पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ९ वें
आरोग्य

हिंदुस्थानांतील आरोग्यखात्याचा इतिहास गेल्या पन्नास वर्षाचा आहे. या अवधींत शहरांच्या आरोग्यविषयक स्थितींत बरीच सुधारणा झाली आहे. पण लोकसंख्येपैकीं मोठा भाग खेडेगांवांत राहतो व खेडेगांवाचें आरोग्य सुधारण्याचें काम फारच मंदपणें चाललें आहे. खेडेगांवांतहि लोकांची राहणी बरीच स्वच्छतेची असते पण सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य यासंबंधी जाणीव त्यांच्यामध्यें उत्पन्न झालेली नाहीं. खेडेगांवांतील घरांत भरपूर हवा व प्रकाश मिळण्याची सोय नसते व घरांत माणसांची संख्या वाजवीपेक्षां जास्त असते. खेड्यांतील रस्ते व भोंवतालचा भाग घाणीनें भरलेला, गुरांनी दाट केलेला, निरुपयोगी झाडझुपांनीं व्यापलेला व घाणेरडें पाणी सांचलेल्या डबक्यांनी विषारी वायुयुक्त बनलेला असतो. तेथील तलावांतील पाणी घाणेरडें झालेलें असतें तरी त्याचाच उपयोग धुण्याकडे, स्वयंपाकाकडे व पिण्याकडे केला जातो. ही स्थिति अलीकडे शिक्षण वाढल्यामुळें आणि पैसा हातीं असल्यामुळें सुधारत आहे. १९१९ सालच्या सुधारणा कायद्यानें आरोग्य हा विषय प्रांतिक आणि सोंपीव म्हणजे दिवाणाच्या जबाबदारींतला बनविला. या सुधारणेमुळें काय परिणाम झाला याबद्दल थोडासा निर्देश हिंदुस्थानसरकारच्या पब्लिक बेल्थ कमिशनरनें १९२१-२२ च्या रिपोर्टात केला आहे. हा विषय दिवाणाच्या हाती गेल्यापासून आरोग्यविषयक प्रश्नासंबंधी लोकांमध्यें जागृति अधिक दिसूं लागली आहे. आरोग्यविषयक कामांत भाग घेणारया स्थानिक संस्था स्थापन झाल्या आहेत. १९२२ मध्यें हिंदुस्थानांतील मृत्यूचें सरासरी प्रमाण २४.०२ होतें. १९२१ सालापेक्षां १९२२ सालीं पंधरा लक्ष मृत्यु कमी झाले. आरोग्यविषयक स्थितीची तपासणी करून सुधारणेच्या सूना करण्याकरितां एक कमिशन नेमणें हल्लीं फार जरूर आहे.

 जन्ममृत्यूचे प्रांतवार प्रमाण

१९२३ साल आरोग्याच्या दृष्टीनें बरें होतें. मद्रास आणि मुंबई प्रांत खेरीज करून मृत्यूचें प्रमाण कमी झालें होतें. तसेंच कूर्ग खेरीज सर्व प्रांतांत मृत्युपेक्षां जननाची संख्या अधिक आहे. १९२२ साली एक वर्षाच्या आंतील अर्भकाच्या मृत्यूचें प्रमाण शें. २३.२ होतें व त्या मागील साली २०.८ होतें. १९२३ सालीं २४.६ व १९२४ साली २२.८ होतें. बालमृत्यु हें आरोग्यविषयक स्थितीचे फार चांगले गमक आहे. हिंदुस्थानांत जन्मानंतर पहिल्याच महिन्यांत शेकडा ४८.१ बालमृत्यू होतात आणि पहिल्या आठवड्यांत एकंदर मृत्यूपैकीं १/३ मृत्यू होतात. बालमृत्यूला मुख्य कारण आरोग्यविषयक स्थिति असमाधानकारक असणे हेंच आहे. इतर रोगांपैकीं मलेरिया रोगाचा प्रसार दरसाल होतो व तो मोठ्या प्रमाणावर होतो. जगांतील बहुतेक भागांत हा रोग नेहमी होत असल्यामुळें त्यासंबंधी संशोधन अलीकडे बरेच झालें आहे. मलेरिया रोगानें सर्व समाजाची शारीरिक अवनति होते. या रोगानें पीडिलेल्या लोकांची इच्छाशक्ति, कामाची आवड, सार्वजनिक कामें पार पाडण्याची उमेद वगैरे सर्व कमी होतात. एकट्या बंगाल प्रांतांत दरसाल २८३००००० लोकांनां मलेरिया होतो, या मानानें सर्व हिंदुस्थानांत या रोगानें ग्रासलेल्या लोकांची संख्या निदान १० कोटी असली पाहिजे. हा मलेरिया घालविण्यासाठीं बर्‍याच खटपटी चालू आहेत. लष्कर हद्दींत यावर फार खर्चहि होत असतो. १९२५-२६ सालीं लष्करी बजेटांत एक लाख रुपये या चळवळीकरितां राखून ठेविले होते. तथापि हीहि रक्कम कमी पडते अशी कुरकूर होते. राष्ट्रसंघानें मलेरियाला उपाय शोधण्यासाठी एक कमिटीहि नेमली आहे. अलीकडे पुष्कळ लोक देवी टोंचून घेतात त्यामुळें देवीनें मरणार्‍या लोकांची संख्या बरीच कमी आहे. ही संख्या १८७७ च्या सुमारास दरसाल २४८७१२ होती ती हल्लीं ८२३३८ वर आली आहे.

