें वेदीला खालीं दडपतो.
प्रसोता जीरो अध्वरेष्वस्थात्सोममिन्द्राय वायवे पिबध्यै । प्रयद्वां मध्वो अग्नियं भरन्त्यध्वर्यवो देवयन्त: शचीभि: ७.९२,२.
हे इन्द्रवायू हो, ज्या यज्ञामध्यें सोमरसाचा प्रथम भाग देवाची इच्छा करणारे अध्वर्यू अभिषवादिकर्माच्या योगानें तुमच्यासाठीं भरून तयार करतात, त्या यज्ञांत अभिषवरूप कार्य झटपट करणारा (अध्वर्यु) इन्द्राला व वायूला पिण्याकरतां सोमरस पुढें पाठविता झाला.
ब्राह्मणास: सोमिनो वाचमक्रत ब्रह्म कृण्वन्त: परिवत्सरीणम् । अध्वर्यवो घर्मिण: सिष्विदाना आविर्भवन्ति गुह्या न केचित् ॥ ७.१०३,८.
सोमयुक्त व स्तोत्रात्मक असें सांवत्सरिक कर्म करणारे ब्राह्मण जसा शब्द करतात तसा हे बेडूक शब्द करतात. घामानें डबडबलेल्या अंगाचे व घर्मानुष्ठान करणारे अध्वर्यु जसे सध्यां गुप्त झाले आहेत त्याचप्रमाणें उन्हाळ्यांत बेडूकहि कोठें दृष्टीस पडत नाहींत. परंतु पावसाळ्यांत ते पुन्हां दिसूं लागतात.
आजागृविर्विप्र ऋतामतीनां सोम: पुनानो असदच्चमूषु । सपन्ति यं मिथुनासो निकामा अध्वर्यवो रथिरास: सुहस्ता: ॥ ९.९७,३७.
जागरणशील व स्तुतींनां जाणणारा तो सोक शुद्ध होत असतांना चमसामध्यें गळत असतो. एकमेकाशीं जुटीनें वागणारे निरंतर कार्येच्छु, यज्ञनेते व उत्कृष्ट हातांचे अध्वर्यू ज्या सोमाला दशापवित्रावर ओततात तो सोमरस वरून चमसांत पडतो.
रथेष्ठायाध्वर्यव: सोममिन्द्राय सोतन । अधि ब्रध्नस्याद्रयो विचक्षते सुन्वतो दाश्वध्वरम् ॥ ८.४,१३.
हे अध्वर्यू हो, रथांत बसून येणाऱ्या इन्द्राकरितां सोम कुटून तयार करा. सोमाच्या अभिषवाकरितां पसरलेल्या कातडयावर ठेवलेल्या पाटयावर मांडून ठेवलेले बत्ते (वरवंटे) हविर्दान करणाऱ्या यजमानाचा याग जेणेंकरून संपादला जाईल त्या रीतीनें सोमवल्ली कुटीत असतांना विशेष प्रकाशित होतात.
त्वमध्वर्युरुत होतासि पूर्व्य: प्रशास्ता पोता जनुषा पुरोहित: । विश्वा विद्वाँ आर्त्विज्या धीर पुष्यस्यग्ने सख्ये मारिषामा वयं तव ॥ १.९४,६.
हे अग्ने, अध्वर्यु तूंच आहेस व पुरातन असा होताहि तूंच आहेस. प्रशास्ता, पोता व जन्मसिद्ध असा पुरोहितहि तूंच आहेस. हे सर्वज्ञ अग्ने, तूं ऋत्विजांचीं सर्व कर्में जाणतोस व फलद्रूप करतोस. हे अग्ने, तुझ्या मैत्रीमध्यें आमचा नाश न होई असें कर.
होताध्वर्युरावया अग्निमिंधो ग्रावग्राभ उत शंस्ता सुविप्र: । तेन यज्ञेन स्वरंकृतेन स्विष्टेन वक्षणा आपृणध्वम् ॥ १.१६२,५.
