रचना परिचय 

रचनापरिचय करुन देण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांमध्ये शरीरखंड आणि प्रस्तावनाखंड यांचा परस्पर संबंध, अनुक्रमपद्धति, यांस प्रामुख्य येतें.

याशिवाय जे लेख त्यांतील नवीन शास्त्रीय संज्ञांशी एकदम संबंध आल्यामुळे दुर्बोध होतात त्यांच्या संज्ञापद्धतीशी कांहीं तरी परिचायक मजकूर देणें अवश्य होतें. नाही, तर ते वगळले असते तरी हरकत नाहीं असें वाचकांस वाटावयास लागेल. शास्त्रीय विषयावरील लेखांच्या ध्येयांत भाषाविकासास प्राधान्य देतां न सहजावगमनास दिलें पाहिजे. या विभागांत जे शास्त्रीय लेख आहेत, त्यांपैकीं रसायनशास्त्र खेरीज करुन इतर लेखांतील देश्य संज्ञा सहज समजण्यास आडव्या येणार नाहींत. म्हणून रसायन शास्त्राच्या संज्ञांविषयी अधिक सविस्तर स्पष्टीकरण पाहिजे व तें पुढें येईल.

शरीरखंड - ज्ञानकोशाची दोन खंडे आहेत, तीं प्रस्तावनाखंड व शरीरखंड हीं होत. प्रस्तावनाखंडांत जगांतील प्रमुख लोकसमाजांची सांस्कृतिक दृष्ट्या स्थूल माहिती देण्याचा,  भारतीयांची सांस्कृतिक माहिती बरीच सविस्तर देण्याचा व त्याशिवाय शास्त्रीय ज्ञानाच्या वाढीचा अल्पत्वानें पण अनेक अंगांनी इतिहास देण्याचा प्रयत्‍न केला आहे. पहिल्या “हिदुंस्थान व जग” या विभागांत राजकीय, धार्मिक व सामाजिक वगैरे बाबतींत कशा प्रकारची स्पर्धा व कितपत सहकार्य़ आणि अन्योन्याश्रय आहे, हें व हिंदु संस्कृतीचा प्रसार व हिंदुसमाजाची घटना व तिचें व ती बरोबर समाजाचें भवितव्य हीं दाखविलीं आहेत. दुसर्‍या “वेदविद्या” विभागांत प्राचीन वैदिक ग्रंथाची व यज्ञसंस्थेची माहिती देऊन तो विभाग सामाजीक आणि वैज्ञाणिक इतिहासाला म्हणजे तिसर्‍या आणि पांचव्या भागाला उपोद्धातरुपी केला आहे. तिसर्‍या म्हणजे “बुद्धपूर्व जग” या विभागांत विश्र्वोत्पत्तीपासून बुद्धजन्मापंर्यतच्या काळांतील पृथ्वीवरील प्रमुख प्राचीन राष्ट्रांची माहिती दिली आहे, आणि चवथ्या “बुद्धोत्तर जग” या विभागांत ख्रिस्तपूर्व ५०० पासून चालू काळापर्यतच्या राजकीय व वैचारिक व पारमार्धिक घडामोडींचा इतिहास दिला आहे. पांचव्या “विज्ञानोतिहास” या विभागांत अनेक प्राचीन व अर्वाचीन शास्त्रांच्या वाढीचा थोडक्यांत इतिहास दिला आहे.

