प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

हिंदुस्तानांतील संप्रदायदौर्बल्य. - संप्रदायांचें महत्त्व यूरोपला जर इतकें जाणवलें आणि त्यानें राष्ट्रें चीं राष्ट्रें शृंखलाबद्ध झालीं तर त्या संस्थेचा परिणाम हिंदुस्थनांत फारसा कां झाला नाहीं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानांत दिसून येणारें संप्रदायसंस्थेचें अपयश पाहून त्याचें कारण काय असावें असा विचार करतां खालील गोष्टी दिसतात. लोकांमध्यें सादृश्य पुष्कळ उत्पन्न झाल्याशिवाय आणि प्रयोजन पडल्याशिवाय भिन्नजातिविवाह शक्य होत नाहीं. शिवाय प्रत्येक संप्रदायाची स्थिरता आणि शक्ति हीं फार नियमित असल्यामुळें एखाद्या गुरूच्या नादीं लागून आपल्या जातींत असलेलें स्थान तरी कोण गमावतो. आज जातिभेद मोडावा म्हणून उपदेश करणारे प्रार्थनासमाजांतील प्रमुख सारस्वत ब्राह्मण विवाह करतेवेळेस आपल्या जातींतीलच लहानशा भेदापलीकडे न जाण्याची धूर्तता दाखवितात. यावरून संप्रदायांचा चिरस्थायीपणा नसल्यामुळें कोणीहि धूर्त पुरुष ज्या गोष्टी व्यक्तीस तात्कालिक हानिकारक आहेत त्या संप्रदायाच्या तत्त्वासाठीं करण्याच्या भानगडींत पडत नाहींत; मात्र कांहीं बावळट किंवा दुर्बल माणसें पकडून त्यांस अशा हानिकारक गोष्टी उदाहरणार्थ अन्यजातिविवाह करण्यास प्रेरित करितात. जोंपर्यंत देशामध्यें निरक्षरता दाट आहे आणि उपदेश करणार्‍यांचें महत्त्वहि संशयास्पद आहे, आणि जोंपर्यंत संप्रदायांतच दुर्बलपणा आहे तोंपर्यंत संप्रदायांच्या मार्फत जातिभेद मोडणें शक्य नाहीं. जातिभेद जो टिकला तो तत्त्वांनीं किंवा उपदेशांनीं टिकला नाहीं; तर आचारविषयक आणि शैक्षणिक विषमतेमुळें टिकला आहे. हिंदुस्थानांतील कोट्यावधि लोकांस सुसंस्कृत करणें राहोच त्यांस नुसतें लिहावयास वाचावयास आणि थोडा बहुत विचार करावयास आणि आपला फायदा समजून घ्यावयास शिकविणें हें कार्य देखील अत्यन्त कठिण आहे आणि तें झाल्याशिवाय जातिभेद नाहिंसा व्हावयाचा नाहीं. फायदा दिसला म्हणजे अनेक बंधनें तोडून बाहेर पडतात. विवाहविषयक अडचणी दिसूं लागल्या म्हणजे लोक भिन्नजातीविवाहासहि प्रवृत होतात. हें सिद्ध करण्यास भरपूर पुरावा आहे. कोणा व्यक्तीस अन्य जातींतील व्यक्तींशीं विवाह करण्याची उत्कट इच्छा असून नियम आडवे आले म्हणून सुधारक ओरडत होते असें मुळीच नव्हतें. ज्याप्रमाणें द्वैताद्वैतावर रणें माजवावयाचीं त्याप्रमाणें जातिभेद असावा किंवा नसावा असा तात्त्विक वाद मात्र उत्पन्न झाला होता. परदेशगमनाबद्दल देखील असाच तात्त्विक वाद चालू असे. ज्या