होता, अध्वर्यु, अग्निमिंध, गावग्राभ व सुविप्र शंस्ता असे सर्वजण हो, उत्तमप्रकारें संपादिलेल्या यज्ञांच्या योगानें नद्या वहावयास लावा.\
यदी मातुरुपस्वसा घृतं भरन्त्यस्थित । तासामध्वर्युरागतौ यवो वृष्टीव मोदते ॥ २.५,६.
(वेदिरूप) मातेच्या तिघी बहिणी (जुहू, उपभृत् व ध्रुवा) घृतरूपी हविर्द्रव्यें भरून घेऊन जेव्हां त्याच्याजवळ येतात तेव्हां तो अध्वर्यु धान्यबीज ज्याप्रमाणें वृष्टीची प्राप्ति होतांच हर्षित होतें त्याप्रमाणें हर्षित होतो.
मित्रो अग्निर्भवति यत्समिद्धो मित्रो होता वरुणो जातवेदा: । मित्रो अध्वर्युरिषिरो दमूना मित्र: सिन्धूनामुत पर्वतानाम् ॥ ३.५,४.
अग्नि प्रदीप्त झाला असतां तो मित्र, होता, वरुण व जातवेद म्हणजे उपजतज्ञानी होतो. मित्र झालेला तो अग्नि अध्वर्यु, गमनशील (वायू) व गृहसुखकारी होतो. शिवाय तो मित्र झालेला अग्नि समुद्रांचा व पर्वतांचाहि मित्र होतो.
स्तीर्णे बर्हिषि समिधाने अग्ना ऊर्ध्वो अध्वर्युर्जुजुषाणो अस्थात् । पर्यग्नि: पशुपा न होता त्रिविष्टयोति प्रदिव उराण: ॥ ४.६,४.
बर्हि अंथरल्यावर, अग्नि प्रज्वलित केल्यानंतर, प्रियतम असा अध्वर्यु उठून उभा राहतो. पुरातन व देवपूजक असा तो (अग्निरूप) होता तीन वेळ प्रदक्षिणा करतो.
समिद्धाग्निर्वनवत्स्तीर्णबर्हिर्युक्तग्रावा सुतसोमो जराते । ग्रावाणो यस्येषिरं वदन्त्यदध्वर्युर्हविषाव सिन्धुम् ॥ ५.३७,२.
ज्यानें अग्नि प्रदीप्त केला, व ज्यानें बर्हि आंथरले तो प्रार्थना करतो. सोम कुटावयाचे बत्ते जुळवून सोम कुटल्यावर तो स्तवन करतो. ज्या अध्वर्यूचे ते बत्तेसुद्धां देवांनां उद्देशून जणों काय या, या, असे शब्द उच्चारित आहेत असा तो अध्वर्यु हविर्द्रव्यासह नदीतीरावर (यजनासाठीं व अवभृथस्नानासाठीं) जातो.
या ते काकुत्सुकृता या वरिष्ठा यया शश्वत्पिबसि मध्व ऊर्मिम् । तया पाहि प्रते अध्वर्युरस्थात्सन्ते वलो वर्ततामिन्द्र गव्यु: ॥ ६.४१,२.
हे इन्द्रा, ब्रह्मदेवानें सुंदर घडविलेली व विस्तीर्ण अशी जी तुझी जीभ व ज्या जिभेनें तूं नेहमीं सोमरसाचे घोट घेत असतोस त्या जिव्हेनें आमचें रक्षण कर. आमचा अध्वर्यु तुझ्यासाठीं सोमरस भरून घेऊन जात आहे. हे इन्द्रा, शत्रूंच्या गाई आम्हाला मिळवून देण्यासाठीं तुझें वज्र शत्रूंच्यावर तुटून पडो-त्यांचा नायनाट करो.
हविष्कृणुध्वमागमदध्वर्युर्वनते पुन: । विद्वाँ अस्य प्रशासनं। ॥ ८.६१,१.
हे हविर्द्रव्यें तयार करणारे (लोक) हो, तुम्ही हविर्द्रव्यें तयार करा. अग्नि आतां येईल. अध्वर्यु त्याची सेवा करतो. कां कीं, तोच त्या अग्नीच्या यजनाच्या पद्धतीला जाणतो.
