प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.
भिन्नसमाजसंनिकर्ष.- एक समुच्चय एखाद्या समुच्चयसंघात प्रवेश करितो असें जाणून बुजून क्वचितच होतें. समुच्चयसंघांशीं सादृश्यवृद्धि झाली म्हणजे बाह्यसमुच्चयस्वीकार सुलभ होतो. एकनामधारण ही क्रिया केव्हांतरी क्रमाक्रमानें होते. दोन समजांचा संनिकर्ष झाला असतां दोहोंमध्येंहि रूपांतर होतें तथापि अशा प्रसंगीं कांहीं बाबतींत सारखेपणा वाढलेला असतांहि जर त्याजबरोबर इतर बाबतींत फरक वाढला असेल तर कोणताहि एक समाज वृद्धिंगत झाला असें म्हणतां येत नाहीं. असा एक नियम आहे कीं, दोन शेजारी समाजांमध्यें सादृश्य वाढून लग्नव्यवहार सुरू झाला म्हणजे सामान्यतः मोठा समाज लहान समाजावर आपली छाप टाकतो आणि त्याला आपल्यांत समाविष्ट करून घेतो. परंतु हाहि नियम सार्वत्रिक नाहीं. मोठा समाज आंत अतिशय तुकडे असल्यामुळें अन्यस्वीकारास असमर्थ असेल आणि लहान समाज आपलें सर्व संयुक्त बल एकत्र वापरण्यास समर्थ असेल व या रीतीनें तो एका मोठ्या समाजाच्या सन्निध राहूनहि आपलें मूलस्वरूप कायमच ठेवूं शकेल. असो. आतां कांहीं समाजस्वरूपांतर विषयक विचारांत आपण प्रवेश करूं.