विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खैरागड, संस्थान.- मध्यप्रांत. उ. अ. २१ ४' ते २१ ३४' व पू. रे. ८० २७' ते ८१ २२'. क्षेत्रफळ ९३१ चौरस मैल. लोकसंख्या १३७५५४. या संस्थानचे तीन निरनिराळे भाग आहेत. (१) खैरागड आणि डोंगरगड (२) खामारिया व (३) खोलवा. जंगलांत वाघ, चित्ते, नीलगाई, अस्वलें, लांडगें, गवे, डुकरें, वगैरे रानटी जनावरें दिसतात. गेल्या १९ वर्षांची पावसाची सरासरी ४४ इंच आहे. संस्थानची हवा साधारण निरोगी आहे. उष्णमान ३८० पासून १०४० पर्यंत असतें.

इतिहासः- छोटा नागपूरच्या नागवंशी रजपुतराजा सभासिंग या राजघराण्याचा मूळपुरुष होता असें मानण्यांत येतें. सभासिंगाचा श्यामघन नांवाचा वंशज सन १७४० सालीं खोलवाचा जमीनदार होता. पुढें खोलव्याच्या राजास भोंसल्याचें मांडलिकत्व कबूल करावें लागलें व खंडणी ५०० (नागपूर नाणें) रुपये ठरली. संस्थानची राजधानी खोलवा होती परंतु यानें खैरागड येथें आपलें मुख्य ठाणें केलें. सन १७५५ सालीं खंडणी १५०० रुपये झाली. नंतर ८००० रुपयापर्यंत चढवली. सन १७८४ च्यासुमारास कवर्धाचे उजियारसिंग आणि सरदारसिंग यांचा खामारिया परगण्याच्या मालकीसंबंधानें तंटा उपस्थित झाला. खैरागडच्या राजानें सरदारसिंगास मदत केली व दिलेल्या कर्जाची फेड म्हणून तो परगणा मिळाला. यावेळीं भोंसल्यास ३५००० रुपये खंडणी द्यावी लागत असे. इ. स. १८१६ सालीं डोंगरगडच्या जमीनदारानें भोंसल्यांच्या विरुद्ध बंड केलें, त्याचा नाश संस्थानिक टिकाइतरायानें नांदगांवच्या संस्थानिकाची मदत घेऊन केला. त्यामुळें ती जमीनदारी खैरागड संस्थानांत सामील झाली व खंडणी एकंदर ४४००० रुपये करण्यांत आली.

सन १८५४ सालीं नागपुरचें राज्य ब्रिटिशांनीं खालसा केलें व या संस्थानची खंडणी ३९००० (कंपनी नाणें). ठरली सन १८६५ सालीं खैरागड मांडलिक संस्थान आहे असें ठरवून संस्थानिकास दत्तक वगैरेसंबंधींची सनद देण्यांत येऊन सन १८६७ सालीं खंडणी ४७००० पर्यंत वाढविली गेली. तीच सन १८८८ सालीं ७०००० रुपये केली व १ एप्रिल सन १९०९ पासून पुढील ३० वर्षेंपर्यंत खंडणी ८०००० रुपये ठरली.

पुराणवस्तुसंशोधनः- खैरागड येथें एक व डोंगरगड येथें एक अशीं दोन प्राचीन देवळें आहेत. खैरागड येथील देऊळ रुखरस्वामीचें आहे. (रुखरस्वामी शब्द पहा).

डोंगरगड येथील देऊळ तेथील राजा कामसेन यानें बांधलें आहे. हा उज्जनीचा राजा विक्रमादित्य याचा समकालीन होता. या देवळास बोमलाईचें देऊळ असें म्हणतात. डोंगरगड येथें कामकंदला नांवाचें तळें आहे. कामसेनाच्या रखेलीच्या नांवावरून तळ्यास हें नांव दिलें आहे. बोमलाई डोंगरावरील मोतियाबीर तलावाच्या कांठावर एक दहा फूट उंचीचा दगड सांपडला असून त्यावर एक फारसी लिपींत लेख आहे. देवरबीज येथें एक काळया दगडाचें महादेवाचें लिंग असून तें फार जुनें आहे. त्यावर मकरध्वज जोगी असें नांव खोदलेलें आहे.

या संस्थानांत खैरागड व डोंगरगड येथें म्युनिसिपालिटया आहेत. या संस्थानांत एकंदर ५२१ खेडीं आहेत. पैकीं ४९६ मध्यें वस्ती आहे व बाकीचीं ओसाड पडलेलीं आहेत.

भाषा:- छत्तिसगड हिंदी भाषेची उपभाषा शेंकडा ९५ लोक बोलतात. मराठी भाषा बोलणारांची संख्या सुमारें ४००० आहे. लागवडीखालीं जमीन सन १८९४ सालीं सुमारें ७०० चौरस मैल होती. त्यापैकीं सुमारे २/३ खरीफ व १/३ रब्बी. मुख्य पिकें कोडन, भात, गहूं, हरभरा इत्यादि.

बंगालनागपूर रेल्वेची या संस्थानांत तीन स्टेशनें आहत तीः- डोंगरगड, बोरतलाव आणि मसुरा. डोंगरगड येथें मोठा व्यापार चालाते.

जंगलाचें क्षेत्रफळ सुमारें १६५ चौरस मैल असून सन १९०७ सालीं जंगलाचें उत्पन्न ४०००० रुपये होतें व खर्च ३५०० रुपये होता.

जमीनपहाणी, तुरुंग, अबकारी, पोलिस, रॅजिस्ट्रेशन, सार्वजनिक कामें, जंगल, शिक्षण, दवाखाना वगैरे खातीं संस्थानांत आहेत.

गां व.- मध्यप्रांत. खैरागड संस्थानच्या राजधानीचा गांव. बंगालनागपूर रेल्वेच्या डोंगरगड व राजनांदगांव स्टेशनपासून हा गांव पक्कया सडकेनें २३ मैल आहे. क्षेत्रफळ १६५ एकर व लोकसंख्या ४६५६. येथें संस्थानिकाचा राजवाडा, व्हिक्टोरिया- हायस्कूल दवाखाना, कचे-या, तुरंग वगैरे आहेत. इसवी स. १९०० सालीं म्युनिसिपालिटि स्थापन झाली आहे. येथील तुरुंगांत उत्तम सतरंज्या होत असून गांवांत पितळेचीं भांडी व लांकडी सामांन तयार होतें.