वेत्यध्वर्यु: पथिभी रजिष्ठै: प्रति हव्यानि वीतये । अधा नियुत्व उभयस्य न: पिब शुचिं सोमं गवाशिरम् ॥ ८.९०,१०.
हे नियुत्वसंज्ञक वायो, अध्वर्यु सरळ मार्गांनीं हविर्द्रव्यें तुला भक्षणासाठीं घेऊन जातो. हे वाये, तूं नुसता व दुग्धमिश्र असा दोन प्रकारचा सोमरस प्राशन कर.
आ नो नियुद्भि: शतिनीमिरध्वरं सहस्त्रिणीभिरुप याहि वीतये वायो हव्यानि वीतये । तवायं भाग ऋत्विय: सरश्मि: सूर्ये सचा । अध्वयुभिर्भरमाणा अयंसत वायो शुक्रा अयंसत ॥ १.१३५,३.
हे वायो, तुझ्या शेंकडो, हजारों अश्वांसह तूं आमच्या यज्ञाला ये व तुला आवडत्या या हविर्द्रव्यांचें भक्षण कर. हविर्द्रव्यें तुझ्यासाठींच आहेत. हा तुझाच कालप्राप्त असा भाग आहे. सूर्य आपल्या रश्मिजालानें उदित झाल्याबरोबरच अध्वर्यूंनीं तुझ्यासाठीं सोम भरून तयार केले आहेत.
इमे वां सोमा अष्स्वा सुता इहाध्वर्युभिर्भरमाणा अयंसत वायो शुक्रा अयंसत ॥ १.१३५,६.
हे इन्द्रवायू हो, तुम्हां दोघांनां आवडणारे असे हे सोमरस येथें कुटून तयार करून अध्वर्यूंनीं अगदीं भरून तयार ठेवले आहेत.
अध्वर्युभि: पञ्चभि: सप्त विप्रा: प्रिसं रक्षन्ते निहितं पदं वे: । प्राञ्चो मदन्त्युक्षणो अजुर्या देवा देवानामनु हि व्रतागु: ॥ ३.७,७.
सात विप्र, पांच अध्वर्यूंच्यासह अग्निरूपी पक्ष्याला प्रिय असलेल्या स्थानाला रक्षण करतात. त्या अग्निस्थानाच्या ठिकाणीं देव प्रसन्नमुख व जरारहित होत्साते हर्षभरित होतात. देव पूर्वींच्या देवांनीं चालविलेल्या व्रताला अनुसरूनच गेले.
अध श्वेतं कलशं गोभिरक्तमापिष्यानं मधवा शुक्रमन्ध: । अध्वर्युभि: प्रयतं मध्वो अग्रमिन्दो मदाय प्रतिधत्षिबध्यै शूरो मदाय प्रतिधत्षिबध्यै ॥ ४.२७,५.
धनवान् व शूर असा इन्द्र गोदुग्धमिश्रित व सारभूत अशा सोमानें भरलेला कलश अध्वर्यूनीं दिला असतां त्याचा स्वीकार करो व मद येण्यासाठीं सोमरसरूप अन्नानें भरलेला पांढरा शुभ्र असा हा कलश पिण्यासाठीं उचलून घेवो.
प्रवीरया शुचयो दद्रिरेवामध्वर्युभिर्मधुमन्त: सुतास: । वह वायो नियुतो याह्यच्छा पिबा सुतस्यान्धसो मदाय ॥ ७.९०,१.
हे वायो, तुला प्रेरणा करणाराला शुद्ध व मधुर असे सोम कुटून तयार करून अध्वर्यू देत असतात. यासाठीं हे वायो, घोडयांच्यासह रथ येथें आण, त्या रथांत बसून ये. आमच्या यज्ञास येऊन कैफ येण्यासाठीं कुटून तयार केलेल्या सोमरूप अन्नाचा स्वकीय भाग तूं पिऊन टाक.