क्रूर प्राण्यांपासून मृत्युः- ब्रिटिश हिंदुस्थानांत १९२५ त १९७४, १९२४ सालीं २५८७ व १९२३ त ३६०५ इसम क्रूर प्राण्यांनीं मारले. १९२५ सालच्या मृत्यूंपैकी वाघांनी ९७४, चित्यांनीं १८१, लांडग्यांनीं २६५, अस्वलांनीं ८२, हत्तींनीं ७८ आणि तरसांनीं ६ मारले. वाघांनीं मारलेल्या इसमांची सर्वात अधिक संख्या मद्रासेंत, चित्त्यांनीं मारलेल्या वर्‍हाड- मध्यप्रांतांत, लांडग्यांनीं मारलेल्यांची संयुक्तप्रांतांत, अस्वलांनीं मारलेल्यांची बिहार- ओरिसांत आणि हत्तींनी मारलेल्यांची आसामांत आहे. बाकीच्या प्राण्यांनीं मारलेल्या ३८८ इसमांपैकीं ७३ रानडुकरांनीं व ९८ सुसुरींनीं मारलेले आहेत. क्रूर प्राण्यांनीं मारलेल्या इसमांची सर्वात अधिक संख्या मद्रास प्रांतांत आहे. ही निरनिराळ्या प्राण्यांकडून होणारी मृत्युसंख्या निरनिराळ्या सालीं निरनिराळी भरते.

सर्पदंशः- साप चावून मेलेल्यांची संख्या १९२५ सालीं १९३०८ होती. याच्या मागील सालांत ती जास्त होती. ही संख्या बंगास-मुंबईमध्ये जास्त व मद्रास, संयुक्तप्रांत, पंजाब, ब्रह्मदेश व मध्यप्रांत, बिहार-ओरिसा यांमध्यें कमी झाली.

ठार मारलेले क्रूर प्राणीः- १९२५ सालीं २१६०५ क्रूर प्राणी मारले गेले. त्यांत १६०९ वाघ, ४६६० चित्ते, २४८५ अस्वलें आणि २३६१ लांडगे होते. याबद्दल १५५५६६७ रुपये बक्षिसादाखल दिले गेले. व ४१००४ साप मारले गेले त्याबद्दल १५७९ रुपये बक्षीस दिले गेले.

मुख्य रोग- प्राणघातक रोगांचे मुख्य तीन वर्ग आहेत (१) दोषीताप, (२) पचनेंद्रविषयक रोग, (३) फुफ्फुसांसंबंधीचे रोग. निरनिराळ्या मुख्य रोगांमुळें होणार्‍या मृत्यूंचे दरहजारीं प्रमाण पुढील कोष्टकांत आहे दिलें.

निरनिराळ्या रोगांमुळें होणार्‍या मृत्यूंचे प्रांतवारी हजारीं प्रमाण

वैद्यकीय संस्था- हिंदुस्थानांत १९२४ सालीं ३६६९ सरकारी, निमसरकारी व खाजगी दवाखाने व रुग्णालयें होतीं, व त्यांत रोग्यांची संख्या ३९३८१०३२ होती. शास्त्रक्रियांची संख्याहि वाढती आहे.

वैद्यकीय कॉलेजें:- हिंदुस्थानांत सात वैद्यकीय कॉलेजें मुंबई, मद्रास, कलकत्ता, बेलगाचिया, लाहोर, दिल्ली व लखनौ १८ शाळा आहेत. डेहराडून येथें एक क्ष-किरण (एक्स- रे) संस्था आहे.

पाश्चूर इन्स्टिट्यूट्सः- श्र्वानदंशावर उपचार करणार्‍या संस्था कसौली (पंजाब), कुन्नूर (मद्रास), शिलाँग (आसाम), रंगून (ब्रह्मदेश), व परळ (मुंबई) येथें आहेत. अलिकडे कुत्र्याच्या विषावर उपचार करण्याचें काम पुणें वगैरेसारख्या मोठमोठे दवाखाने असलेल्या बहुतेक सर्व ठिकाणीं होतें.

वेड्यांची इस्पितळें:- वेड्या लोकांना औषधोपचार करणारीं वेड्यांचीं इस्पितळें (ल्युनॅटिक असायलम्स) थोडीं आहेत; पण त्यांतील संख्या सारखी वाढत आहे. हीं इस्पितळें १९०५ सालीं २२ होतीं व त्यांत त्या सालीं वेड्यांची संख्या नवी २१३६ मिळवून एकूण संख्या ९६४० होती.

