प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

ग्रंथप्रवेश.

सर्व विद्यांचा उगम वेद होत हें विधान इतकें खरें व सर्वमान्य आहे कीं त्यावर अधिक लिहिणें नकोच.

कुरूयुद्धाच्या सुमारास जेव्हां सर्व ज्ञानाचें एकीकरण करण्याचा निकराचा प्रयत्‍न झाला, तेव्हां यज्ञसंस्थेस साहाय्यक अशा सर्व प्रकारच्या ऋत्विजांच्या ज्ञानाचें एकीकरण झालें आणि वेदचतुष्टयाचें अर्वाचीन स्वरूप निर्माण झालें. त्या सुमारास कांहीं प्राचीन ज्ञान इतिहासपुराणें या नांवानें अस्तित्वांत होतें, तें वेदचतुष्टयाबाहेर राहिलें व पुढें स्वतंत्रपणें वाढत गेलें. वैदिक वाङ्मयाचा इतिहास लिहिणें म्हणजे अत्यंत प्राचीन ज्ञानकोशकारांच्या प्रयत्‍नाचें स्पष्टीकरण करणें होय.

संहिताकार वैदिक वाङ्मय जमा करूं लागले तेव्हां त्याचा अनेक तर्‍हांनीं अभ्यास सुरू झाला. प्राचीन वेदाभ्यास करणा-यांचे प्रयत्‍न अनेक दिशांनीं झाले आहेत. संहितापाठ, पदपाठ, ब्राह्मणें, आरण्यकें, उपनिषदें व शिक्षाकल्पादि षडंगें हीं व त्याप्रमाणेंच बृहदेवता, सर्वानुक्रमणी, प्रातिशाख्य, निरूक्त यांसारखे ग्रंथ प्राचीन अभ्यासाचें फल होत. वैदिक ग्रंथ पाठ करणें, वैदिक ग्रंथानुषंगानें जीं शास्त्रें तयार होत असत तीं शिकणें, वेदग्रंथांचा क्रियांकरितां उपयोग व तसाच वेदग्रंथांचा अर्थ हीं समजून घेणें, ही वेदाभ्यासाची प्राचीन पद्धति होय. प्राचीन पद्धतीनें एकच प्रकारचे लोक तयार होत नसत. कोणी श्रौती होई तर कोणी शास्त्री होई. दोन्ही वर्गांस एकमेकांची गरज होती.

वेदाभ्यासास महत्त्व यज्ञसंस्थेनें उत्पन्न केलें. यज्ञसंस्थेच्या दौर्बल्याबरोबर वेदाभ्यासासहि दौर्बल्य उत्पन्न झालें. आज वेदाभ्यासास जें महत्त्व आहे तें वेद प्राचीन इतिहासाचें साधन होत म्हणून आहे. यज्ञसंस्थेनें आपलें कार्य जें वेदसंरक्षण तें आतांपर्यंत केलें. यज्ञसंस्था ऐतिहासिक पंडितांच्या हातीं आज आपलें धन देत आहे. हें धन घेतांना घ्यावयाच्या द्रव्याची मोजदाद करणें अवश्य आहे, व मिळवत्यानें प्रत्येक चीज कोणत्या उपयोगासाठीं मिळविली हें जाणणेंहि अवश्य आहे. यासाठीं वेदाभ्यास आपणांस यज्ञसंस्थेच्या अभ्यासाबरोबर केला पाहिजे.

वेदविद्येवर लिहितांना यज्ञसंस्थेवर व तदंतर्गत ऋत्विजांच्या विशिष्टीकरणावर व यज्ञावयवविकासावर जें पुष्कळ विवेचन केलें आहे त्याचें प्रयोजन ग्रंथ वाचतांना स्पष्ट होईल. यज्ञसंस्था वाढूं लागली, ऋत्विजांनां आपलें काम सजवावें लागलें त्यामुळें वाङ्मय जमा झालें;  आणि त्यामुळें पुढें शास्त्रें तयार झालीं, आणि भारतीय ज्ञानसंवर्धनास व अंशरूपानें जगाच्या ज्ञानसंचयास खरा प्रारंभ झाला. ज्ञानेतिहास या दृष्टीनें व भारतीय समाजाच्या इतिहासाच्या दृष्टीनें या भागांत आलेल्या, प्रसंगीं कंटाळवाण्या वाटणार्‍या, माहितीस महत्त्व आहे.