अभि प्रिया दिवस्पदमध्वर्युभिर्गुहा हितम् । सूर: पश्यति चक्षसा ॥ ९.१०,९.
सुवीर्यसंपन्न असा इन्द्र अध्वर्यूनीं आपल्या हृदयांत ज्या ठिकाणीं सोमरस ओतला आहे तें ठिकाण आपल्या डोळयांनीं सर्व बाजूनें पाहतो.
प्रति यदापो अदृश्रमायतीर्धृतं पयांसि विभ्रतीर्मधूनि । अध्वर्युभिर्मनसा संविदाना इन्द्राय सोमं सुषुतं भरन्ती: ॥ १०.३०,१३.
हे उदक देवातांनों, माझ्या यज्ञाला येणाऱ्या तुम्हाला मी पाहिल्या. घृत व उदकांनां मिश्र करून होमकालीं धारण करणाऱ्या तुम्हाला मी डोळयांनीं पाहिल्या. त्याचप्रमाणें अध्वर्यूंशीं मनांतल्यामनांत बोलत असतांनां व कुटून तयार केलेला सोम इन्द्राकरितां भरून घेतांना मी तुम्हांला आपल्या डोळयांनीं पाहिल्या.
वृष्ण: कोश: पवते मध्व ऊर्मिर्वृषभान्नाय वृषभाय पातये । वृषणाध्वर्यू वृषभासो अद्रयो वृषणं सोमं वृषभाय सुष्वति ॥ २.१६,५.
हे इन्द्रा, फलवृष्टिकर्ता व मदकर अशा सोमाचा रस प्रेरक होत्साता वहात असतो. सेचनसमर्थ असे अध्वर्यू् हो, शब्द करणारे सोमाभिषवपाषाण देवांनां श्रेष्ठभूत अशा सोमरसाला कुटून तयार करितात.
अस्मा अस्मा इदन्धसोध्वर्यो प्रभरासुतम् । कुवित्समस्य जेन्यस्य शर्धतोभिशस्तेरवस्परत् ॥ ६.४२,४.
हे अध्वर्यो, आमच्या, आमच्याच इन्द्राला तूं सोमरूप अन्नाचा रस भरून दे. तो इन्द्र जिंकावयास योग्य अशा शत्रूंच्या तापापासून आमचें संरक्षण करो.
अध्वर्यो वीर प्रमहे सुतानामिन्द्राय भर सह्यस्य राजा । य: पूव्याभिरुत नूतनाभिर्गीर्भिवावृधे गृणतामनीषिणाम् ॥ ६.४४,१३.
हे वीरा, हवि:प्रेरक अध्वर्यो, या महान् इन्द्राला कुटलेला सोमरस अर्पण कर. तो इन्द्र सोमाचा राजा आहे. जो इन्द्र जुन्या व नव्य अशा स्तोत्रात्मक वाणींनीं वाढला जातो. तो इन्द्र ज्याअर्थीं सोमाचा राजा आहे व त्या अर्थीं त्या इन्द्राला सोमरस अर्पण कर.
अध्वर्यो द्रावया त्वं सोममिन्द्र: पिपासति । उप नूनं युयुजे वृषणा हरी आ च जगाम वृत्रहा ॥ ८.४,११.
हे अध्वर्यो, तूं सोम कुटून तयार कर. हा सोम पिण्याची इन्द्र इच्छा करीत आहे. आपले घोडे आपल्या रथाला जोडून तो वृत्रनाशक इन्द्र येथें आला आहे.
अध्वर्यवा तु हि पिंच सोमं वीराय शिप्रिणे । भरा सुतस्य पीतये ॥ ८.३२,२४.
हे अध्वर्यो, हनुमान् अशा शूर इन्द्राला पाजण्यासाठीं सोम लवकर सिंचन कर व इन्द्राला पिण्याकरतां कुटून तयार झालेला सोमरस भरून ने.
अध्वर्यो अद्रिभि: सुतं सोमं पवित्र आसृज । पुनीहीन्द्राय पातवे ॥ ९.५१,१.