शरीरखंडांत म्हणजे मुख्य कोशामध्यें केवळ शब्दांचे अर्थ दिले नाहींत. तर जे शब्द लेखविषय होऊं शकतील असे महत्त्वाचे शब्द व विषय घेऊन त्यांची माहिती सविस्तर देण्याचा प्रयत्‍न केला आहे. मोठाले शास्त्रीय, विषय एका सदराखालीं न देतां त्यांतील मुख्य मुख्य पोटविभाग व त्यांतील महत्त्वाच्या प्रश्नांवर निरनिराळे स्वतंत्र लेख दिले आहेत. उदाहरणार्थ वैद्यकाची माहिती शारीरशास्त्र. इंद्रियविज्ञान यासारखीं शास्त्रें व मुख्य मु्ख्य रोग वगैरेच्या नांवाखाली, दिली आहे. अर्थशास्त्राची मांडणी “अर्थशास्त्र” म्हणून सर्व सामान्य लेख देऊन “आंकडेशास्त्र”  “उत्पादन”  “राष्ट्रीयकर्ज” “संरक्षक पद्धति व खुला व्यापार” ,  “चलनपद्धति” “करव्यवस्था”  “राष्ट्रीय जमाखर्च”, वगैरे निरनिराळ्या सदरांखाली दिली आहे. शरीर खंडात येणार्‍या एकंदर विषयांसबधाने सामान्य कल्पना प्रस्तुत विभागावरुन आणि विशेषत:, सोबत जोडलेल्या, प्रस्तुत विभागात आलेल्या एकंदर विषयांच्या वर्गिकरणावरुन येईल. प्रस्तावनाखंड जगाचा व्यापक सांस्कृतिक इतिहास देण्याच्या दृष्टीनें तयार केला आहे, तर शरीरखंड विशिष्ट विषयांचे थोडक्यांत सोपपत्तिक ज्ञान संकलित करुन देण्याच्या दृष्टीनें तयार केला आहे. तथापि द्विरुक्ति टाळण्याकरीतां शरीर खंडातील विवेचनांत प्रस्तावनाखंडांत येऊन गेलेला मजकूर पुन्हा न देतां त्या खंडांतील स्थल दाखवून सूचित केला आहे.

अनुक्रमविषयक पद्धति - ही आम्ही अलीकडील संस्कृत शब्दकोशकारांपेक्षा निराळी ठेविली आहे. प्राचीन शब्द कोशकार हे अक्षरानुक्रमानें ग्रंथरचना करीत नसत. अक्षरक्रम कसा असावा याविषयीं शास्त्रसिद्ध नियम कोणतेच नाहींत त्यामुळें वाचकांस संवय कशी आहे, आणि त्यांस सोयीचे काय जाईल हेंच मुख्य रचनातत्त्व होय. या दृष्टीनें आम्ही उपयोगांत आणलेलीं रचनातत्त्वें येणेंप्रमाणें-

अक्षरानुक्रम - अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः; क, ख, ग, घ, ङ; च, छ, ज, झ, ञ; ट, ठ, ड, ढ, ण; त, थ, द, ध, न; प, फ, ब, भ, म; य, र, ल, व, श;  ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ; असा ठेवला आहे. म्हणजे अं, क्ष, ज्ञ, यांस मराठी वाचकांस सोईस्कर जाईल असेंच स्थान ठेविलें आहे.

अनुस्वारांपुढें कोणतेंहि व्यंजन आलें व अगोदर व्यंजन विरहीत अ नसला तर तें शब्द अनुस्वाराच्या पुढील अक्षराप्रमाणें लावणें. म्हणजे अनुस्वार नाहीं अशी कल्पना करुन त्या शब्दास स्थान दिलें आहे आणि निरनुनासिक व सानुनासिक असे दोन शब्द जवळ येतील तेव्हां निरनुनासिक प्रथम घेतला आहे. व्यंजनविरहित अं आला म्हणजे मात्र तो औच्या पुढें घातला आहे “क्ष” आणि “ज्ञ” हीं अक्षरें स्वतंत्र धरली आहेत व ह आणि ळ यांच्या नंतर घेतलीं आहेत.

अर्धानुस्वार, पूर्णानुनासिकाच्या अगोदर घेतला आहे. विसर्गाविषयीं नियम हाच कीं तो नाहीं असें धरुन रचना केला आहे व विसर्गयुक्त शब्दाचें स्थान तशाच विसर्ग विरहित शब्दांनंतर ठरविलें आहे. अनुस्वार आणि विसर्ग यांत अनुस्वारास अग्रगामित्व दिलें आहे. “अ‍ॅ” “ऑ”  हीं “अ” व “आ” सारखी धरलीं आहेत मात्र त्यांचे स्थान अनुस्वार व विसर्ग यांच्या नंतर ठरविलें आहे. 
--------------------------------

विभागांतर्गत ग्रंथनामसंक्षेपाचें स्पष्टीकरण.