वेळेस दहा लाखांपेक्षां अधिक हिंदू लोक परदेशीं गेले होते त्या वेळेस देखील सामाजिक परिषदांमधून परदेशगमनास हरकत नसावी या तर्‍हेचे ठराव पास होतच होते! जाणारा वर्ग यांच्या ठरावाची फिकीर करीत नव्हता आणि ठराव करणारा वर्ग बाहेर देशीं जाण्याच्या कधीं पंचाइतींत पडत नव्हता. अवश्यकता जसजशी प्राप्त होत गेली तसतसे अन्य जातींत लग्न करणें बरेंच चालू झालें. हे सामाजिक सुधारणेचे तत्त्ववेत्ते चमकूं लागण्यापूर्वीं भिन्न जातींत प्रसंगोपात्त परस्परविवाह किती रूढ झाला होता याचा थोडासा अजमास येण्यासाठीं कांहीं उदाहरणें येथें देतों. (१) तंजावरकडे गेलेल्या देशस्थांत त्यांच्याबरोबर गेलेले कोंकणस्थहि मिसळून गेले आहेत हें सिद्ध करण्यास साधनें अनेक आहेत. त्यांच्यांत कोकणस्थांचीं आडनांवें अनेक सांपडतात. गोडबोले, राजवाडे, पाटणकर, सोहोनी, चितळे वगैरे आडनांवें तेथील देशस्थ म्हणविणारांत आहेत. (२) मध्यप्रांतांत दूर गेलेल्या कोकणस्थांनीं आपला देशस्थांतच समावेश करून घेतला आहे. उदाहरणार्थ, रायपूरचे बर्वे वकील घ्या. हे आपणांस देशस्थ म्हणवितात आणि त्यांचे लग्नव्यवहार कोकणस्थांशीं नसून देशस्थांशीं आहेत. (३) अनेक द्राविड  ब्राह्मण, विशेषेंकरून स्मार्त ब्राह्मण हे महाराष्ट्रांत आल्यानंतर देशस्थांत मिसळून जातात. द्रविड आडनांव लावणारे अनेक ब्राह्मण आज पक्के महाराष्ट्रीय झाले आहेत ते आणि नागपूरचें कौशिककर घराणें हीं या विधानास उदाहरणें आहेत. (४) अनेक तैलंग ब्राह्मण आज पक्के महाराष्ट्रीय बनले आहेत, याचीं उदाहरणें वर्‍हाड-नागपुरांत अनेक आहेत. वर्‍हाडचें विद्वान पुढारी माधवराव अणे हे मूळचे तैलंग होत. (५) कन्नड ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण यांचीं इतकीं लग्नें झालीं आहेत कीं त्यांचा हिशोबच करितां येत नाहीं. (६) नेपाळकडे गेलेले महाराष्ट्रीय ब्राह्मण पहाडिया जातीच्या ब्राह्मणांशीं लग्नें करून पहाडिया बनले आहेत. पण त्यांत महाराष्ट्रीय आडनांवें मात्र शिल्लक आहेत; आणि तीं त्यांचें महाराष्ट्रीयत्व लपूं देत नाहींत. (७) अनेक महाराष्ट्रीय घराणीं तैलंगणांत जाऊन तैलंग बनलीं असावींत असें दिसतें. त्याशिवाय पिंगळे, केतकर हीं आडनांवें त्यांच्यांत दिसलीं नसतीं. केतकर या नांवाचा स्वरूपभेद मात्र तेथें झालेला आहे तो केतवार असा आहे; आणि केतवार हें आडनांव ज्यापासून उत्पन्न होईल असें स्थान तैलंगणांत नाहीं. केतवारांचें गोत्र केतकरांप्राणेंच गार्ग्य आहे. तैलंग पिंगळे शिवाजीचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हे आमच्याच