हे अध्वर्यो, वरवंटयांनीं, कुटलेला सोम गाळण्यासाठीं पवित्राच्या ठिकाणीं ओत व इन्द्राला पिण्यासाठीं गाळून तयार कर.
शंसावाध्वर्यो प्रति मे गृणीहीन्द्राय वाह: कृणवाव जुष्टम् । एदं बर्हिर्यजमानस्य सीदाथा च भूदुक्थमिन्द्राय शस्तम् ॥ ३.५३,३.
अध्वर्यो, तूं व मी दोघेहि शंसन करूं. तूं मला उत्तेजक असें कांहीं तरी म्हण. इन्द्राला आवडेल असें सुंदर स्तोत्र तुम्ही आम्ही करूंया. यजमानाच्या बर्हीवर येऊन बैस आणि मग इन्द्राकरितां स्तुतीचा प्रारंभ होवो.
एदु मध्वो मदिंतरं सिंच वाध्वर्यो अन्धस: । एवाहि वीर: स्तवते सदावृध: ॥ ८.२४,१६.
हे अध्वर्यो, मदकर अशा सोमरूप अन्नाचा मदकर असा रस इन्दाकरतां गाळून तयार कर. वीर व वर्धनशील असा हा इन्द्रच स्तोत्रशस्त्रांनीं स्तविला जातो.
इन्द्र पिब स्वधया चित्सुतस्याग्नेर्वा पाहि जिह्वया यजत्र । अध्वर्योर्वा प्रयतं शक्रहस्ताद्धोतुर्वा यज्ञं हविषो जुषस्व ॥ ३.३५,१०.
हे इन्द्रा, बलानें कुटून तयार केलेला सोम प्राशन कर, किंवा अग्नीच्या ज्वालारूपी जिह्वेनें प्राशन कर. हे समर्था, अध्वर्यूच्या हातचा तुला दिलेला सोम पी, किंवा होत्यानें दिलेल्या यजनीय अशा हवि:प्रदानाचें सेवन कर.
यस्ते द्रप्स: स्कन्दति यस्ते अंधुर्बाहुच्युतो धिषणाया उपस्थात् । अध्वर्योर्वा परि यत्ते पवित्रा तन्ते जुहोमि मनसा वषट्कृतं स्वाहा ॥ १०.१७,१२.
हे सोमा, तुझा जो रस (अधिषवण चर्माबाहेर) सांडतो किंवा तुझ्या वल्लीचा एखादा तुकडा अध्वर्यूच्या हातून गळून पडतो व (अघिषवण फलकाच्या) जवळपास सांडतो त्या सर्व सांडलेल्या सोमरसाला मनासहवर्तमान अग्नीमध्यें हवन करतो.
एमा अग्मन्रेवतीजीवधन्या अध्वर्यव: सादयता सखाय: । नि बर्हिपि धत्तन सोम्यासोपांनप्त्रा संविदानास एना: ॥ १०.३०,१४.
धनसंपन्न व जीवांनां प्रसन्न करणारीं हीं उदकें आमच्या यज्ञाला येत आहेत हें जाणून हे गडयांनों, हे सोमसंपादकांनों, हे अध्वर्यू हो, अपांनपात् देवासह या मंतरल्या जाणाऱ्या उदकांनां तुम्ही (वेदींत अंथरलेल्या) बर्हींवर आणून ठेवा.
आग्मन्नाप उशतीर्बर्हिरेदं न्यध्वरे असदन्देवयन्ती: । अध्वर्यव: सुनुतेन्द्राय सोममभूदुव: सुशका देवयज्या ॥ १०.३०,१५.
वेदींत बर्हि अंथरण्याची इच्छा करणारीं अशीं उदकें आमच्या यज्ञाला आलीं आहेत व तीं आमच्या या यज्ञांत राहून देवांनां तृप्त करण्याची इच्छा करीत आहेत. यासाठीं हे अध्वर्यू हो, तुम्ही इन्द्राकरितां सोम कुटा. या उदकांच्या प्रसारानें तुमची देवांसाठीं चाललेली यज्ञक्रिया सुलभ झाली आहे असें समजा.