महारोग्यांची इस्पितळें:- या प्रकारचीं इस्पितळें पुष्कळ आहेत. त्यांत मद्रास लेपर असायलम, माटुंगा लेपर होम (मुंबई), त्रिवेंद्रवम स्टेट लेपर असायलम व कलकत्ता लेपर असायलम हीं मुख्य आहेत. शिवाय सरकारी मदतीनें चाललेलीं पुष्कळ असून मिशनर्‍यांनीं चालविलेलीं सुमारें ५० इस्पितळें आहेत.

हिंदुस्थानांतील महारोग्यांची माहितीः- महारोग्यांची संख्या १९२१ सालीं १०२५१३ आणि १९११ सालीं १०९०९४ होती. या रोगावर मुख्य योजना म्हणजे प्रथम रोग्याला समाजांतून दूर ठेवणें ही आहे. शिवाय या रोगावरचीं विशिष्ट औषधें (स्पेशल लेपर क्लिनिक्स) रोग्यांनां फुकट मिळण्याची व्यवस्था करावी. शेवटची गोष्ट म्हणजे हा रोग कसा पसरतो, त्यावर अगदी अलीकडे शोध लागलेले औषधोपचार वगैरे संबंधी माहितीचा प्रसार सर्व लोकांमध्यें करणें ही आहे. नुकताच लेडी आयर्विन यांनीं लेप्रसी फंड सुरू केलेला आहे.

शिशुसंगापानाची चळवळः- हिंदुस्थानांत बालमृत्यूंची संख्या भयप्रद आहे. दरसाल वीस लक्ष मुलें मरतात. लहान मुलांचें आरोग्य सुधारण्याच्या उद्देशानें ऑल इंडिया मॅटर्निटी अँड चाइल्ड वेलफेअर लीग स्थापन झाली असून सुईणींनीं (मिड- वाईफ) शिक्षण आणि मातांनां बालसंगोपनाचें ज्ञान देण्याच्या सोयी मोठाल्या शहरांमधून झाल्या आहेत. नॅशनल असोसिएशनकडून या बाबतींत चांगलें काम होत असून लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनें १५००० पौंड मदत देण्याचें ठरविलें आहे. हें कार्य करणार्‍या संस्था पुढीलप्रमाणें आहेत- मुंबई- लेडी विलिंग्डन मॅटर्निटी होम; बॉम्बे इन्फन्ट वेलफेअर सोसायटी, ९ इन्फन्ट वेलफेअर सेंटर, रेडक्रॉस सोसायटीची शाखा, कोआपरेटिव्ह मिडवाइज स्कीम; सुरत हेंडरसन ऑफ थॅल्किम स्कीम, दिल्लींतील इन्फन्ट वेलफेअर सेंटर व ट्रेनिंग स्कूल, लेडी चेम्सफर्ड लीग; मद्रास- लेडी चेम्सफर्ड लीगची व रेडक्रॉस सोसायटीची शाखा, कोआपरेटिव्ह मिडवाइज स्कीम; पंजाब- लेडी चेम्सफर्ड लीगची शाखा व एक इन्फन्ट वेलफेअर सेंटर; कलकत्ता सहा मिडवाईफ सुपरवायझर आणि सहा हेल्थ व्हिजिटर, सहा रेडक्रॉस चाइल्ड वेलफेअर सेंटर; पुणें सेवासदन सोसायटी, ट्रेनिंग स्कूल, मॅटर्निटी हॉस्पिटल, शिवाय अलाहाबाद, क्वेटा, पेशावर, इंदूर, शिकंदराबाद, कूर्ग वगैरे ठिकाणीं रेडक्रॉस सोसायटीच्या शाखा आहे. दुष्काळ, दारिद्रय व सांथीचे रोग यांनीं ग्रासलेल्या हिंदुस्थान देशांत सुदृढ मुलांची संख्या जास्त असावी किंवा अशक्त व रोगी अशा मुलांची बेसुमार संख्या उत्पन्न करून ती मृत्यूला बळी पडूं द्यावी हा प्रश्न हिंदी समाजापुढें आहे. पाश्चात्य शिशुसंगोपानाच्या प्रश्नांतून वैद्यकीय तपासणी, डेंटल क्लिनिक्स, आरोग्यवह गृहें, मोकळ्या हवेंचीं क्रीडांगणें वगैरे सोयी करण्याचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंदुस्थानांत या सर्व गोष्टी होणें दूरच आहे. पण निदान दसाल २० लक्ष बालमृत्यू आणि त्याच मानानें अशक्त कमकुवत मुलांची मोठ संख्या यांनां आळा घालून लायक नागरिक कसे करावे याचें ज्ञान मातांनां करून देणें हें काम प्रथम व्हावयास पाहिजे.