घराण्यांतील होते असें म्हणतात. (८) क्रमवंत हे मूळचे क्रमपाठ म्हणणारे ब्राह्मण देशावरून कोंकणांत आले. ते कालांतरानें कोंकणस्थांत मिसळून जाऊन त्यांची जात आतां जवळ जवळ नाहींशीच झाली आहे. (९) द्राविड किंवा तैलंग ब्राह्मण कोंकणस्थांत समाविष्ट झाल्याचीं उदाहरणें फारशीं नाहींत; कां कीं, कोंकण फार दूर पडलें आणि कोंकणांतील आर्थिक परिस्थिति अशी नाहीं कीं जी इतर लोकांस तिकडे ओढील. तथापि कांहींतरी लोक येऊन समाविष्ट झाल्याचा संशय आहे. गुहागरचे खरे हे मूळचे द्राविड होते असा थोडाबहुत एका वर्गाच्या दृष्टीनें लोकपवाद त्यांच्याविषयीं आहे. तथापि सामान्य दृष्टीनें त्यांचें घराणें आज तर अस्सल कोंकणस्थांत मोडतें. (१०) पळशे हे पाठारे प्रभूंचे उपाध्याय असून हे आज देशावरील शुक्लयजुर्वेदी ब्राह्मणांशीं विवाहसंबंध करतांना आढळतात. तथापि हे महाराष्ट्रीय नसून गुजराथेकडून आले असावे हें सिद्ध करणारा पुरावा आहे. आज पळशे आणि पाठारे प्रभु यांमध्यें थोडासा मतभेद आहे. पाठारें प्रभूंची जात गुजराथेकडून आली असें कबूल करण्यास पाठारे प्रभूंस बिलकुल दिक्कत वाटत नाहीं. तथापि त्यांच्या उपाध्यायांची पाठारे प्रभू व पळशे हे गुजराथेकडून आले हें कबूल करण्यास थोडीबहुत नाखुषी दिसते. महाराष्ट्रीय ब्राह्मण इतरांत कसे समाविष्ट होतात आणि इतर ब्राह्मण महाराष्ट्रीयांत कसे समाविष्ट होतात हें दाखविण्यास वर दाखविलेलीं उदाहरणें पुरीं आहेत. देशस्थ व कर्‍हाडे, कोंकणस्थ व देशस्थ आणि कोंकणस्थ व कर्‍हाडे यांचे परस्परविवाह तर हिशोबांत घेतां येत नाहींत. रामेश्वर येथें तर कोंकणस्थ, देशस्थ, कर्‍हाडे, द्राविड, तैलंग यांचीं मिश्रणें अनेक कुळांत आहेत आणि बाप ज्या जातीचा असेल ती जात आपली असें मुलगा समजतो. कोंकणस्थांनीं देशस्थ ऋग्वेदी किंवा देशस्थ आपस्तंबाशिवाय चरक शाखेशीं लग्न केल्याचेंहि नागपुरास उदाहरण आहे; मैत्रायणीय शाखा आणि कर्‍हाडे यांच्यामध्यें झालेलीं दोन लग्नें आढळतात. मिश्र विवाहाकडे कर्‍हाडे ब्राह्मणांची प्रवृत्ति फार पूर्वींपासून दिसते आणि महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्याच इतर जातींत लग्न करण्यांत आपण कांहीं सुधारकपणा करीत आहों. असें त्यांस वाटतहि नाहीं. तैलंग कर्‍हाड्याकडे जेवीत नाहींत याचें कारण जो बाळाजी बाजीरावांच्या करकीर्दीमध्यें आपल्या तैलंग जांवयास त्यांनीं विषप्रयोग केला असा त्यांच्यावर आरोप आहे तो खरा असो अगर नसो तथापि कर्‍हाडे आणि तैलंग यांमध्यें लग्न करण्यास हरकत नाहीं असें जुन्या काळींहि वाटत होतें हें खास.

