प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ३ रें.
ईजियन संस्कृति.

समाजघटना अथवा व्यवस्था. - याविषयीं कांहीं निश्चित विधानें करितां येत नाहींत. सशस्त्र शिपायांचीं फारच थोडीं चित्रें सांपडतात, म्हणून कदाचित येथें क्षत्रिय वर्ग प्रामुख्यानें नसावा. नोंदणी करण्याविषयीं येथें विस्तृत व पुष्कळ नियम आढळतात यावरून कायद्याची बरीच वाढ येथें झाली असावी. सत्ताधिकारी वर्गाची राहणी ऐषआरामाची होती. हे लोक मांसाहारी असत. मादक पेयें पिण्याचा प्रघात येथें होता. निरनिराळ्या प्रकारची मातीचीं व ब्रांझ धातूचीं भांडीं तयार होत असत. येथें द्राक्षें व आलिव्ह फळें पिकवीत असत. हवा व उजेड आंत घेण्याकरितां कुशलतेच्या योजना अमलांत आणिल्या होत्या. शहरांतील फाजील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली होती. वृषभयुद्ध, मुष्टियुद्ध, नाच, सशस्त्र द्वंद्वयुद्ध यांनीं लोकांची करमणूक होत असें.