विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जहानाबाद, पोट विभाग :- हा बंगाल प्रांतांत गय जिल्हयांतील पोटविभाग आहे. येथील लोकसंख्या सुमारें चार लाख आहे. हया भागांतील जमीन मोठी सुपीक असून येथें पुष्कळ नद्या असल्यामुळें शेती उत्तम पिकते हया विभागांत जहानाबाद शहर मुख्य असून १०७८ गांवें आहेत. पुराणवस्तुसंशोधनास उपयोगी अशा पुष्कळ वस्तू येथें सांपडतात.

गांव :- हें शहर मोरहर नदीच्या कांठीं असून येथील लो. सं. सात हजारांवर आहे. अठराव्या शतकांत हें शहर कापडाबद्दल प्रख्यात होतें. त्यावेळीं ७०० कोष्टयांचीं घरें व हजारों माग असत. पुढें मँचेस्टरच्या स्वस्त मालापुढें निभाव न लागून हा धंदा बसला. सध्या हा धंदा किंचित् जीव धरून आहे.