ब्राह्मणेतरांत देखील मिश्र जातिविवाहाचीं पूर्वापार उदाहरणें अनेक आहेत. राजे लोक दुसर्‍या राजाची जात कोणती हा प्रश्न पुढें आणीत नसून वर्ण कोणता हाच प्रश्न पुढें आणीत आणि गोंड आणि रजपूत यांचीं देखील लग्नें झाल्याचीं उदाहरणें थोडींथोडकीं नाहींत. पूर्वबंगालमध्यें कायस्थ आणि वैद्य या दोन जातींचीं एकमेकांशीं लग्नें आज शंभर वर्षें होत आहेत पण पश्चिमबंगालांत तो परिपाठ नाहीं. बंगाल्यांतील ब्राह्मणांचीं आणि कायस्थांचीं कुळें सुधारण्याकरितां प्रत्येक जातीचीं पांच पांच घराणीं बाहेरूनच आणलीं होतीं; आणि त्यांचा परिणाम कायस्थांवर असा झाला कीं, पश्चिमेकडील कायस्थ आपली उच्चता वाढविण्यासाठीं वैद्यांशीं संबंध जुळवून आणण्याची अपेक्षा न करितां कायस्थ पंचककुलाशीं लग्नव्यवहार करूं लागले आणि त्यामुळें पूर्वबंगालमध्यें झालेली सुरवात पश्चिमबंगालमध्यें पसरली नाहीं असें कित्येक म्हणतात. आपल्याकडील मराठे म्हणविणारी जात कशी बनली ही गोष्ट देखील विचार करण्यासारखी आहे. हा विचार केला असतां जातिभेद मोडण्यास कोणकोणत्या गोष्टी कारण होतात तें दृष्टीस पडतें. कुणबी व मराठे या आज दोन जाती नसून दोन निराळे वर्ग आहेत आणि मराठा हा वर्ग उत्तरेकडून आलेलीं रजपूत कुलें, देशांतीलच यदुकुलें आणि नागकुलें मिळून झाला असावा असें दिसतें. दोन कुणबी जाती उदाहरणार्थ तिळोरे किंवा तिळोरी कुणबी, आणि बावणे कुणबी हे त्याच नांवांनीं एकमेकांशीं लग्नें लावीत नाहींत पण मराठा हें नांव धारण करून दोघेहि एकमेकांशीं लग्न लावितात. अभिमानार्ह जें नांव असेल त्या नांवांतच आपला समावेश करून घेण्याची इच्छा स्वाभाविक असते आणि त्यामुळें आपलें जुनें नांव टाकून देऊन जें नांव सर्वसामान्य असेल तें नांव धारण करण्याची प्रवृत्ति दिसते. खानेसुमारीचे आंकडे पाहिले असतां आपणांस असें दिसून येईल कीं, मराठे या नांवाची लोकप्रियता कुणब्यांमध्यें अधिकाअधिक वाढत आहे. मुंबई इलाख्यांत १८९१ आणि १९११ याच्या दरम्यान कुणब्यांची संख्या शेंकडा ४१ नीं कमी झाली आणि मराठ्यांचीं संख्या शेंकडा ५४ नीं वाढली. मध्यप्रांताकडे पाहिलें असतां त्याच वीस वर्षांत कुणब्यांची संख्या शेंकडा ३ नीं कमी झाली आणि मराठ्यांची संख्या शेंकडा ८१ नीं वाढली. यावरून असें दिसतें कीं, वर्‍हाडांत आणि मध्यप्रांतांत मराठे या नांवापेक्षां कुणबी या नांवाचाच प्रचार जास्त आहे, तथापि कुणबी हें नाव सोडून मराठे हें उपपद धारण करणारे लोक मुंबई इलाख्यापेक्षां वर्‍हाड मध्यप्रांतांत जास्त झपाट्यानें वाढत आहेत. कुणबी व मराठे यांचे आंकडे एकत्र केले तर त्या वीस वर्षांत मुंबई इलाख्यांत या जातीची वृद्धि शेंकडा एक या प्रमाणानें झाली आणि वर्‍हाड मध्यप्रांतांत मुळींच झाली नाहीं. असो. महत्त्वाची गोष्ट ही आहे कीं, समाजापुढें विशिष्ट कार्य असलें आणि तें पार पाडण्याच्या बुद्धीनें समाज प्रेरित झाला व त्या समाजामध्यें अनेक लोकांस एकत्र ओढणारें स्थान उत्पन्न झालें म्हणजे त्या समाजास आपलें कार्य पुढें  हांकण्यास अनेक अंतर्गत फेरफार करावे लागतात. लोकांस एके ठिकाणीं ओढील आणि कार्यप्रवृत्त करील असें तत्त्व पुढें आलें म्हणजे लोक एकत्र होतात आणि प्रसंगीं नवीन समाजहि उत्पन्न होतात. युरोपला उपासनासंप्रदायानें सर्व कांहीं दिलें असें म्हणतां येईल. हिंदुस्थानांत संप्रदायांच्या बाहेरच ज्ञान व विचरा इतकीं वाढलीं कीं, संप्रदाय म्हणजे अल्पज्ञ शूद्रांच्या टोळ्या असें पंडितवर्गास वाटे; आणि त्यामुळें त्यांचें वजन समाजावर कधींच पडलें नाहीं.