विभाग अकरावा : काव्य - खतें    
    
केरल— हा देश फार प्राचीन आहे. महाभारतांत भीष्मपर्व (अ. ९) व सभापर्व (अ. ३१) यांमध्यें हा देश दक्षिणापथांत किष्किंधेच्या दक्षिणेस असल्याचें म्हटलें आहे. भागवतांत दहाव्या स्कंधांत याचा उल्लेख येतो, (अ. १३, १९, ७९, ८२). बृहतसंहितेमध्येंहि याचा नामनिर्देश आढळतो (१६.२). अशोकाच्या लेखांत केरलपुत्र म्हणून लहानदेशवाचक असें नांव येतें. हें छोटें राज्य पुढें पाण्ड्यराज्यांत सामील झालें. हें राज्य मलबार किनार्‍यावर असून तामीळभाषा बोलणारें होते. हें बहुतेक पश्चिमघांटाच्या म्हणजे सह्याद्रीच्या आसपास होतें. याच्या उत्तरेस मंगलोर व त्याच्याजवळ जिचें मुख आहे अशी चंद्रगिरी नदी होती व दक्षिणेस थेट कन्याकुमारी असून, पश्चिमेस अऱबी समुद्र होता. समुद्रगुप्तानें जिंकलेल्या दक्षिणेकडील राजांमध्यें केरळ राजाचें नांव आहे. या देशालाच पुढें चेर देश म्हणूं लागले. अशोकानें दक्षिणेंतील ज्या पांच राज्यांच्या दरबारीं आपले वकील ठेविले होते त्यातं केरल राजाचा समावेश होता. दुसर्‍या शतकांतील एका केरल राजानें-याची राजधानी हल्लीचें क्रांगनोर ही होती- गंगाकाठीं कांहीं राजांचा पराभव केल्याचा उल्लेख आढळतो. चोल, पाण्ड्य, व हे केरल उर्फ चेर यांचे नेहमी आपापसांत झगडे चालत. दुसर्‍या शतकांत, चोलानंतर हे केरल प्रबळ झाले. कांचीकर पल्लवांनीं तिसर्‍या शतकांत यांचा कांहीं प्रांत काबीज केला होता. परांतक चोल (पहिला) यानें इ.स. ९३० च्या सुमारास केरल राजाशीं शरीरसंबंध करून आपली सरहद्द केरल देशापर्यंत भिडविली होती. परंतु पुढें राजराज चोलानें (इ.स. ९८५) केरलावर स्वार्‍या केल्या आणि वीरराजेंद्र चोलानें तर उलगई येथें केरल राजाचा पराभव केला. परंतु पुढें जेव्हा चोल साम्राज्य मोडलें तेव्हां तें मोडण्यास कारणीभूत होणार्‍या राजांत पाण्ड्य, काकतीय यांच्याबरोबरच केरळ राजांचाहि समावेश होता. या देशाबद्दल जास्त माहिती चेर या नांवाखालीं आढळेल. [अय्यर- एन्शन्ट इंडिया; बृहत्संहिता; गुप्‍त इन्स्क्रिप्शन्स; महाभारत; भागवत; स्मिथ- ऑक्स. हिस्टरी ऑफ इंडिया].