अध्वर्युं वा मधुपाणिं सुहस्त्यमग्निधं वा धृतदक्षं दमूनसम् । विप्रस्य वा यत्सवनानि गच्छथोत आयातं मधुपेयमश्विना ॥ १०.४१,३.
हे अश्विनौ हो, जरी तुम्ही दुसऱ्या एखाद्या विप्राच्या सवनांत गेलेले असाल तरि या यज्ञांनां सोडून आमच्या यज्ञांतील सोमात्मक पेय पिण्याकरितां हातांत सोमरस घेऊन उभ राहिलेल्या सुहस्त्य अध्वर्यूसाठीं किंवा उदार अग्नीध्राच्या प्रार्थनेला तरी ऐकून येथें या.
दधन्वे वा यदी मनु वोचह्ब्रह्माणी वेरु तत् । परि विश्वानि काव्या नेमिश्चक्रमिवाभवत् ॥ २.५,३.
(अध्वर्यु) जो हविर्द्रव्यांचा प्रक्षेप करतो अथवा (ब्रह्मा) ब्रह्मांचें पठण करतो या सर्व गोष्टी अग्नि जाणतोच. सर्व कर्में धावेच्या पोटीं असलेल्या चक्राप्रमाणें याच्या पोटांत असतात.
यमु पूर्वमहुबे तमिदं हुबे सेदु हब्यो ददिर्यो नाम पत्यते । अध्वर्युभि: प्रस्थितं सोम्यं मधु पोत्रात्सोमं द्रविणोद: पिब ऋतुभि: ॥ २.३७,२.
हे धनदात्या, ज्या तुला मी पूर्वीं बोलाविलें होतें त्या तुला मी आतांहि बोलावीत आहें. धनप्रद बोलावण्यायोग्य व अभीष्ट फल देणारा जो (अग्नि) देवांनीं योजिला जातो त्या धनप्रदाला अर्पण करण्यासाठीं सोमात्मक मधुर असें हविर्द्रव्य अध्वर्यूंनीं नेलें आहे. हे धनदात्या, ऋतूंच्या सहवर्तमान पोत्यापासून सोमरस पी.
वरील उताऱ्यांवरून आपणांस असें दिसतें कीं, अध्वर्यूचें मुख्य काम सोमरसाचें हवन करण्याचें होतें. अध्वर्यु हा शब्द अनेकवचनींहि अनेक ठिकाणीं आढळतो यावरून सोमहवनाचें कार्य एकाच वेळीं अनेक ऋत्विज करीत असतील असा काल असावा अशी शंका घेण्यास जागा होते. अध्वर्यूला स्तुति करण्याचें कार्य असल्याबद्दलहि उल्लेख आहेत. तो यज्ञक्रिया जाणतो, तोच यजनपद्धति जाणतो, तो अग्नि प्रदीप्त करतो, बर्हि अंथरतो, त्याचे ग्रावे शब्द करीत असतात, तो सोमरस पात्रामध्यें भरतो. इन्द्राकरितां, वायूकरितां, अश्विनांकरितां वगैरे तो हविर्द्रव्यें समर्पण करितो. अध्वर्यू धर्मानुष्ठान करितात, ते घृताहुतियुक्त यजनकर्मांनीं मित्रावरुणांनां संतुष्ट करतात, ते यजमानाचा याग संपादन करितात, ते कातडयावर ठेवलेल्या पाठ्यावर वरवंटयानें सोम कुटतात, दशापवित्रावर गाळतात व चमसादि पात्रांत भरून देवांस अर्पण करितात, अनेक असुरांनां मारणाऱ्या इन्द्राला ते सोमरस अर्पण करून उत्तेजित करतात इत्यादि अनेक क्रिया प्रामुख्यानें अध्वर्यूंच्या म्हणून उल्लेखिल्या आहेत. यावरून अध्वर्यूंच्या यज्ञाविधि सोमरसप्रधान असून त्यांत अनेक क्रिया असत व मंत्रांबरोबर तंत्रहि बरेंच वाढलें होतें असें दिसतें.