प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १२ वे.
पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास 
   
अणकुचीदार पदार्थांतील विद्युत्क्षेपण व विद्युन्नाशन धर्म.– फ्रांकलिन हा यूरोपीय संशोधकांच्या प्रगतीची नेहमीं माहिती ठेवून प्रयोग करीत असे.  त्याला प्रयोगाअंतीं लवकरच असें आढळून आलें कीं, अणकुचीदार पदार्थांत आपल्या मधील विद्युत् बाहेर टाकण्याचा व दुसर्‍या विद्युद्युक्त पदार्थांस विद्युद्रहित करूं शकण्याचा धर्म असतो.  एतद्विषयक प्रयोगाचें वर्णन त्यानें पुढीलप्रमाणें लिहून ठेविलें आहे: -

“तीन किंवा चार इंच व्यासाचा एक लोखंडाचा गोळा स्वच्छ व कोरडया अशा एका कांचेच्या बाटलीच्या तोंडावर ठेवा; व या बाटलीच्या तोंडावर गोटीच्या आकाराची एक बुचाची गोळी लोखंडाच्या गोळ्यावर टेकून राहील अशा बेतानें दोर्‍यानें टांगा.  आता त्या लोखंडाच्या गोळ्यास विद्युद्युक्त केलें कीं बुचाच्या गोळीचें प्रतिसारण होऊन कमीअधिक विद्युत् असेल त्याप्रमाणें ती चारपाच इंच किंवा त्याहून कमीजास्त दूर जाईल.  अशा स्थितींत जर तुम्हीं लोखंडाच्या गोळ्यापासून सहा किंवा आठ इंच अंतरावर, एका बारीक व लांब टोंच्याचें अणकुचीदार टोंक धरलें, तर प्रतिसारण एकदम नष्ट होऊन बुचाची गोळी लोखंडाच्या गोळ्यावर येऊन आदळेल.  एखादा अणकुचीदार बोथट पदार्थ घेतला, तर तोच परिणाम घडवून आणण्याकरितां तो लोखंडाच्या गोळ्यापासून एक इंच अंतरावर आणून विद्युत्स्फुलिंग घ्यावें लागेल.

“ ‘विद्युद्वन्हि’ हा अणकुचीदार टोकानें काढून टाकितां येतो हें पाहावयाचें असल्यास टोंच्याचें पातें लांकडाच्या मुठींतून काढून त्याला लाखेच्या दांडयांत बसवा.  आतां जरी या टोंच्याचें टोंक लोखंडाच्या गोळ्यापासून पूर्वीं इतक्याच अंतरावर किंबहुना त्याहूनहि जवळ नेलें तरी त्याचा कांहीं परिणाम होत नाहीं.  परंतु लाखेच्या दांडयावर बोट ठेवून तें हळूहळू पुढें सरकवूं लागला, तर त्याचा पात्यास स्पर्श होतांच बुचाची गोळी लोखंडाच्या गोळ्यावर येऊन आदळते.  जर तुम्ही हा प्रयोग अंधारांत केला, तर टोंच्याचें टोंक एक फूट अंतरावर असतांच त्यावर काजव्याच्या प्रकाशाप्रमाणें प्रकाश चमकूं लागेल.  टोंच्याचें टोंक जितक्या अंतरावर आणिलें असतां त्यावर हा प्रकाश दिसूं लागतो, तेवढया अंतरावरून तुम्हास ‘विद्युद्वन्हि’ काढून टाकितां येतो व प्रतिसारणशक्तीहि नाहींशी करितां येते.  या कामीं लोखंडाच्या अणकुचीदार पदार्थाप्रमाणें लांकडाचेहि अणकुचीदार पदार्थ-ते कोरडे असले तर-उपयोगी पडूं शकतील.  पूर्णपणें कोरडें असलेलें लांकूड विद्युद्वहनाच्या कामीं लाखेइतकेंच निरूपयोगी असतें.

“अणकुचीदार पदार्थ ज्याप्रमाणें दुसर्‍या पदार्थांतील ‘विद्युद्वन्हि’ बाहेर काढून टाकतात, त्याचप्रमाणें ते स्वत:मधील ‘विद्युद्वन्हि’ हि बाहेर टाकीत असतात.  याची प्रचीति पहावयाची असल्यास, एक लांब धार असलेली सुई उपर्युक्त प्रयोगांतील लोखंडाच्या गोळ्यावर ठेवा.  असें केलें म्हणजे तुम्ही कितीहि प्रयत्‍न केले तरी लोखंडाचा गोळा विद्युद्युक्त होऊन बुचाच्या गोळ्याचें प्रतिसारण होणार नाहीं किंवा एखाद्या टांगलेल्या बंदुकींच्या नळींत एक सुई संगिनीप्रमाणें बाहेर राहील अशा रीतीनें बसवा; म्हणजे सुई असे तोंपर्यंत विद्युज्जागृत कांचेच्या नळीनें स्पर्श करून ती बंदुकीची नळी विद्युद्युक्त केली जाणार नाही.  कारण, बंदुकीच्या नळींत वीज आल्यावर ती सुईच्या अग्रांतून शांतपणें बाहेर निघून जाईल.  हा प्रयोग तुम्ही अंधारांत करूं लागला, तर तुम्हांस पूर्वींप्रमाणें सुईच्या अग्राभोंवतीं प्रकाश दिसूं लागेल.”

व्हॉन गेरिक, हॉक्सबी व ग्रे यांच्या देखील लक्षांत अणकुचीदार पदार्थांच्या अंगी विजेचें आकर्षण करण्याची एक विशिष्ट प्रकारची शक्ति असते, ही गोष्ट आली होती.  पण ‘विद्युद्वन्हि’ काढून टाकण्याचा उपर्युक्त प्रयोग प्रथम फ्रांकलिननेंच केला.  फ्रांकलिननें यानंतर जी विद्युद्विषयक उपपत्ति सुचविली, ती देखील सर्वस्वी त्याची स्वत:चीच आहे.  या उपपत्तींस दुसरा कांहीं गुण नसला तरी ती अल्पज्ञ लोकांस विषय समजावून सांगण्यास फार उपयुक्त आहे.  या उपपत्तीप्रमाणें विद्युत् ही एखाद्या प्रवाही पदार्थाप्रमाणें असून, प्रवाही पदार्थाप्रमाणेंच तिचें वाहकांतून वहन होऊं शकतें व सोइस्कर पात्रांत तिचा संचयहि करतां येतो.  ही कल्पना कदाचित समूळ चुकीचीहि असेल तथापि तिच्या सारखी लोकांनां सहज समजणारी दुसरी एखादी उपपति पुढें मांडली जाईपर्यंत तिचे बहुधा शास्त्रानभिज्ञ जनतेच्या मनांतून उच्चाटन होणार नाहीं.