प्रस्तावनाखंडाच्या पहिल्या भागांत हिदुस्तानाच्या इतिहासाचे विभाग भाषेस असलेल्या महत्त्वाच्या किंवा तीस कमी अगर अधिक झालेल्या विकारांच्या दृष्टीनें पहावे हें तत्त्व सांगितलें आहे, व मूलगृहकाल म्हणजे यूरोपीय व भारतीय यांच्या सामान्य पूर्वजांचा भाषादृष्टीनें ठरविलेला काल, पर्शुभारतीयकाल म्हणजे इराणांतील व हिंदुस्थानांतील लोकांच्या सामान्य पूर्वजांचा काल व वेदकाल असे तीन प्राचीन काल उल्लेखिलेले आहेत. यांपैकीं तिसर्‍या कालावर जितका प्रकाश अधिक पाडतां येईल तितका पाडून मग वाचकाचा प्रवेश मूलगृहकालांत व पर्शुभारतीय कालांत करून द्यावयाचा ही सामान्य ग्रंथयोजना आहे, व त्यामुळें दुसर्‍या भागांत वेद, ब्रह्मणें, आरण्यकें व उपनिषदें यांचें स्थूल वर्णन व या वाङ्मयाच्या उत्पत्तीस व रक्षणास कारण झालेली यज्ञसंस्था व यज्ञसंस्थेच्या अनुषंगानें दैवतेतिहास एवढाच मजकूर आलेला आहे. यज्ञसंस्था स्पष्ट करतांना श्रौतसूत्रांकडेहि लक्ष दिलेलें आहे. तसेंच यज्ञसंस्थेच्या इतिहासावर प्रकाश पाडण्यासाठीं कृष्णयजुर्वेद व अथर्ववेद यांतील अध्वर्यू व अथर्वे यांस सामान्य असलेलें वाङ्मय शोधून एका परिशिष्टांत घातलें आहे. तसेंच ज्या कालामध्यें शाकलसंहितेव्यतिरिक्त दुसरी एक संहिता होती त्या कालाची माहिती भावी संशोधकास व्हावी या हेतूनें शाकलसंहिता, ऐतरेय ब्राह्मण, आश्वलायन श्रौतसूत्र, कौषीतकी ब्राह्मण व शांखायन श्रौतसूत्र यांचा तौलनिक अभ्यास दिलेला आहे. तौलनिक अभ्यासानंतर ऐतिहासिक ज्ञानाची निष्पत्ति व्हावयाची. ऐतिहासिक निर्णय काय काढावयाचे हें भावी संशोधकांचें काम आहे. त्यांच्या अभ्यासास प्रारंभ म्हणून आमचीं हीं कोष्टकें उपयोगीं पडतील. अथर्ववेद व आश्वलायन गृह्यसूत्र याचेंहि एक कोष्टक दिलें आहे. श्रौतविद्या म्हणजे तीन अग्रींवरील कर्मांसंबंधाची विद्या याला अथर्ववेद हा बराच अपवाद आहे त्याचें गृह्याशीं नातें त्या कोष्टकावरून दिसून येईल.

वैदिक वाङ्मयाचा ऐतिहासिक दृष्टीनें अभ्यास करणारे संशोधक बहुतेक पाश्चात्त्यच आहेत. वेदांचे अर्वाचीन दृष्टीचे भारतीय अभ्यासक म्हटले म्हणजे राजेंद्रलाल मित्र, शंकर पाण्डुरंग पंडित, राजाराम रामकृष्ण भागवत, बाळ गंगाधर टिळक व महादेव मोरेश्वर कुंटे हे हेत. हे सर्व संस्कृत पंडित आज गतकालीन झाले आहेत. सध्यांच्या संस्कृत पंडितांपैकीं डॉ. भांडारकारांचा परिश्रम वेदोत्तर कालावर आहे, व रा. ब. चिंतामणराव वैद्य हे देखील वेदोत्तरकालीन वाङ्मयाचाच अभ्यास करीत आहेत. रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनीं अलीकडे संस्कृत भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाकडे लक्ष दिलें असून त्यामुळें  ते वेदावर परिश्रम करीत आहेत.

येथील व पश्चिमेकडील पंडितांचे अभ्यास प्रत्येक वर्गाच्या अडचणींमुळें अपूर्ण आहेत. पाश्चात्त्य अभ्यास तौलनिक स्वरूपाचा असल्यामुळें आणि पाश्चात्त्य पंडितांस लाटिन, ग्रीक इत्यादि भाषांचें ज्ञान सहजच असल्यामुळें त्यांनां तसला अभ्यास करण्यास कांहीं मदत झाली. आपल्याकडील संस्कृत पंडितांस पाश्चात्यांच्या प्राचीन भाषाचें ज्ञान नसल्यामुळें तौलनिक अभ्यासांत शिरतां आलें नाहीं. वैदिक वाङ्मयाचा भारतीय इतिहासाच्या दृष्टीनें अभ्यास करावयास  यज्ञशास्त्राची माहिती उत्तम असावी लागते ती नसल्यामुळें पाश्चात्त्य संशोधक चांगलेसे यशस्वी झाले नाहींत. वैदिक अभ्यासास उपांगें फार आहेत. त्यांपैकीं बर्‍याचशा उपांगांची माहिती या आणि नंतरच्या भागांत येईलच. गेल्या पिढींत श्रोतविद्यायुक्त वेदाभ्यास करणारांमध्यें काशिनाथ वामन उर्फ भाऊशास्त्री लेले हे प्रमुख होत पण यांच्या अभ्यासाचें फल फारसें शिल्लक राहिलें नाहीं. ज्यांची माहिती फारशी देतां येणार नाहीं अशीं उपांगेंहि अनेक आहेत. उदाहरणार्थ, वैदिक व्याकरण घ्या. ऋग्वेदमंत्रांत आढळणारीं रूपें घेऊन त्यांत कालानुक्रम निघेल काय, निघाल्यास त्याच्या साहाय्यानें मंत्रभागाचा कालक्रम लावतां येईल काय, या प्रकारचा अभ्यास आर्नोल्ड व इतर पंडितांनीं केला आहे. ब्लूमफील्ड वेदांतील पुनरूक्त्यांचा अभ्यास करून त्यांच्यावरून काय इतिहासनिष्पत्ति होते हें पहात आहेत. या दोन्ही प्रकारच्या अभ्यासाचें महत्व दिसून येण्यापुरतें यांच्या परिश्रमास खास फल आलेलें आहे. तथापि या परिश्रमाच्या योगानें प्राचीन भाषेच्या व ग्रंथकर्तृत्वाच्या आपल्या ज्ञानांत आपलें पाऊल निश्चितपणें पुढें पडलें असें आज म्हणवत नाहीं.

