प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

संप्रदाय.- जातींशिवाय जे समुच्चय हिंदुसमाजांत आहेत ते समुच्चय म्हटले म्हणजे संप्रदाय हे होत. संप्रदाय वर्धिष्णु असतात आणि हिंदुसमाजामध्यें ज्या कोणास आज प्रविष्ट व्हावयाचें असेल त्यास जातीचें सदस्यत्व मिळालें नाहीं तरी संप्रदायाचें सदस्यत्व मिळण्यास अडचण पडत नाहीं. आर्यसमाजी मंडळीनें हिंदूंखेरीज इतर लोकांस आपणांमध्यें बरेंच आणलें आहे असें दिसतें. १९०७ पासून १९१० पर्यंत आर्यसमाजांतर्गत रजपूतशुद्धिसभेनें १०५२ मुसुलमान रजपूत समाजप्रविष्ट करून घेतले; आणि एका दिवसांत ३७० रजपूत मुसुलमान आत्मीकृत केले. कांहीं यूरोपीयांसहि आर्यसमाजानें आपल्या संप्रदायांत ओढिलें असें पंजाबचा खानेसुमारीचा अधिकारी ब्लंट म्हणतो. ज्या प्रचारांनीं समाजसंवर्धन होत नाहीं, असे कांहीं हिंदूंच्या मताचे प्रचार होत आहेत त्यांतीलच विवेकानंदाची वेदान्त सोसायटी ही होय.

हिंदुसमाजाचा विस्तार मतांच्या आश्रयानें करावयाचा झाल्यास ब्रह्मसमाज, आर्यसमाज यांसारखे संप्रदाय उत्पन्न केल्याशिवाय आज गत्यंतर नाहीं. तथापि समाजांतील जो मुख्य प्रश्न कीं, बाह्यमनुष्यग्राहकता समाजामध्यें यावी, तो पूर्णपणें सुटणें आज शक्य नाहीं. शिवाय आज असा प्रश्न उपस्थित होतो कीं, जें आपणांस जगास द्यावयाचें आहे असें आपणांपाशींच काय आहे? जो मनुष्य आपल्यामध्यें प्रविष्ट होईल त्यास त्यापासून काय फायदा आहे? हिंदुत्व हा जर पारमार्थिक संप्रदाय नाहीं केवळ सामाजिक संप्रदाय आहे. तर सध्यांच्या आपल्या दुर्बल समाजांत येऊन कोणाचा काय फायदा? शिवाय जर सध्यां आपण आपल्या समाजांतर्गत असलेल्या बर्‍याचशा  जातींस शूद्र म्हणून लेखितों, तर आपण बाहेरून आलेल्या मनुष्यास शूद्रापेक्षां उच्चस्थान कसें देणार व बाहेरच्या मनुष्यास जर शूद्राचें स्थान द्यावयाचें असेल तर बाहेरून येणारा मनुष्य तें पत्करील तरी कसें?

राष्ट्रस्वरूपी समाज आणि संप्रदाय या दोहोंची तुलना झाली. आतां या संप्रदायांचा राजकीय दृष्टीनें विचार केला पाहिजे.

राष्ट्रस्वरूपी जाती आणि संप्रदाय यांमध्यें संप्रदाय हे उत्तरकालीन होत. जेव्हां समाजाचें अस्तित्व अगोदरच हयात असलेल्या राष्ट्रानें रक्षिलें असेल तेव्हांच संप्रदाय आंत उत्पन्न होणार.

