प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ११ वें
रसायनशास्त्राचा इतिहास.
प्राचीनांस परिचित क्रिया.- वैदिक काळांत सोनें व चांदी हीं नुसतीं माहितच होतीं असें नाही. तर त्यांचे त-हेत-हेचे दागिने करीत असत. प्राचीन काळांतील योद्धे चिलखतें व शिरस्त्राणें वापरीत असत. सोन्याचांदीशिवाय लोह, शिसें, कथील इ० दुस-या पुष्कळ धातू वेदकालीनांस माहीत होत्या असें शुक्लयजुर्वेदांतील 'हिरण्यंचमे, अयश्चमे, श्यामंचमे, लोहंचमे, सांसंचमे, त्रपुच मे यज्ञेन कल्पताम् (१८.१३) यावरून सिद्ध होतें. छांदोग्य उपनिषद् (४.१७, ७) यांत 'लवणेन सुवर्णं संदध्यात, सुवर्णेन रजतं, रजतेन त्रपु, त्रपुणा सीसं, सीसेन लोहं, लोहेन दारू, दारू चर्मणा' असा धातूंसंबंधी उल्लेख आला आहे. अर्थात् यांपैकीं काहीं धातूंच्या बाबतींत तरी अशुद्ध धातूपासून शुद्ध धातु तयार करण्याची क्रिया तत्कालीनांस अवगत असली पाहिजे.
वात्सायनाच्या कामसूत्रांत (१) सुवर्णरत्नपरीक्षा, (२) धातुवाद म्हणजे रसायण व खनिज शास्त्र, (३) मणिरागाकरज्ञानं-हिरेमाणकें वगैरेंस रंग देण्याचें व खाणींचें ज्ञान या गोष्टींचा चौसष्ट कलांत समावेश केला आहे. तसेंच शुक्रनीतिमध्यें (१) पाषाणांस व धातूंस छिद्रें पाडून त्यांचें भस्म करणें, (२) धातु आणि वनस्पतिज पदार्थ यांचा संयोग करणें, (३) धातूंचें मिश्रण करून पितळेसारख्या मिश्र धातू करणें व त्यांचें पृथकरण करणें व (४) क्षार काढणें यांचा कला म्हणून उल्लेख केला आहे. बाणकवीच्या सहचरांत धातुकर्मकार व धातुपरीक्षक असल्याचें आढळतें. संस्कृत वाङ्मयांत ''लोहविद्'' ''धातुविद्'' इ० शब्द वरचेवर आढळतात त्यावरून धातुकर्मकारांची चांगलीच चहा व किंमत होती असे दिसतें, वस्त्रे रंगविण्याची कलाहि पूर्णतेस गेली होती. पक्के रंग टायरिअन जांभळ्या रंगाप्रमाणें होत असे राय यांनी म्हटलें आहे.
मिगॉस्थिनाझच्या मतें या भूमींत पूर्वी पुष्कळ प्रकारच्या धातूंच्या खाणी होत्या. कारण येथें सोनें, चांदी, तांबें व लोखंड हीं विपुल होतीं. कथील व दुस-या धातू यांची नेहमीं वापरण्याचीं भांडीं, दागिने व युद्धोपयोगी हत्यारें करीत असत.