वैदिक वाङ्मय आणि पौराणिक वाङ्मय यांचा ऐतिहासिक अभ्यास अजून थोडाबहूत पृथक् होतो. तो तसा इत:पर न व्हावा. वैदिक पांडित्य इतिहासपूराणांतील माहितीशिवाय दुर्बल आहे आणि इतिहासपुराणांचा अभ्यासहि वेदाभ्यासाशिवाय पंगु आहे. वैदिक वाङ्मय आणि पौराणिक कथांचा जन्म हा फारसा भिन्नकालीन नाहीं. एका वाङ्मयांत एका अत्यंत प्राचीन कालाची भाषा जर राहिली असली तर दुसर्‍या वाङ्मयांत तत्कालीन कथा राहिल्या आहेत.

वेदकालाचा अभ्यास आपणांकडून फार सूक्ष्म रीतीनें व्हावयास पाहिजे. जें वेदकालांत होतें व आज आहे तें चंद्रगुप्ताच्या कालीं होतें असें सिद्ध केल्यानें इतिहासज्ञान फारसें वाढत नाहीं. संस्कृतीच्या इतिहासासाठीं वैदिक वाङ्मय हें आधुनिक काल आणि अज्ञात काल यांतील एक महत्त्वाचा दुवा आहे. यासाठीं वेदवाक्यें व वैदिक शब्द यांचे पृथक्करण करून जी इतिहासज्ञाननिष्पत्ति करावयाची ती ज्ञानकोशमंडळानें बरीच केली आहे. तिचें फल पुढील भागांत दिलें जाईल. वेदाभ्यासोपयोगी ग्रंथांची माहितीहि पुढील भागांत दिली जाईल.

हा भाग तयार करतांना ज्ञानकोशमंडळांतील ज्या लेखकांचें साहाय्य झालें त्यांत विशेष निर्देश वे. शा. सं. धुंडिराज गणेश बापट व हौत्रवेत्ते वे. रा. चिंतामणभट्ट दातार यांचा केला पाहिजे. धुंडिराजदीक्षित यांनीं आजपर्यंत पंधराहून अधइक यज्ञांत ऋत्विजाचें काम केलें आहे. श्रोतकर्मांत इतक्या अनुभवाचा मनुष्य महाराष्ट्रांतच काय पण इतरत्र देखील सांपडणें कठिण आहे. हौत्रवेत्ते दातार हे महाराष्ट्रांतील फारच थोड्या होत्यांपैकीं एक आहेत. हे दोघेहि जुन्या शिक्षणाचे असून म्हणजे शब्दाचें नित्यत्व पढले असून वेदांचा व श्रोतविद्येचा ऐतिहासिक दृष्टीनें अभ्यास करण्यांत व यज्ञसंस्थेचें स्वरूप प्रथमपासून संपादकास समजावून देण्यास आणि ऐतिहासिक विवेचनास साहाय्यक असे उतारे शोधून काढण्यांत यांनीं चांगलीच मेहनत केली. रा. रा. सर्वोत्तम वासुदेव देशपांडे यांचा ग्रंथसंक्षेप व त्यांचे मुद्रणशुद्धीकडे असलेलें तीव्र लक्ष यांनीं ग्रंथाची उपयुक्तता वाढविली आहे. भाषांतरें करणें, उतारे तपासणें, प्रुफें तपासणें इत्यादि कामामध्ये रा. रा. यशवंत रामकृष्ण दाते, रा. रा. पांडुरंग महादेव बापट, सौ. शीलवती केतकर, रा. चिंतामण गणेश कर्वे, रा. लक्ष्मण केशव भावे, रा. कृष्ण महादेव चिपळुणकर इत्यादि लेखकांचा परिश्रम विसरतां येण्याजोगा नाहीं.

श्रीधर व्यंकटेश केतकर.