संप्रदाय हे नवीन देव निर्माण करून किंवा स्थापित करून उपासनेच्या नवीन पद्धति आणून, नवे विधी, नवे संस्कार, नव्या चालीरीती, नवीन भोजनप्रसंग आणि नवीन अनध्याय दिवस निर्माण करून, माणसांमाणसांमध्यें निराळेपणा उत्पन्न करून राष्ट्रांतर्गत जनतेचे तुकडे पाडितात. हें संप्रदायांचें स्वरूप अर्थात् समाजाच्या स्वास्थ्यास बरेंच घातुक होतें. एखाद्या राष्ट्रांतील सर्व लोक एकाच संप्रदायाचे सदस्य नसल्यास हे संप्रदाय त्या राष्ट्रांत विनाकारण भांडणें व मारामार्‍या निर्माण करितात. एखाद्या राष्ट्रांतील सर्व माणसें एका संप्रदायाचीं सदस्य असलीं आणि तो संप्रदाय इतर शेजारच्या राष्ट्रांत जर आपल्या उपास्याचा किंवा मताचा प्रसार करूं लागला तर तो त्यांस घातुक होतो. कारण शेजारच्या राष्ट्रांतील बराचसा वर्ग संप्रदायांतर्गत राष्ट्राशीं सदृश होतो आणि इतर जनतेहून भिन्न होतो म्हणजे या शेजारच्या राष्ट्रांतील संप्रदायांतर्गत वर्गाची सहानुभूति परक्याकडे वळते आणि स्वजनांपासून विभक्त होते. मनुष्यमात्राच्या हिताच्या दृष्टीनें असें झालें पाहिजे कीं, संप्रदायांचा पगडा लोकांवर कमी व्हावा आणि हें संप्रदायविशिष्ट बंधुत्व अस्तित्वांतून जावें. समाजघटना जी करावयाची ती राजकीय किंवा स्थानविषयक तत्त्वांवर न घडवितां ईश्वराचें कोण कसें पूजन करितो यावर बनवावयाची ही पद्धति वेडगळ आहे आणि यासाठीं या संप्रदायाला समाजघटनेशीं फारसा खेळखंडोबा करण्यास अवधि नसावा. लोकांनीं संप्रदाय वाटल्यास उत्पन्न करावे किंवा वाटेल तितके दिवस चालवावे तथापि त्यांचें कार्यक्षेत्र उपासनेपुरतेंच असावें आणि त्यांस आपलें क्षेत्र सोडून बाहेर इतर गोष्टी करण्याची संधि मिळूं नये.

हिंदुस्थान हें निरनिराळ्या बाह्य संप्रदायांनीं अनुयायी मिळविण्यासाठीं उडी घेतलेलें रणक्षेत्र आहे. प्रत्येक संप्रदाय जितके अधिक अनुयायी मिळतील तितके पहात आहे, तथापि कोणत्याहि संप्रदायास आपला प्रसार फारसा करण्यास अवकाश नाहीं. निदान राष्ट्राचें एकत्व संप्रदायामार्फत स्थापणें शक्य नाहीं. त्या तर्‍हेचे जो कोणी प्रयत्‍न करील तो देशामध्यें अधिकाधिक द्वेषबुद्धि माजविण्यास मात्र कारण होईल.

संप्रदायविशिष्ट बंधुत्व उत्तेजित करणें हें केवळ हिंदुस्थानासच नुकसानीचें नाहीं तर तें सर्व जगासच नुकसानकारक आहे. सर्व जगाची अशी प्रवृत्ति दिसते कीं, ईश्वरविषयक मतांवरून समाजघटना बनवावी हें इष्ट नाहीं. आपली बंधुभावना विशिष्टा उपास्यानुसारी लोकांपुरतीच नसावी तर तिचें क्षेत्र अधिक विस्तृत असावें. या प्रवृत्तीमुळें संप्रदायांचा पराभव शेवटीं ठरलेलाच आहे. संप्रदायविशिष्ट भावना उत्पन्न करण्याकरितां ख्रिस्ती लोकांमध्यें जी शासनसंस्था उर्फ ‘चर्च’ आहे त्या शासनसंस्थेच्या उद्देशांत सुधारणा झाली पाहिजे, नाहीं तर या संप्रदायशासनसंस्थेचा जनतेकडून त्याग होईल. ज्या कर्मांचें व आचारांचें नियमन चर्चकडून होतें त्यांपैकीं बर्‍याच कमी गोष्टींचें नियमन पुढें चर्चकडून होईल. मनुष्याच्या अनेक व्यावहारिक गोष्टींवर जर उपासनांचे आचार्य ताबा चालविण्याचा प्रयत्‍न करूं लागले तर त्यांचें कोणी ऐकणार नाहीं. कालांतरानें असें होईल कीं, संप्रदायाशिवाय इतर साधनांनीं जगामध्यें जी बौद्धिक आणि नैतिक परंपरा उत्पन्न होते ती वाढत जाऊन केवळ उपासनासंप्रदायामुळें जी परंपरा उत्पन्न झाली तिचें महत्त्व जगांत कमी होत जाईल. जर सुशिक्षित हिंदूंचें जगभर प्रयाण होईल तर संप्रदायसंस्थेचें महत्त्व अधिकाधिक कमी होईल. कां कीं, उपासनाविचार आणि जातिसमुच्चय यांचा अर्थाअर्थीं संबंध नाहीं ही गोष्ट लोकांस अधिक पटेल, आणि उपासनामूलक शासनसंस्थाशिवाय नैतिक कल्पनांनीं मनुष्य वागूं शकतो हें त्यांस कळून येईल.