 अ. ओ. सो. नि. का. पु.   अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचें नियतकालिक पुस्तक.
 अ. को.   अर्वाचन कोश.
 इं. अँ.   इंडियन अँटिक्वरि.
 इं. गॅ. किंवा ग्या.   इंपीरियल गॅझेटियर.
 इं. गाइड   इंडियन गाइड.
 ए. इं.   एपिग्राफिया इंडिका
 एन. जी. जी. डब्ल्यू.   नाखूरिख्टन फॉन डेर कनिख लिखेन गेझेलशाफ्ट डेर विसनशाफ्टेन त्सु गटिंगेन.
 ए. व्रि.    एनसायक्लोपीडिया व्रिटानिका.
 ए. रि. ए.   एनसायक्लोपीडिया ऑफ रिलीजन अँड एथिक्स.
 एस. डब्ल्यू. ए.   झित्झुंग्स्बेरिख्टे डेर वीनेर अ‍ॅकाडेमी डेर विसनशाफ्टेन
 एस. बी. ए.   झित्झुंगबेरिख्टे डेर बर्लिना अकाडेमीडेर विसनशाफ्टेन.
 ऐ. ब्रा.   ऐतरेय ब्राह्मण.
 ऐ. ले. सं.   ऐतिहासिक लेख संग्रह.
 कॅट. कॅट.   कॅटलोगस कॅटलोगोरम.
 कविच.   कविचरित्र.
 कात्या.   कात्यायन श्रौतसूत्र.
 कौशि. किंवा कौ. सू.    कौशिकसूत्र.
 गो. ब्रा.   गोपथ ब्राह्मण.
 गॅ. किंवा ग्या.   गॅझेटियर.
 ज. अ. ओ. सो. ग्रं.   जर्नल ऑफ दि अमेरिकन ओरिएंटल सोसायटी, ग्रंथ. 
 जी. जी. ए.   गटिंग गेलेर्ट अन्त्सायगन.
 जे. आर. एस.   जर्नल ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड.
 जे. ए. एस. बी   जर्नल ऑफ दि रॉयल एशिआटिक सोसायटी ऑफ बेंगाल.
 जे. पी. टी. एस.   जर्नल ऑफ दि पाली टेक्स्ट सोसायटी.
 जै. अश्वमेध.   जैमिनीय अश्वमेध.
 झेड. डी. एम. जी.   त्साइटश्रिफ्ट डेर डॉएट्श्चेन मॉर्गनलेंडिशेन गेझेलशाफ्ट.
 टॉ.   टॉड.
 डब्ल्यू. झेड. के. एम.   वीना त्साइटश्विफ्ट फ्यूर डी कुंड डेस मॉर्गन लांडेस.
 डि. गॅ.   डिस्ट्रिक्ट गॅझेटियर.
 तै. सं.   तैत्तिरीय संहिता.
 प्रा. को.    प्राचीन कोश.
 बाँ. गॅ. किंवा ग्या.   बाँबे गॅझेटियर.
 बाँ. ब्रँ. रॉ. ए. सो. ज.   बाँबे ब्रँच रॉयल एशिआटिक सोसायटीज जर्नल.
 बे. गॅ.   बेळगांव गॅझेटियर.
 भ   भरत नाट्यशास्त्र.
 भा.   भावप्रकाश
 भा. इ. सं. मं.   भारत इतिहास संशोधक मंडळ.
 भाग. दश.   भागवत दशमस्कंध,
 भार.   भारत = महाभारत.
 म. प्रां. ग्या.   मध्यप्रांत गॅझेटियर.
 म. भा. किंवा महा.   महाभारत.
 मा.   माधवनिदान.
 मुं. गॅ.   मुंबई (बाँबे) गॅझेटियर.
 मु. रि.   मुसलमानी रियासत.
 रा. खं   राजवाडे खंड.
 वनौ.   वनौषधिगुणादर्श.
 वा.   वाग्भट.
 वा. रा.   वाल्मीकि रामायण.
 विनय.   विनयपिटक.
 वि. विस्तार   विविधज्ञानविस्तार.
 वै. सू.   वैतानसूत्र.
 श. ब्रा.    शतपथब्राह्मण.
 श्रौ. सू   श्रौतसूत्र.
 सं. क. का. सू.   संतकविकाव्यसूचि.
 सा. द.   साहित्यदर्पण.
 सु.   सुश्रुत.
 सेंद्रि. र. पू. भा.   सेंद्रीय रसायनशास्त्र पूर्वभाग.
 हिं. वै, को,   हिंदी वैज्ञानिक कोश.
  कित्येक प्रसंगी संक्षेपांतील विरामचिन्हें गाळली आहेत.